News Flash

लीला मेनन

त्यांचा जन्म एर्नाकुलममधील वेंगोलामधला. त्यांचे शिक्षण वेंगोला प्राथमिक शाळेत व पेरुम्बवूर इंग्रजी शाळेत झाले

लीला मेनन
लीला मेनन 

सरकारी नोकरीत मिळणाऱ्या वेतनाच्या निम्माही पैसा हातात येणार नसताना त्यांनी २५ वर्षांपूर्वी सरकारी नोकरी सोडून पत्रकारितेत येण्याचा निर्णय हा विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन घेतला. त्यानंतरच्या काळात ‘इंडियन एक्स्प्रेस’पासून पत्रकारितेची सुरुवात करीत त्यांनी पत्रकारितेतील कारकीर्द गाजवली होती. विशेष म्हणजे त्या काळात महिला पत्रकार बोटावर मोजण्याइतक्यासुद्धा नसताना त्यांनी ही वेगळी वाट धरली आणि पुढे मल्याळममधील ‘जन्मभूमी’ या वृत्तपत्राच्या त्या मुख्य संपादक झाल्या.. त्यांचे नाव लीला मेनन. त्यांची निधनवार्ता सोमवारी आली, तेव्हा जुन्या काळातील समर्पित पत्रकारितेचा एक दुवा निखळल्याची हळहळ व्यक्त झाली.

त्यांचा जन्म एर्नाकुलममधील वेंगोलामधला. त्यांचे शिक्षण वेंगोला प्राथमिक शाळेत व पेरुम्बवूर इंग्रजी शाळेत झाले. नंतर त्यांनी हैदराबादला निझाम कॉलेजमधून शिक्षण घेतले. कुणाकडे नसतील अशा विशेष (एक्स्लुझिव्ह) बातम्या देणारे पत्रकार हे नाव कमावतात तसेच लीला मेनन यांना नाव मिळाले. १९७८ मध्ये दिल्लीत ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये सुरुवात करताना त्यांनी अशा बातम्यांचा धडाका लावला. तेथे त्यांनी २२ वर्षे काम केल्यानंतर ‘द हिंदू’, ‘आउटलूक’, ‘माध्यमम्’ यात स्तंभलेखन केले. नंतर ‘जन्मभूमी’च्या मुख्य संपादक झाल्या. त्या अर्थाने त्यांनी पत्रकारितेतील रसरशीतपणा पुरेपूर अनुभवला होता. त्यांना बातमीची जाण तर चांगली होतीच, पण बातम्या मिळवण्यासाठी लागणारे धाडसही त्यांनी दाखवले.

निलांबूर या खेडय़ात वेश्या व्यवसायाचे प्रमाण अधिक होते त्याबाबतची बातमी त्यांनी जोखीम पत्करूनही दिली होती. आज अशा बातम्यांचे फारसे अप्रूप नसले तरी त्या काळात एका महिला पत्रकाराने धाडसाने महिलांच्या वेदनांना वाचा फोडणे धाडसाचे होते. त्या बातमीमुळे भल्या भल्या वृत्तपत्र व मासिकांच्या संपादकांचे डोळे उघडले होते. लैंगिक समानतेचा मुद्दा त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून लावून धरला होता. पलक्कड (पालघाट) जिल्ह्यातील एका घरात, चौघी बहिणींनी १९८९ मध्ये आत्महत्या केली. त्यावर ‘हू किल्ड पालघाट सिस्टर्स?’ हा लेख लिहून लीना मेनन यांनी, हुंडा ही समस्या अविवाहित मुलींना कशी पोखरते आहे, हा मुद्दा चर्चेत आणला.

अखेरच्या काही वर्षांत त्यांना कर्करोगाने ग्रासले. त्यांनी या दुर्धर दुखण्याशी नेटाने झुंज दिली. अखेरच्या काळात त्या कुणालाही ओळखत नसत. ‘निल्यकथा सिंफनी’ हे त्यांचे आत्मचरित्र २००७ मध्ये प्रसिद्ध झाले, त्यात त्यांनी महिला पत्रकार म्हणून आलेले अनुभव कथन केले आहेत. आयुष्यातील अनेक प्रसंगांचे आणि कर्करोगाशी झुंजीचेही वर्णन त्यात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2018 1:12 am

Web Title: leela menon journalist
Next Stories
1 दादाजी खोब्रागडे
2 डॉ. कमलजित बावा
3 एम. एल. थंगप्पा
Just Now!
X