एके काळच्या युद्धग्रस्त देशांनी अल्पावधीत प्रगतीची झेप घेतल्याची अनेक उदाहरणे जगात आहेत. त्यातले एक म्हणजे दक्षिण कोरिया. युद्धोत्तर काळात या देशाच्या आर्थिक धोरणाचा लाभ घेत जगभरात आपली नाममुद्रा उमटवलेली कंपनी म्हणजे सॅमसंग. या कंपनीचे अध्यक्ष ली कून-ही यांचे नुकतेच निधन झाले.

‘सॅमसंग’ ही कंपनी ली कून-ही यांचे वडील ली ब्यूंग चूल यांनी १९३८ मध्ये स्थापन केली. सुरुवातीला ती मासे आणि फळे निर्यातीपुरती मर्यादित होती. कालांतराने ती ली कून-ही यांनी रीटेल, इलेक्टॉनिकसह अन्य क्षेत्रांत विस्तारली. १९६६ मध्ये ली कून-ही सॅमसंग समूहात दाखल झाले होते. तत्पूर्वी, एका जपानी विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी आणि अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले होते. वडिलांच्या निधनानंतर १९८७ मध्ये ली कून-ही सॅमसंगचे प्रमुख बनले. यानंतर दशकभरातच ली यांनी आपल्या उत्पादनांची ख्याती जगभरात पोहोचवली. त्यासाठी त्यांनी कल्पकता, नावीन्यावर भर दिला. ‘पत्नी आणि मुले वगळता बाकी सर्व बदला’, असा मिश्कील संदेश देत त्यांनी १९९३ मध्ये कर्मचाऱ्यांना केलेले परिवर्तनाचे आवाहन प्रसिद्ध आहे. नव्वदच्या दशकातच सॅमसंगची सदोष उत्पादने जाळण्याचे आदेश त्यांनी दिले होते. संख्येपेक्षा दर्जाला महत्त्व असल्याचे त्यांनी त्यातून दाखवून दिले. खप कमी झाला तरी चालेल, पण दर्जाशी तडजोड करू नये, असे त्यांचे धोरण होते. त्यामुळेच २००६ मध्ये तर सॅमसंगने दूरचित्रवाणी संच उत्पादनात सोनी कॉर्पोरेशनला मागे टाकले होते. स्मार्टफोन, दूरचित्रवाणी संच, मेमरी चिप, स्क्रीन आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनाबरोबरच जीवन विमा, बांधकाम, हॉटेल आदी क्षेत्रांपर्यंत सॅगसंग समूहाचे साम्राज्य पसरले आहे. अ‍ॅपल, हुआवै आदी आघाडीच्या कंपन्यांना मेमरी चिप, डिस्प्ले स्क्रीनचा पुरवठा मुख्यत्वे सॅमसंगकडून होतो. सध्या सॅमसंग समूहाची वार्षिक उलाढाल दक्षिण कोरियाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या एक पंचमांश इतकी आहे.

फोर्ब्जच्या २०१४ च्या जागतिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत ली हे ३५ व्या स्थानावर होते, मात्र उत्तुंग यशोशिखर गाठलेले ली अनेकदा वादातही अडकले. राजकारण्यांना लाच दिल्याच्या आरोपावरून १९९६ आणि करचुकवेगिरीप्रकरणी २००८ मध्ये ते दोषी आढळले. विशेष म्हणजे या दोन्ही वेळा त्यांना राष्ट्राध्यक्षांकडून माफी मिळाली आणि त्यांचा तुरुंगवास टळला.

गेली काही वर्षे त्यांची प्रकृती खालावली होती. हृदयविकाराच्या झटक्यानंतर काही वर्षे ते रुग्णशय्येवर होते. रविवार, २५ ऑक्टोबरला त्यांचे निधन झाले आणि दक्षिण कोरियातील आर्थिक परिवर्तनाचा एक दुवा निखळला.