फक्त विनोदी लिखाणाच्या दृष्टीने विचार केला तर उर्दूतील पु. ल. देशपांडे असे ज्यांना संबोधता येईल असे एकमेव नाव म्हणजे मुश्ताक अहमद युसूफी. त्यांच्या विनोदाने जगभरातील उर्दू भाषाप्रेमींना खळखळून हसवले व आनंदही दिला.

मुश्ताक अहमद युसूफी यांचा जन्म ४ सप्टेंबर १९२१ रोजी टोंक (राजस्थान) येथे झाला. ते आग्रा विद्यापीठातून तत्त्वज्ञानात एम. ए. झाले. नंतर अलिगढ मुस्लीम विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. पुढे त्यांच्या उर्दू साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना डी लिट ही पदवीही प्रदान करण्यात आली. फाळणीनंतर ते कराचीला गेले. व्यवसायाने ते खरे तर बँकर. पाकिस्तानातील अलाइड बँक, युनायटेड बँक व पाकिस्तान बँकिंग काउन्सिलची सर्वोच्च पदे त्यांनी भूषविली. तेथेही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. अर्थजगतामध्ये वावरत असताना दुसरीकडे त्यांचे विनोदी लेखनही सुरू होते. त्यांचे लिखाण बहुप्रसव झाले नाही. ते स्वांतसुखाय लिखाण करीत असले तरी ते अत्यंत वाचकप्रिय होते. ‘चिराग तले’, ‘खाकम बदहन’, ‘जरगुजिश्त’, ‘आबे गुम’ आणि ‘शामे शहरे यारां’ हे त्यांचे पाच विनोदी लेखसंग्रह उर्दू साहित्य जगतात अफाट लोकप्रिय आहेत. त्यांच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या.

मुश्ताक अहमद युसूफींच्या विनोदाचे विविध रंग होते. ते समाजातील सांस्कृतिक, नैतिक धारणा, मानवी स्वभावाचे वैविध्य, राजकीय व्यक्तिमत्त्वांची अनाकलनीय वृत्ती यावर अत्यंत मिश्कीलपणे व्यंगात्मक भाष्य करीत. कधी तो विनोद वाचकांना खळखळून हसवी तर कधी गालातल्या गालात हसण्यास भाग पाडी. मात्र त्यांच्या विनोदातील व्यंग अथवा उपरोध बोचरा नव्हता, किंबहुना विचार करण्यास प्रवृत्त करणाराच होता.

समाजातील त्याज्य रूढी, परंपरांना विनोदाची टांचणी लावताना ते भ्याले नाहीत. धर्माध वर्ग त्यांच्या लिखाणामुळे कधी दुखावला गेला असेही घडले नाही. पाकिस्तानच नव्हे तर भारतातील उर्दू साहित्यवर्गातील ते सर्वाधिक वाचले गेलेले व लोकप्रिय विनोदी लेखक गणले जातात. त्यांची तुलना उर्दूतील इब्ने इन्शा या नामवंत साहित्यिकाशी केली जात असे.

हजार बाराशे पानांत सामावलेले मुश्ताक अहमद युसूफींचे विनोदी साहित्य उर्दू साहित्याचा मौलिक ठेवा मानला जातो. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. आदमजी पुरस्कार, सितारा ए इम्तियाज, हिलाल ए इम्तियाज, पाकिस्तान अकादमी ऑफ लेटर्स, कायदे आजम मेमोरियल मेडल आदींचा त्यात समावेश आहे. हिलाल ए इम्तियाज हा पाकिस्तानात साहित्य क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. कृतार्थ आयुष्य जगल्यानंतर बुधवारी युसूफी यांनी ९७ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. ज्याने आयुष्यभर आपल्याला हसवले त्याच्या निधनवार्तेने  मात्र असंख्य साहित्यप्रेमींचे डोळे नक्कीच पाणावले असतील..