जगातील जुनी लोकशाही असलेल्या देशांपैकी एक असलेल्या अमेरिकेत सध्या ट्रम्प प्रशासनाची सत्ता आहे, पण अध्यक्षपदाचे एक वर्ष उलटून गेल्यानंतर ट्रम्प यांची लहरी वक्तव्ये व तशीच धोरणे यांचा फायदा घेण्याची पुरेपूर संधी आज सत्तेबाहेर असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाला आहे. या अतिशय मोक्याच्या वेळी डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक सीमा नंदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय समितीचे उपाध्यक्षपदही त्यांनी यापूर्वी सांभाळले आहे. डेमोक्रॅ टिक पक्षाच्या अत्यंत बुद्धिमान पदाधिकाऱ्यांपैकी त्या एक आहेत. आता डेमोक्रॅटिक पक्षांच्या दैनंदिन कारभाराचे सूत्रसंचालन त्या करणार आहेत. डेमोक्रॅटिक पक्ष व रिपब्लिकन पक्ष यांच्या विचारसरणीत मुळात फरक आहे. त्यातूनच दोन्ही राजवटीतील फरक आपण अनुभवतो आहोत. या काळात मूल्याधिष्ठित राजकारण करण्याची हमी नंदा यांनी दिली आहे. विविध पाश्र्वभूमीच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची समावेशक भूमिका त्यांनी मांडली आहे. नंदा यांचे बालपण कनेक्टिकट येथे गेले. त्यांचे आईवडील दंतरोगतज्ज्ञ आहेत. बोस्टन लॉ स्कूल व ब्राऊन विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. यापूर्वीही त्यांनी ‘लीडरशिप कॉन्फरन्स ऑन सिव्हिल अ‍ॅण्ड ह्य़ूमन राइट्स’ या संस्थेच्या कार्यकारी उपाध्यक्ष व मुख्य संचालन अधिकारी म्हणून काम केले आहे. नागरी हक्क वकील म्हणून ‘अनफेअर एम्प्लॉयमेंट प्रॅक्टिसेस’ विभागात त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय कामगार संबंध मंडळातही वकील म्हणून काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. आता डेमोक्रॅटिक पक्षाचे आधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेस ओकॉनेल यांची जागा त्या घेत आहेत. मॅसॅच्युसेट्स बार असोसिएशन या प्रतिष्ठेच्या संस्थेत त्या सदस्य असून अनेक ना नफा संस्थांच्या संचालक मंडळावर त्यांनी काम केले.

‘आम्ही अमेरिकेचा हरवलेला आत्मा परत मिळवण्यासाठी लढत आहोत, लोकशाही व संधी याचा पुनशरेध घेण्याची आमची तयारी आहे,’ असे त्या सांगतात. त्यासाठी डेमोक्रॅटिक पक्ष पुन्हा सत्तेवर येणे हाच एक उपाय आहे व त्यासाठीच हे पद स्वीकारल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यासाठी पन्नास राज्यांतील पाच कोटी मतदारांना ‘आय विल व्होट’ या मोहिमेद्वारे जागे करण्यात येणार आहे. त्यांना ट्रम्प प्रशासनाने सर्वच आघाडय़ांवर केलेल्या बेदरकारपणाची जाणीव करून दिली जाणार आहे, त्यात सीमा नंदा पक्षाचे संघटन कसे उभे करतात व त्याचा प्रत्यक्ष कसा वापर करतात याची उत्सुकता सर्वानाच आहे.