‘मार्क्‍सवादी समीक्षक’ हे त्यांना चिकटलेले बिरूद आजच्या भारतीय संदर्भात अन्यायकारकच वाटेल; कारण ज्याँ पॉल सात्र्, वॉल्टर बेन्यामिन, थिओडोर अडोनरे ते आजचे टेरी ईगल्टन अशी या समीक्षेची चिकित्सक विचारपरंपरा भारतीयांपासून आज नजरेआड होत आहे. या विचाराला तमिळ भाषा व तमिळ सांस्कृतिक विश्व यांच्या प्रदेशात आणणारे कोवइ ज्ञानी हे त्या परंपरेचे सहप्रवासी झाले.  राजकीय पक्षांशी संबंध न ठेवता काम करणारे आणि तमिळ ‘संगम’कवींचा रास्त अभिमान असणारे ते कवी होते, तसेच सांस्कृतिक बंडखोरीची नुसती चर्चा न करता स्वत:चे ‘पलानीस्वामी’ हे नाव बदलण्याची धमक त्यांनी दाखवली होती. त्यांच्या निधनाने तमिळ काव्य आणि समीक्षापरंपरेचा महत्त्वाचा दुवा निखळलाच; पण भारतीय ‘साठोत्तरी साहित्य’ कसे इतिहासजमा होत चालले आहे, याचीही खंत वाढली.

महाराष्ट्राला दि. के. बेडेकरांमुळे जिची ओळख झाली, ती ‘मार्क्‍सवादी’ समीक्षारीती तमिळमध्ये १९६०च्या दशकात कोवइ ज्ञानींनी रुजवली. ही रीती मार्क्‍सवादाला केवळ राजकीय विचारधारा न मानता तो समाजचिकित्सेचा तत्त्वमार्ग आहे असे मानणारी. साहित्य ही (एकेकटय़ा कवी/लेखकाने अभिव्यक्त केली असली तरी) सामाजिक कृती आहे, असे मानणारी. तिरुवल्लार ते भारतियार ही तमिळ कवींची परंपरा समाजाला प्रतिसाद देत कशी  वाढलेली आहे, हे कोवइ ज्ञानी यांनी विशद केले. ‘कोवइ’ हे कोइम्बतूरचे तमिळ नाव. त्या परिसरात राहणाऱ्या कवींची ‘वनम्बदि’ काव्यचळवळ ही महत्त्वाची का आहे, हे समीक्षक म्हणून समाजाला सांगण्याचे कामही कोवइ ज्ञानींनी केलेच, पण स्वत: कवी म्हणून ते या चळवळीत सहभागी झाले. पंच्याऐंशी वर्षांच्या हयातीत त्यांचे काव्यसंग्रह तीनच. पण ११ साहित्यिकांच्या ग्रंथांचे सटीक प्रस्तावनेसह संपादन आणि समीक्षालेखांचे ३० संग्रह अशी पुस्तके ज्ञानींच्या नावावर आहेत. ‘परिणामम्’, ‘तमिळ नेयम्’ या अनियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. अण्णामलै विद्यापीठात ३० वर्षे तमिळ साहित्याचे अध्यापन, हा सर्व काळ तसेच आधी व नंतरची पाचपाच वर्षे मिळून ४० वर्षे नियतकालिकांचे काम आणि विपुल लेखन.. असा त्यांचा कामाचा झपाटा ५५ व्या वर्षी दृष्टीच गेल्यामुळे काहीसा कमी झाला होता. पण त्यांचे लेखनिक होण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्यामुळे लिखाण थांबले नाही. ‘मार्क्‍सवादी’ आणि ‘तमिळ अस्मितावादी’ या शिक्क्यांमुळे त्यांना पुरस्कारांनी मात्र हुलकावण्याच दिल्या.