मालवणातील रेवंडी, तळाशील, तोंडवळी हा पट्टा नाटय़कलाकारांची खाण आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. नुकतेच दिवंगत झालेले ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी हेही रेवंडीचेच. अनेक गाजलेल्या नाटकांतून उत्तम कामे करूनही कलावंत म्हणून ते काहीसे दुर्लक्षित राहिले. अभिनेता म्हणून छाप पडावी असा चेहरा नसूनही त्यांनी आपल्या अंगभूत कलागुणांनी अभिनेता, दिग्दर्शक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात निर्माते मोहन तोंडवळकर यांनी त्यांना प्रथम हेरले आणि आपल्या ‘कलावैभव’ संस्थेत आणले. ही संस्था मुख्य धारेत अनवट नाटके करण्यासाठी प्रसिद्ध. साहजिकच विजया मेहता, विक्रम गोखले, डॉ. श्रीराम लागू यांच्यासारख्यांचा संस्थेच्या नाटकांतून वावर. लीलाधर कांबळी यांच्यातला जातिवंत कलावंत अशांच्या सहवासात न घडता तरच नवल. ‘नयन तुझे जादूगार’मधून त्यांनी रंगभूमीवर एन्ट्री घेतली आणि मग कधी मागे वळून पाहिलेच नाही. ‘हिमालयाची सावली’, ‘दुभंग’, ‘कस्तुरीमृग’, ‘काचेचा चंद्र’, ‘वस्त्रहरण’, ‘वात्रट मेले’, ‘हसवाफसवी’, ‘फनी थिंग कॉल्ड लव्ह’ अशा वैविध्यपूर्ण नाटकांतून त्यांनी आपले नाणे खणखणीतपणे वाजवून दाखवले. गंगाराम गवाणकरांच्या ‘वात्रट मेले’चे दिग्दर्शन आणि त्यातली घाडगेमामांची त्यांची भूमिका दीर्घकाळ रसिकांच्या मनात घर करून राहिली. या नाटकाचे तब्बल अडीच हजारांवर प्रयोग झाले. दिलीप प्रभावळकरांच्या ‘हसवाफसवी’त ते संयोजक वाघमारेंसह विविध पात्रे लीलया साकारत. त्या- त्या पात्राची स्वभाववैशिष्टय़े जाणून घेत, अत्यंत लवचीक अभिनयशैलीतून त्यांनी साकारलेल्या या भूमिका अभिनयातील साद-प्रतिसादाचा वस्तुनिष्ठ नमुना ठरावा. भरत दाभोळकरांच्या ‘फनी थिंग कॉल्ड लव्ह’ या ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ नाटकावर बेतलेल्या हिंग्लिश नाटकातले डिकोस्टा हे पात्र इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसूनही कांबळी यांनी असे काही साकारले, की उच्चभ्रू इंग्रजी प्रेक्षकांनीही त्यांना डोक्यावर घेतले. या नाटकात खास त्यांच्याकरता एक इंग्रजी गाणे घातले गेले आणि तेही या नाटकाचे आकर्षण ठरले. कर्टन कॉलच्या वेळी त्यांना सर्वाधिक टाळ्या मिळत. या नाटकात अनेक कलाकार वेळोवेळी बदलले, परंतु पहिल्या प्रयोगापासून ते शेवटच्या प्रयोगापर्यंत एकमेव लीलाधर कांबळी तेवढे कायम होते. विलक्षण बोलका मुद्राभिनय, तदनुषंगिक हालचाली, निष्पाप, निरागस चेहऱ्याने केलेले तल्लख विनोद ही त्यांच्या अभिनयाची खासीयत. मालवणी माणसाची तिरकस विनोदबुद्धी त्यांच्या सबंध नाटय़प्रवासात त्यांना लाभदायी ठरली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 12:01 am