वर्दीतील व्यक्तीलाही संवेदना असतात, मग ते जवान किंवा पोलीस कुणीही असोत. उलट त्यांना आलेला समाजाचा अनुभव फार मोठा असतो. तो जर शब्दबद्ध झाला तर त्यातून खूप प्रभावी साहित्य निर्माण होऊ शकते. पण दोन्ही कौशल्ये फार थोडय़ा लोकांना अवगत असतात. आसामचे नवे पोलीस महासंचालक कुलधर सैकिया हे अशाच अपवादांपैकी एक. त्यांची नुकतीच पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती झाली. ते ‘साहित्य अकादमी’विजेते लेखक तर आहेतच, फुलब्राइट स्कॉलरचा मानही त्यांना मिळालेला आहे.

लेखनातून पोलीस अधिकारी म्हणून काम करताना मला बराच उपयोग होतो असे सैकिया सांगतात. कायदा अंमलबजावणी हे क्षेत्रच संवेदनशील माणसासाठी आहे असे त्यांचे मत आहे. त्यांना २०१५ मध्ये ‘अक्षर छबी आरू अन्यन्या गाल्पा’ (पोर्ट्ेट ऑफ दी स्काय अ‍ॅण्ड अदर स्टोरीज) या आसामी लघुकथा संग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. या १३ कथांतून समाजातील गुंतागुंतीचे प्रतिबिंब उमटते. त्यांनी मुद्रित तसेच ई-बुक स्वरूपातील १८ लघुकथा संग्रह लिहिले असून दोन टेलिफि ल्म केल्या आहेत. आसाममधील प्रतिष्ठेचा कथा पुरस्कारही त्यांना मिळाला. याच सैकिया यांनी काळ्या जादूच्या प्रकरणांचा मुकाबला करण्यासाठी ‘प्रहारी’ नावाची मोहीम पोलीस अधिकारी म्हणून राबवली होती. अनेक व्यवस्थापन संशोधन संस्थांत प्रहारी योजना हा अभ्यासाचा विषय ठरला आहे.

ते १९८५ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असून त्यांनी आयआयटी गुवाहाटी येथून ‘गुन्हे व विकास’ या विषयात पीएच.डी. केली आहे. शिवाय पेनसिल्वानिया विद्यापीठाची फुलब्राइट फेलोशिप त्यांना मिळाली आहे. ऑपरेशन बजरंग, ऑपरेशन ऱ्हाइनो अशा अनेक मोहिमांचे नेतृत्व त्यांनी केले. त्यांचा जन्म १९५९ मध्ये कुलधर येथे झाला. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली व नंतर दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे अध्यापन सुरू केले. नियोजन आयोगात भारतीय आर्थिक सेवेत अधिकारी, भारतीय रेल्वे वाहतूक सेवेत अधिकारी व नंतर आयपीएस सेवेत प्रवेश, असा त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. आसाममध्ये काम करताना त्यांनी आर्थिक इकॉनॉमिक पॉलिसी रीसर्च ग्रूपच्या स्थापनेत मोठी भूमिका पार पाडली. गुवाहाटी येथे सोशल पोलिसिंगचा प्रयोग त्यांनी राबवला. एकूणच त्यांनी निवडलेले पोलीस क्षेत्र व दुसरीकडे साहित्यिक असणे या दोन्ही बाबी त्यांना पूरक ठरल्या आहेत. त्यातून दोन्ही क्षेत्रांतील कामगिरी परिपूर्ण होण्यास त्यांना मदतच झाली आहे.