युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडणार असतानाच्या अभूतपूर्व स्थितीत युरोपीय संघाचा (ईयू) अर्थ आराखडा तयार करणे किंवा युरोपातील निर्वासितांची समस्या सामाजिक स्तरावरही सोडवणे यांसारख्या अवघड जबाबदाऱ्या त्यांनी यापूर्वी पेलल्या आहेत. युरोपियन कमिशनच्या उपाध्यक्षा म्हणून, मनुष्यबळ विकास आणि अर्थसंकल्प विभागाच्या प्रमुख म्हणून १७५ अब्ज डॉलरचे निधी व्यवस्थापन हाताळणे आणि आंतरराष्ट्रीय महामंडळच्या आयुक्त म्हणून संकटे आणि उपाययोजना यातील अनुभव या जोरावर त्यांना ते यशस्वी करता आले. अशा ६६ वर्षीय क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या नव्या प्रमुखपदाची सूत्रे परवाच्या मंगळवारी स्वीकारली आहेत. पुढील पाच वर्षांसाठी ही नियुक्ती आहे. नाणेनिधीच्या दुसऱ्या महिला प्रमुख असण्यापेक्षा पूर्व युरोपातील त्या पहिल्या नियुक्त उमेदवार असण्याचे महत्त्व अधिक आहे. भारतासारखा विकसनशील देश असलेल्या बल्गेरियाला या माध्यमातून पहिल्यांदाच नाणेनिधीवर स्थान मिळाले आहे. नाणेनिधीच्या पहिल्या महिला प्रमुख ख्रिस्टीन लगार्द यांच्या निवृत्तीमुळे हे पद रिक्त झाले आणि त्या ज्या फ्रान्सच्या आहेत त्याच देशाने आणि अमेरिकेने पाठिंबा दिल्यामुळे क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांचा मार्ग मोकळा झाला. बल्गेरियाच्या सोफिया भागात १९५३ मध्ये जन्मलेल्या जॉर्जीव्हा यांनी राजकीय अर्थशास्त्र तसेच समाजशास्त्राचे स्नातकोत्तर शिक्षण आणि आर्थिक व्यवस्थापनशास्त्र विषयात पीएच.डी. घेतली. ज्या संस्थेत त्यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले तेथेच त्यांना १६ वर्षे अध्यापनाची संधी मिळाली. त्यानंतरची जागतिक बँकेतील त्यांची कारकीर्द तब्बल १७ वर्षांची. जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्या जवळपास अडीच वर्षे होत्या. एका तिमाहीसाठी त्यांना येथील हंगामी अध्यक्षपदाचाही अनुभव घेता आला. याच दरम्यान त्यांच्या अभ्यासातून जगातून २०३० पर्यंत गरिबी हद्दपार करण्याच्या उपाययोजना असलेला आराखडा तयार झाला.  उपाध्यक्ष, कंपनी सचिव आदी पदेही त्यांनी येथेच भूषविली. या मानाच्या संस्थेत पर्यावरण, सामाजिक विकास आदी विभागांतही त्यांना योगदान देता आले. पर्यावरण आणि आर्थिक धोरणांवरील १०० हून प्रकाशने त्यांच्या नावावर आहेत. युरोपियन ऑफ द इयर, कमिशनर आफ द इयर म्हणून त्या सन्मानित आहेत.

नाणेनिधीवरील नियुक्तीनंतर क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांनी, ‘जोखीम कमी करणे आणि उतारावरून पुन्हा चढावाच्या दिशेने प्रवास करण्यासाठी निकड असलेल्या देशांना सहकार्य करणे,’ हे ध्येय स्पष्ट केले. जागतिक स्तरावर व्यापारयुद्ध, तेल उत्पादन व दरातील वेगवान हालचाल या पाश्र्वभूमीवर क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे.