कर्नाटक संगीताच्या क्षेत्रातील कलावंतांचे एक सहज नजरेत भरणारे वेगळेपण म्हणजे, एरवी परंपरेचा दृढ अभिमान बाळगणाऱ्या या संपन्न शैलीमध्ये व्हायोलिन आणि सॅक्सोफोन ही पूर्णपणे परदेशी बनावटीची वाद्ये त्यांनी आपलीशी केली. त्यावर कमालीचे प्रभुत्व मिळवले आणि ज्या देशांत ही वाद्ये निर्माण झाली, त्यांनाही तोंडात बोटे घालायला लागतील असे भारतीय संगीत त्यावर सादर करून दाखवले. कद्री गोपालनाथ हे अशा अतिशय प्रतिभावंत कलावंतांपैकी एक. सॅक्सोफोन या वाद्यावर त्यांचे प्रभुत्व वादातीत होते. ते त्यावर पाश्चात्त्य शैलीचे संगीत वाजवत नसत. कर्नाटक संगीत या वाद्यातून कसे व्यक्त करता येईल, या ध्यासाने पछाडलेल्या कद्री गोपालनाथ यांनी कष्टाने आणि प्रतिभेने त्या वाद्यावर अशी काही हुकमत मिळवली, की बालपणापासून त्यांच्यावर जे संगीत संस्कार झाले होते, ते संगीत त्यांना सॅक्सोफोनमधून निर्माण करता येऊ शकले. वडील तानियप्पा यांच्याकडून संगीताचे बाळकडू मिळाले, तरीही म्हैसूरच्या दरबारातील बँडमध्ये असलेले सॅक्सोफोन हे वाद्य त्यांनी पाहिले आणि त्यांची त्यावर माया जडली. दोन दशके त्यावर मेहनत घेतल्यानंतर त्यांना त्यावर मनातले संगीत वाजवता येऊ शकले. खरे तर हे वाद्य भारतीय संगीतासाठी बनवलेच गेलेले नाही. सामान्यत: बँडमध्ये अतिशय मानाचे स्थान पटकावलेल्या या वाद्याला संगीताच्या मैफलीत आणण्याचे सगळे श्रेय कद्रींकडेच जाते. जॅझ या पाश्चात्त्य संगीत शैलीमध्ये या वाद्याचा पुरेपूर उपयोग केला जातो; पण आपल्या संगीताला अनुकूल असे तांत्रिक बदल करून त्यांनी हे वाद्य आपल्या परंपरेत मिसळून जाईल, याची दक्षता घेतली. वयाच्या तिसाव्या वर्षी चेंबई मेमोरियल ट्रस्टच्या कार्यक्रमात त्यांचे पहिले वादन झाले. कद्री गोपालनाथ यांनी नंतर प्राग, बर्लिन, मेक्सिको, लंडन येथील जॅझ महोत्सवांत सहभाग घेतला आणि ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वादक ठरले. त्यांच्या वादनाचे स्वतंत्र अल्बम प्रसिद्ध झाले आणि त्यांना प्रचंड लोकप्रियताही लाभली. परिणामी, तमीळ चित्रपट संगीतासाठी त्यांना निमंत्रण आले. अमेरिकेतील प्रसिद्ध सॅक्सोफोनवादक रुद्रेश महन्तप्पा यांच्यासह त्यांनी एक अल्बम प्रसिद्ध केला आणि मग अमेरिकेतही त्यांच्या चाहत्यांची संख्या वाढू लागली. ‘पद्मश्री’, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, ‘अस्थाना विद्वान पारितोषक’ यांसारखे सन्मान त्यांच्या वाटय़ाला येणे तर स्वाभाविकच होते. लंडनच्या अल्बर्ट हॉलमध्ये बीबीसीने आयोजिलेल्या कार्यक्रमात कद्री गोपालनाथ यांना वाजवण्याची संधी मिळाली, त्या सभागृहात कला सादर करणारे ते पहिलेच कर्नाटक संगीतातील कलावंत. त्यांच्या निधनाने एक वेगळ्या वाटेने जाणारा आणि परंपरेचाही सन्मान करणारा कलावंत निघून गेला आहे.