बडोदा येथे पार पडणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून रविवारी (१० डिसें.) निवडले गेलेल्या देशमुखांनी एका यशस्वी अ. भा. साहित्य संमेलनाच्या आयोजनातही महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. परभणीत १९९५ मध्ये ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली अ. भा. मराठी साहित्य संमेलन पार पडले. तेव्हा देशमुख हे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर ते या संमेलनाच्या आयोजन समितीत कार्याध्यक्ष होते. हे संमेलन ठोकळेबाज पद्धतीने होऊ नये यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. हिंदीचे विख्यात कवी अशोक वाजपेयी यांना उद्घाटक म्हणून बोलावले गेले. तेव्हापासूनच इतर भाषेतील मान्यवर साहित्यिकास उद्घाटक म्हणून बोलावण्याची परंपरा संमेलनांमधून सुरू झाली. अध्यक्षीय भाषणावरील परिसंवाद, बहुभाषिक कविसंमेलन असे किती तरी उपक्रम या संमेलनात झाले. चंदक्रांत देवतालेंपासून अनेक कवींची हजेरी परभणीच्या साहित्य संमेलनात होती. तेवढेच परिश्रम देशमुखांनी, परभणीतील बी. रघुनाथ स्मारकाच्या उभारणीसाठीही घेतले. कोल्हापूरला जेव्हा ते जिल्हाधिकारी होते तेव्हा शाहू भवन स्मारकाचे नूतनीकरण करून त्यांनी कोल्हापूरच्या सांस्कृतिक जीवनात मोलाची भर घातली. या कलापुरात, स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी केलेले काम हे खूप महत्त्वाचे ठरले.

अर्थात या प्रशासकीय कामांत संवेदनशीलता जागी असल्यानेच त्यांच्यातील लेखक जिवंत राहिला. पाण्यासारख्या प्रश्नावरील दाहकता त्यांनी ‘पाणी! पाणी! पाणी!’ या कथासंग्रहातून मांडली, तर स्त्रीभ्रूण हत्येवर ‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’ हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. बालकामगारांच्या आयुष्यावरही ‘हरवलेलं बालपण’ ही कादंबरी त्यांनी लिहिली. परिश्रमपूर्वक अभ्यास करून त्यांनी ज्या कादंबऱ्या निर्माण केल्या त्यात ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद’चे स्थान वरचे. जनजीवनाचा अभ्यास करताना अपरिचित अशा प्रदेशाचे, संस्कृतीचे चित्रणही त्यांनी आस्थेने केले. चित्रपटसृष्टीबरोबरच उर्दू शायरीचाही त्यांचा अभ्यास मोठा आहे. म्हणूनच गुरुदत्त असो अथवा साहिर लुधियानवी यांच्या चित्र-चरित्राची ओळख देशमुख हे नव्या पलूंसह करून देताना दिसतात.

Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप

लेखकाने साचलेपणातून स्वतला वाचवले पाहिजे. सतत प्रवाही राहूनच अनोखे अनुभवविश्व न्याहाळता येते आणि त्यातूनच लेखकाचाही प्रवास समृद्ध होतो ही बाब देशमुखांनी कायमच मनावर घेतली आहे. जे विषय सर्वसामान्यांना अपरिचित आहेत अशा विषयांचाही अभ्यास करून देशमुखांनी आपल्या लेखनाचा पैस व्यापक करण्याचा प्रयत्न केला.

अकोला, नांदेड, परभणी, सांगली, पुणे, कोल्हापूर अशा ठिकाणी प्रशासकीय कारकीर्द करताना त्यांनी विविध अनुभव घेतले. २०१४ साली मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीचे कार्यकारी संचालक म्हणून ते निवृत्त झाले. प्रशासकीय पातळीवर काम करीत असताना त्यांना असंख्य अनुभव आले. या अनुभवांची जंत्री त्यांनी आपल्या लेखनासाठी आशयद्रव्य म्हणून वापरली. कलात्मक निर्मितीसाठी या अनुभवांचे समर्थपणे उपयोजन केले. त्याचबरोबर प्रशासनातले भलेबुरे अनुभवही त्यांनी आपल्या लेखनातून मांडले. ‘प्रशासननामा’, ‘बखर प्रशासनाची’ ही त्यांच्या प्रशासकीय अनुभवावरील पुस्तके आहेत. नांदेड येथे पार पडलेल्या ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. कथात्म  साहित्याबरोबरच देशमुखांनी विश्लेषक स्वरूपाचे लेखनही केले आहे. अशी विपुल साहित्यनिर्मिती असणाऱ्या देशमुखांची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी व्हावी ही बाब निश्चितच महत्त्वाची आहे.