14 December 2018

News Flash

ए. जी. मिल्खा सिंग

मिल्खा सिंग यांनी वयाच्या १७व्या वर्षी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केले.

मिल्खा सिंग यांच्या नावाआधीची ए. जी. ही अक्षरे, नाव लिहिण्याच्या दाक्षिणात्य शैलीतून आली आहेत. अमृतसर गोविंदसिंग हा त्या लघुरूपाचा विस्तार. ए. जी. मिल्खा सिंग यांचे आजोबा १९०४ मध्ये अमृतसरहून तत्कालीन मद्रास राज्यात (तामिळनाडू) वीजतारांचा व्यवसाय करण्यासाठी आले, इथलेच झाले. या कुटुंबाने क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव अधोरेखित केले. या कुटुंबातील मिल्खा, कृपाल, सतविंदर आणि अर्जन या चौघांनीही रणजी क्रिकेटमध्ये तामिळनाडूचे प्रतिनिधित्व केले. यापैकी कसोटीपर्यंत पोहोचलेले मिल्खा हे निर्भय आणि शैलीदार डावखुऱ्या फलंदाजीसाठी विशेष ओळखले जात. याचप्रमाणे १९६०च्या दशकातील ते निष्णात क्षेत्ररक्षक मानले जात. हृदयविकाराच्या झटक्यामुळे गेल्या शुक्रवारी (१० नोव्हेंबर) त्यांचे निधन झाल्याने तामिळनाडू आणि भारतीय क्रिकेटमधील एक दुवा निखळला आहे.

मिल्खा सिंग यांनी वयाच्या १७व्या वर्षी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केले. १९६१-६२ मध्ये दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तर विभागाविरुद्ध खेळताना त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक झळकावले. स्थानिक क्रिकेटमधील याच कामगिरीच्या बळावर १८व्या वाढदिवसानंतर काही दिवसांतच त्यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य लाभले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी पदार्पण केले, पण दीड वर्षांच्या छोटेखानी कारकीर्दीत त्यांना भारताकडून चारच कसोटी सामने खेळता आले. यात त्यांनी १५.३३च्या सरासरीने एकंदर ९२ धावा केल्या. मिल्खा यांच्याकडे परिपक्वता आणि प्रथम श्रेणी क्रिकेटचा पुरेसा अनुभव गाठीशी होता; परंतु तरीही त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द मर्यादित राहिली. ३५ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली.

मद्रासकडून खेळताना मिल्खा सिंग यांची रणजी करंडक स्पर्धेतील कारकीर्द मात्र बहारदार अशीच होती. ते नेहमी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरायचे. तिसऱ्या क्रमांकावर मिल्खा फलंदाजीला उतरले नाही की, प्रतिस्पर्धी संघालाही आश्चर्य वाटायचे. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८८ सामन्यांमध्ये ३५.४४च्या सरासरीने आठ शतकांसह एकंदर ४३२४ धावा केल्या. १५१ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. ही आकडेवारी जरी बोलकी असली तरी त्यांच्या संस्मरणीय खेळी आणि त्यांची वैशिष्टय़े ही आकडय़ांच्या पलीकडे होती. खेळपट्टय़ा किंवा प्रतिस्पर्धी गोलंदाजांची तमा न बाळगता त्यांनी आपल्या राज्याच्या आणि दक्षिण विभागाच्या संघाला अनेकदा कठीण परिस्थितीतून तारले.

मिल्खा यांचे क्रिकेटवर निस्सीम प्रेम होते. गगनचुंबी षटकार खेचायला मला अतिशय आवडतात. चेंडू मैदानाबाहेर रस्त्यावर भिरकवायला मला आवडतो, असे मिल्खा आत्मविश्वासाने सांगायचे. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून नोकरी करताना क्रिकेट संघाचेही प्रतिनिधित्व केले. मिल्खा यांचे मोठे बंधू कृपाल सिंग हेसुद्धा तंत्रशुद्ध फलंदाज. कसोटी पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या कृपाल यांनी १४ कसोटी सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले होते. १९६१-६२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या एका कसोटी सामन्यात हे दोन्ही भाऊ खेळले होते. याचप्रमाणे चपळतेसाठी ओळखला जाणारा चुलत भाऊ सतविंदरसुद्धा धडाकेबाज फलंदाज. तसेच त्याचे वडील ए. जी. राम सिंग हे डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीसह अष्टपैलू खेळाडू होते. मिल्खा यांचा पुतण्या अर्जन कृपाल सिंगने तामिळनाडूकडून खेळताना १९८७ मध्ये गोव्याविरुद्ध ऐतिहासिक त्रिशतक झळकावले होते. त्याने त्रिशतकवीर डब्ल्यू. व्ही. रमणसोबत विक्रमी भागीदारी रचल्यामुळेच तामिळनाडूने ९१२ धावांचा डोंगर उभारला होता.

मिल्खा सिंग यांच्या कुटुंबीयांचे क्रिकेटशी असलेले ऋणानुबंध शतकाहून अधिक वर्षांचे आहेत. मिल्खा यांच्या निधनानंतर उरली आहे ती, ‘समयसूचकतेचे वरदान लाभलेल्या या गुणी फलंदाजाला कसोटी क्रिकेटमध्ये आणखी संधी मिळायली हवी होती’ ही क्रिकेटच्या दर्दीची हळहळ!

First Published on November 14, 2017 2:19 am

Web Title: loksatta vyakti vedh a g milkha singh