18 January 2021

News Flash

लेफ्ट. जन. के. पी. धालसामंता (निवृत्त)

 वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी ते तोफखाना दलात दाखल झाले.

लेफ्ट. जन. के. पी. धालसामंता (निवृत्त)

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादय़ांविरोधातील कारवाई असो किंवा कारगिल युद्धात पर्वतरांगांमध्ये दडलेल्या शत्रूवर बोफोर्स मारा करण्यासाठी स्थळनिश्चिती; अशा अनेक मोहिमांत आघाडीवर राहिलेले लेफ्टनंट जनरल के. पी. धालसामंता (निवृत्त) यांचे नुकतेच निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. ओदिशात जन्मलेल्या या योद्धय़ाने १९७१ च्या युद्धातही सहभाग नोंदविला. पूर्व सीमेवर त्यांनी विलक्षण कामगिरी नोंदविली होती. याबद्दल पूर्वी मानांकनाने त्यांना सन्मानित करण्यात आले. बांगलादेशने मुक्तिसंग्रामातील त्यांचे योगदान स्मरणात ठेवले. बांगलादेशमध्ये नेहमी आमंत्रित करून त्यांच्याप्रति आदरभाव राखण्यात आला.

वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी ते तोफखाना दलात दाखल झाले. जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी म्हणून सियाचेनची ओळख. या बर्फाच्छादित युद्धभूमीवर तोफखाना दलाच्या रेजिमेंटचे नेतृत्व करण्याची त्यांना संधी मिळाली. जम्मू-काश्मीरमधील त्यांच्या दीर्घ अनुभवाचा उपयोग कारगिल युद्धात झाला. पर्वतांवर कब्जा करणाऱ्या घुसखोरांना पिटाळण्यासाठी तोफगोळे डागण्याचे निश्चित झाले. बोफोर्स तोफा आणण्यात आल्या. उत्तुंग क्षेत्रात तोफा नेणे आणि पर्वतावर दडलेल्या शत्रूवर अचूक निशाणा साधणे, यासाठी त्यांची योग्य स्थळावर तैनाती महत्त्वाची ठरते. प्रतिकूल परिस्थितीत बोफोर्स तैनात करताना त्यांचे कौशल्य अधोरेखित झाले. या युद्धात बोफोर्स तोफांनी केलेला ‘अग्निवर्षांव’ कायमस्वरूपी स्मरणात राहणारा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या विशेष दलांपैकी ‘राष्ट्रीय रायफल्स’चे महासंचालक म्हणून धालसामंता यांनी काम पाहिले. ९२ हजार जवानांचा सहभाग असणाऱ्या राष्ट्रीय रायफल्सच्या आधुनिकीकरणास दिशा, गती देण्याचे काम त्यांनी केले. बिहार, झारखंड, ओदिशा या तीन राज्यांचे सब एरिया कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळताना नैसर्गिक आपत्तीप्रसंगी नागरिकांच्या बचावासाठी लष्कराची ताकद उभी केली. इतकेच नव्हे तर, आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य प्रभावीपणे होण्यासाठी कार्यप्रणाली, धोरणनिश्चितीत त्यांचे योगदान राहिले. बिहारमधील पूर असो की राजधानी एक्स्प्रेसचा अपघात, मदतकार्यात त्यांचे दल सक्रिय राहिले. लष्कर आणि नौदलाच्या अधिकारी निवड प्रक्रिया केंद्राचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. जवळपास पाच हजार प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. निवृत्तीनंतरही त्यांचे काम सुरू राहिले. नव्याने स्थापन झालेल्या लष्कराच्या लवाद मंडळाचे ते सदस्य होते. लष्कराची मानसशास्त्र संशोधन संस्था आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तज्ज्ञ समितीत त्यांचा सहभाग होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 12:00 am

Web Title: lieut gen kp dhal samanta profile abn 97
Next Stories
1 रिफात चादिरजी
2 स्टर्लिग मॉस
3 अशोक देसाई
Just Now!
X