चुलीवरचा स्वयंपाक जरी चवीला फर्मास वाटला तरी चुलींचा धूर पर्यावरणाला हानिकारकच. या चुलींचे आरोग्यास असलेले धोके ठासून सांगणारे पर्यावरण वैज्ञानिक म्हणून कर्क आर. स्मिथ यांचा नावलौकिक होता. त्यांच्या निधनाने पर्यावरणाचा खंदा अभ्यासक हरपला आहे.

इंटर-गव्हर्न्मेंटल पॅनेल फॉर क्लायमेट चेंज’च्या (‘आयपीसीसी’च्या) हवामान बदलविषयक चमूला २००७ मध्ये नोबेल मिळाले होते; त्याचे ते एक सदस्य होते. त्यांना ‘हवा प्रदूषणाच्या सखोल अभ्यासा’साठी टायलर पारितोषिकही मिळाले होते. स्मिथ हे बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात ‘स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’मध्ये प्राध्यापक होते. १९८०च्या दशकात स्मिथ यांनी ग्रामीण, अविकसित भागांतील बिगर-औद्योगिक प्रदूषणाचा अधिक खोलात जाऊन अभ्यास करण्यासाठी आशिया, मध्य अमेरिका येथील हवा प्रदूषणाचा आढावा घेतला. त्यांनी अणुभट्टय़ांच्या अपघातांचा अभ्यास सोडून नंतर हाच विषय हाती घेतला. लाकूड, कोळसा, गोवऱ्या जाळल्याने जे प्रदूषण होते त्यावर त्यांनी भर दिला. जगातील ४० टक्के लोक अद्याप चुलीवर स्वयंपाक करतात असे त्यांचे म्हणणे होते. त्यासाठी त्यांनी नेपाळ, चीन, भारत, ग्वाटेमाला, मेक्सिको, पॅराग्वे यांसारख्या देशांत प्रत्यक्ष अभ्यासही केला. हा धोका लक्षात आणून देऊन विकसनशील देशांना वेगळी दिशा दाखवून त्यांनी अनेक लोकांचे, विशेषत: धुरात बसून स्वयंपाक करणाऱ्या महिलांचे जीव वाचले, असे म्हणावे लागेल.

घरातील प्रदूषण मोजण्यासाठी त्यांनी काही उपकरणे तयार केली होती. याच प्रदूषणामुळे दरवर्षी चाळीस लाख लोक न्यूमोनियाने मरतात असे जागतिक आरोग्य  संघटनेचे मत आहे. याचा जास्त फटका घरात जास्त काळ राहणाऱ्या महिला व बालकांना बसतो. डॉ. स्मिथ यांनी स्वखर्चातून प्रदूषणाला तोंड देणाऱ्या लोकांसाठी दवाखाने सुरू करून त्यांना गॅस स्टोव्ह उपलब्ध करून दिले. त्यांनी त्यांच्या वेतनातील काही भाग अविकसित भागातील लोकांना गॅस स्टोव्ह देण्यावर खर्च केला. बर्कलेत जन्मलेल्या स्मिथ यांनी भौतिकशास्त्र व खगोलशास्त्रात पदवी घेतली होती. नंतर त्यांनी पर्यावरणशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. होनोलुलू येथे त्यांनी दोन दशके संशोधक म्हणून काम केले. नंतर काही काळ ते नेपाळ व भारतातही होते. त्यांनी  जगाला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी पर्यावरणाचा अभ्यास केला. लोकांच्या रोजच्या जीवनाचा भाग असलेल्या स्वयंपाकघरातील प्रदूषणाचा विषय निवडला त्यामुळे त्यांचे संशोधन लोकोपयोगी ठरले.