07 July 2020

News Flash

कर्ट थॉमस

अशक्त कर्टला वयाच्या नवव्या वर्षीच हृदयाच्या कुरबुरी सुरू झाल्या. शरीरयष्टी सडपातळ असल्यामुळे आईने डॉक्टरांचा सल्ला घेतला

कर्ट थॉमस

कोणताही खेळाडू अनेक धक्के पचवून, संकटांवर मात करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असतो. अमेरिकेचा जिम्नॅस्टिक्सपटू कर्ट थॉमस याचीही कथा अशीच. त्याच्या निधनाने ती पुन्हा प्रकाशात आली..

फ्लोरिडा राज्यातील मायामी शहरात २९ मार्च १९५६ रोजी कर्ट जन्मला, तो सात वर्षांचा असताना कर्टच्या वडिलांचा अपघातात मृत्यू झाला. आईवर चार मुलांची जबाबदारी, त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. अशक्त कर्टला वयाच्या नवव्या वर्षीच हृदयाच्या कुरबुरी सुरू झाल्या. शरीरयष्टी सडपातळ असल्यामुळे आईने डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी मात्र चिंता करण्याचे काहीच कारण नाही, असा धीर दिला. कर्टने अनेक खेळांत नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला, पण शरीरयष्टीमुळे त्याला यश मिळत नव्हते. अखेर जिम्नॅस्टिक्सचा सराव करत असताना तो या खेळाच्या प्रेमात पडला. या खेळासाठी त्याची शरीरयष्टी उत्तम ठरली; अवघ्या तीन वर्षांत तो राष्ट्रीय प्रकाशझोतात आला. अमेरिकेच्या युवा ऑलिम्पिक कार्यक्रमात त्याला शिष्यवृत्ती मिळाली. विद्यापीठ स्तरावर १३ पदके मिळवल्यानंतर १९७५च्या पॅन अमेरिकन स्पर्धेत, तर १९७६च्या ऑलिम्पिकमध्ये त्याने अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले. ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न हुकल्यावरही कर्टने आपल्यातील कलागुणांनी जगाला मंत्रमुग्ध केले. १९७८ च्या जागतिक स्पर्धेत फ्लोअर एक्सरसाइज प्रकारात अमेरिकेला पहिले जागतिक सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. जागतिक स्पर्धामध्ये तीन सुवर्णपदके मिळवलेल्या कर्टला १९७९ मध्ये ई. सुलिव्हान पदकाने गौरवण्यात आले. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये कर्ट बाजी मारणार, अशी अटळ असतानाच अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेवर बहिष्कार टाकला आणि ऑलिम्पिक पदकाचे त्याचे स्वप्न पुन्हा भंगले. कारकीर्दीत ऐन भरात असतानाही ऑलिम्पिक पदक मिळवता न आल्याचे शल्य त्याला कायम बोचत राहिले. त्यानंतर कर्टने व्यावसायिक जिम्नॅस्टिक्सची वाट धरली. याच दरम्यान त्याने ‘कर्ट थॉमस : ऑन जिम्नॅस्टिक्स’ हे आत्मचरित्र लिहिल्यानंतर साहायक प्रशिक्षकपदाचीही भूमिका निभावली. पॉमेल हॉर्स आणि फ्लोअर एक्सरसाइज या प्रकारात त्याने नवनवीन कसरतींचा शोध लावला. त्यापैकी काही कसरती ‘थॉमस फ्लेअर’ आणि ‘थॉमस साल्टो’ या नावाने प्रचलित झाल्या. निवृत्तीनंतर समालोचनाकडे वळत कर्ट नेहमीच प्रकाशझोतात राहिला. वयाच्या ६४व्या वर्षी म्हणजेच २४ मे रोजी पक्षाघाताचा झटका आला आणि ५ जून रोजी त्याचे निधन झाले. जिम्नॅस्टिक्सला पुरुषी चेहरा मिळवून देणारा खेळाडू हरपला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2020 12:01 am

Web Title: kurt thomas profile abn 97
Next Stories
1 वेद मारवा
2 श्यामला भावे
3 टेरी एल एर्विन
Just Now!
X