News Flash

कृष्णा सोबती

सरळसाधेपण व प्रवाहीपण ही त्या भाषेची वैशिष्टय़े आहेत.

कृष्णा सोबती

तब्बल सात दशकांहून अधिक काळ लिहित्या असलेल्या ज्येष्ठ हिंदी कादंबरीकार व ललित लेखिका कृष्णा सोबती यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार  जाहीर झाला आहे. १९४४ साली पहिली कथा लिहिणाऱ्या सोबती यांना २०१७ साली ज्ञानपीठ मिळेपर्यंत काळाचा मोठा पल्ला ओलांडला गेला आहे. काळाच्या या गतिचक्राचे भान सोबती यांच्या या वर्षीच प्रकाशित झालेल्या ‘गुजरात पाकिस्तान से गुजरात हिंदुस्थान तक’ या आत्मचरित्रात्मक कादंबरीत सर्वार्थाने व्यक्त झाले आहे. हे भान जपल्यामुळेच वास्तवापासून त्या कधी अलिप्त राहिल्या नाहीत.

पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुजरात जिल्ह्य़ातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात १८ फेब्रुवारी १९२५ रोजी सोबती यांचा जन्म झाला. सुरुवातीचे शिक्षण दिल्ली व शिमला इथे झाले. पुढे लाहोर येथे उच्चशिक्षण घेत असतानाच भारताची फाळणी झाली आणि त्यांचे कुटुंब निर्वासित म्हणून दिल्लीत परतले. आधी राजस्थानच्या सिरोही संस्थानात काही काळ नोकरी केलेल्या सोबती यांनी लवकरच पूर्ण वेळ लेखनाला वाहून घेतले.  ‘लामा’, ‘नफिसा’, ‘सिक्का बदल गया’ या १९४४ साली प्रकाशित झालेल्या कथा असोत किंवा १९५९ मध्ये ‘दो राहें दो बाहें’ ही नंतर कादंबरीरूपात प्रकाशित झालेली कथा, अथवा ‘बादलोंके घेरे’ (१९८०), ‘यारों के यार तीन पहाड’ (१९८९) हे कथासंग्रह असोत, त्यातून त्यांच्या भाषेची निराळी शैली त्यांनी हिंदीमध्ये आणली. सरळसाधेपण व प्रवाहीपण ही त्या भाषेची वैशिष्टय़े आहेत. निर्वासित असण्याचा स्वानुभव आणि त्याच्यासोबतचे जगणे यांचा पट मांडतानाही त्यांची भाषा संयमित राहिली.

हिंदीत नवकथा लिहिली जाऊ लागण्याच्या काळात अनेक  लेखिका लिहित्या झाल्या, त्यापैकी सोबती या एक. बंडखोरी हे त्यांच्या लेखनातील मुख्य वैशिष्टय़. स्त्रीवादाची चर्चाही नसण्याच्या काळात त्यांनी स्त्रीवादी लेखन केले. १९५२ मध्ये मूळ ‘चन्ना’ या शीर्षकाने लिहिली गेलेली व १९७९ मध्ये प्रकाशित झालेली ‘जिंदगीनामा’ ही कादंबरी, तसेच ‘डर से बिछडी’ (१९५८), ‘मित्रो मरजानी’ (१९६६), ‘सूरजमुखी अंधेरे के’ (१९७२), ‘ए लडकी’ (१९९१), ‘दिलो दानिश’ (१९९३), ‘समय सरगम’ (२०००) या इतर कादंबऱ्यांमधून त्यांनी धीट, कणखर स्त्री-व्यक्तिरेखा रेखाटल्या.  वास्तवाशी जोडून घेतल्यामुळे त्यांची पात्रं, कथानकं इथल्या मातीतली राहिली. ‘हशमत’ या टोपणनावाने त्यांनी लिहिलेला समकालीन लेखकांच्या व्यक्तिचित्रणाचा संग्रह (‘हमहशमत’), कृष्ण बलदेव वैद या प्रसिद्ध लेखकाशी संवाद (सोबती-वैद संवाद), काही मुलाखती असा त्यांचा लेखनपसार आहे. दूरदर्शनवर एकेकाळी गाजलेल्या ‘बुनियाद’ या मालिकेचे लेखनही त्यांनी केले होते. मराठीत मात्र त्यांची ‘ए लडकी’ ही एकमेव कादंबरी अनुवादित (अनुवाद- निशिकांत ठकार) झाली असून ती अद्याप पुस्तकरूपात प्रसिद्ध झालेली नाही.

साहित्य अकादमी पुरस्कार (‘जिंदगीनामा’साठी), सा. अकादमीची पाठय़वृत्ती (१९९६), तसेच इतर अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले असले, तरी पुरस्कारांचा सोस त्यांना नाहीच. त्यामुळेच २०१० साली देऊ केलेला ‘पद्मभूषण’ पुरस्कार त्यांनी नाकारला. देशातील असहिष्णुतेचे  वातावरण पाहून दोन  वर्षांपूर्वी त्यांनी अकादमी पुरस्कार व पाठय़वृत्तीही परत केली होती.  सत्तराव्या वर्षी त्यांनी डोगरी भाषेतील लेखक शिवनाथ यांच्याशी विवाह केला.  तीन वर्षांपूर्वी शिवनाथ यांचे निधन झाले आणि सोबती पुन्हा एकटय़ा पडल्या. यंदा सोबती यांनी वयाची ९२ वर्षे पूर्ण केली आहेत.

((   कृष्णा सोबती )))

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 1:40 am

Web Title: krishna sobti jnanpith award hindi literature
Next Stories
1 के सच्चिदानंदन
2 समीर अस्लम शेख
3 मेलनमाई पोन्नुसामी
Just Now!
X