25 April 2019

News Flash

ल. रा. नसिराबादकर

संत साहित्याविषयी आपल्याकडे पुष्कळ लिहिले गेले आहे.

संत साहित्याविषयी आपल्याकडे पुष्कळ लिहिले गेले आहे. संत साहित्याचा लेखक प्रा. ल. रा. तथा लक्ष्मण रामदास नसिराबादकर यांनी घेतलेला समग्र वेध साहित्यविश्वात मोठी भर घालणारा आहे. साहित्य, शिक्षण, प्रबोधन, व्याख्यान, मार्गदर्शक, संघटक अशा विविध भूमिकांमधून त्यांची कामगिरी नजरेत भरणारी आहे. ते मूळचे जळगाव जिल्ह्यातील नसिराबादचे, पण रमले ते पश्चिम महाराष्ट्रात; विशेषत: कोल्हापुरात.

मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी शिवाजी विद्यापीठात प्रदीर्घ काळ काम पाहिले. येथेच त्यांनी वाङ्मयाची पूजा बांधली. संत साहित्य हा त्यांच्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय. संत साहित्याचा समग्र वेध घेताना त्यांनी वेगळी वाट चोखाळली. आजवर पुरेसे लक्ष न गेलेल्या संतांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लिखाण केले. ‘प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास’ हे त्यांचे पुस्तक आजही अनेक ठिकाणी संदर्भग्रंथ म्हणून वापरले जाते. त्याच्या दहा आवृत्ती निघणे हे एकच कारण त्याचा दर्जा सिद्ध करण्यास पुरेसे ठरावे. याखेरीज व्यावहारिक मराठी, प्रबोधनाच्या पाऊलखुणा, आचार्य अत्रे साहित्य दर्शन आदीसह त्यांनी सुमारे ३५ पुस्तकांचे लेखन केले. ‘पंढरीची वारी म्हणजे समाज एकत्र करण्याचे माध्यम होय. संतांच्या मुखातून प्रसवणाऱ्या विचारातून समाजसुधारक घडतात. ग्रंथ हे समाजमनाला आकार देणारे असतात,’ असे ते नेहमी सांगत असत.

आधुनिकतावादी ललित, कथात्म साहित्यापेक्षा ते संतसाहित्यात अधिक रमले, याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे समाज आणि साहित्य यांचे नाते कालौघातही कसे टिकून राहते, याचा वेध ते सातत्याने घेत राहिले. ‘सामाजिकदृष्टय़ा उपेक्षितांच्या जीवनाचे मराठी ललित वाङ्मयातील चित्रण (हा त्यांच्या पीएच. डी.च्या प्रबंधाचा विषय होता. ‘सामाजिक दृष्टिकोनातून वाङ्मयाचा अभ्यास’ हा विशेष अभ्यासक्रमही त्यांनी घडविला आणि १९८३ पासून अनेक वर्षे शिकविला. एकंदर मध्ययुगीन साहित्यापासून एकोणिसाव्या शतकातील साहित्यापर्यंतचा काळ हा त्यांनी आपल्या अभ्यासासाठी अनेकदा निवडला.  त्यांनी दिलेल्या तीन हजारांहून अधिक व्याख्यानांमध्ये संत साहित्य, प्रबोधन यांवर भर होता; परंतु ‘अस्मितादर्श’च्या सूचिकार्यात मार्गदर्शन करण्यावर न थांबता, कृतिशील सहभागही त्यांनी नोंदविला. ना. दा. ठा. महिला विद्यापीठाच्या पाठलेखन प्रकल्पाचे कामही त्यांनी केले.

आयुष्यभर चिंतनाचा प्रवास केलेले नासिराबादकर यांनी जीवनाचा अखेरचा प्रवास केला असला तरी त्यांनी साहित्यविश्वात केलेली कामगिरी चिरकाल स्मरणात राहणारी आहे.

First Published on December 7, 2018 12:05 am

Web Title: l r nasirabadkar