X

कोफी अन्नान

संयुक्त राष्ट्रांसाठी शांतिपथके पाठवण्याबाबत भारताने दाखवलेल्या सातत्याचे त्यांनी नेहमी कौतुक केले.

कोफी अन्नान हे संयुक्त राष्ट्रांचे पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकी सरचिटणीस. या खंडासमोर आजही गरिबी निर्मूलन, रोगराई निर्मूलन, समान न्याय आणि संधी या समस्या विक्राळ रूप धारण करून आहेत. स्वाभाविकच अन्नान यांनी सरचिटणीसपदाच्या कार्यकाळात या समस्या सोडवण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले. आफ्रिकेत आणि आफ्रिकेबाहेरही.

१९९६ मध्ये अन्नान संयुक्त राष्ट्रांचे सातवे सरचिटणीस झाले, तोपर्यंत त्यांनी जवळपास ३५ वर्षे या संस्थेत विविध पदांवर व्यतीत केली होती. त्यामुळे संस्थेत त्यांच्याविषयी अपार आदर आणि आशा होती. तो काळ संघर्ष आणि अंतर्गत यादवींचा. तर अन्नान यांचा स्वभाव अत्यंत नेमस्त आणि जुळवून घेण्याचा. पण वेळप्रसंगी अमेरिकेसारख्या देशासमोरही अन्नान यांनी खमकेपणा दाखवलाच. यादवी निर्मूलन, सरकारच अस्तित्वात नसलेल्या देशांमध्ये शांतिपथके पाठवणे हेच केवळ संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट असता कामा नये, हे ते आवर्जून नमूद करत. त्यांच्याच कार्यकाळात अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये गरिबी निर्मूलन, रोगराई निर्मूलन या कामांसाठीही संयुक्त राष्ट्रांनी महत्त्वाचे योगदान द्यावे याविषयी ते आग्रही असत. इराक, तत्कालीन युगोस्लाव्हिया या आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. असे करताना प्रसंगी हस्तक्षेप करावा लागल्यास देशाच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा गौण असतो. कारण संयुक्त राष्ट्रांचा जाहीरनामा हा मानवकल्याणाविषयी आहे. सरकारकल्याणाविषयी नाही, असे त्यांनी अनेकदा ठासून सांगितले!  त्यांचे पूर्वसुरी इजिप्तचे बुट्रोस बुट्रोस-घाली यांच्याविषयी विशेषत: तत्कालीन अमेरिकन सरकारमध्ये प्रचंड नाराजी होती. अमेरिकेचा पाठिंबा पुन्हा प्राप्त करून घेणे हे अन्नान यांच्यासमोरील मोठे आव्हान होते. ते त्यांनी यथास्थित पार पाडले.

जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्रांचा निर्वासितांसाठीचा आयोग अशा अनेक संलग्न संघटनांमध्ये काम करून झाल्यानंतर या जागतिक संघटनेच्या नेमक्या उद्दिष्टांविषयीची त्यांची वैचारिक बैठक पक्की झाली होती. त्यामुळेच संयुक्त राष्ट्रे आणि अन्नान यांना २००१ मधील शांततेचे नोबेल विभागून देण्यात आले होते. संयुक्त राष्ट्रांसाठी शांतिपथके पाठवण्याबाबत भारताने दाखवलेल्या सातत्याचे त्यांनी नेहमी कौतुक केले. स्वित्र्झलड आणि अमेरिकेत उच्चशिक्षण घेऊनही त्यांच्यात मायभूमी घानातील ग्रामीण मातीतला साधेपणा कायम राहिला. त्यांच्या निधनाने विशेषत: भारत, आफ्रिका आणि जगातील इतर भागांमध्ये अजूनही गरिबीत राहत असलेल्या जनतेने एक सच्चा हितचिंतक गमावला आहे.