12 December 2017

News Flash

अहमद कथराडा

दक्षिण आफ्रिकेचे भूमिपुत्र दारिद्रय़, अज्ञान, रोगराई यांनी पुरते पिचून गेले होते.

लोकसत्ता टीम | Updated: March 30, 2017 3:00 AM

अहमद कथराडा

दक्षिण आफ्रिकेचे भूमिपुत्र दारिद्रय़, अज्ञान, रोगराई यांनी पुरते पिचून गेले होते. तेथील वर्णद्वेषी राजवटीमुळे ही जनता माणुसकीलाही पारखी झाली होती. त्या वेळी नेल्सन मंडेलांनी स्वातंत्र्य, लोकशाही व स्वयंप्रशासनासाठी लढा उभारण्याचे ठरवले. त्यांना अनेक समविचारी सहकारी मिळाले. मंडेला यांना तब्बल २७ वर्षे यासाठी कारावासात काढावी लागली. या काळात भारतीय वंशाचे अहमद कथराडा यांनीही मंडेला यांना मोलाची साथ दिली. २६ वर्षे आणि तीन महिने तेही मंडेलांसोबत तुरुंगात राहिले.

कॅथी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अहमद कथराडा यांचे आई-वडील सुरतचे रहिवासी होते. नंतर ते दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित झाले. वयाच्या १७ व्या वर्षी ते वर्णद्वेषविरोधी चळवळीत ओढले गेले. १९५१ मध्ये ते ट्रान्सवाल इंडियन युथ काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९५५ च्या सुमारास भारतीय शाळा जोहान्सबर्ग शहराबाहेर हलवण्याच्या तयारी सुरू झाल्याचे कळताच कथराडा यांनी पालकांची संघटना उभारून त्यास विरोध केला. १९५६ मध्ये १५६ जणांवर  खटला भरला. यात कथराडा यांचाही समावेश होता. पोलिसांनी अनन्वित छळ करूनही त्यांनी माघार घेतली नाही. १९६० मध्ये तेथील राजवटीने आफ्रिकन नॅशनल काँग्रेस (एएनसी) वर बंदी घातली. त्यानंतर दोन वर्षे कथराडा हे नजरकैदेतच होते. नंतर ते पोलिसांना गुंगारा देऊन भूमिगत झाले, मात्र एएनसीच्या सशस्त्र गटात राहून वर्णद्वेषी राजवटीविरुद्धच्या लढय़ात ते सक्रियच होते. १९६३ मध्ये रिव्होनिया येथे लिलीलीफ शहरातील एका शेतात महत्त्वाची गुप्त बैठक चालू असल्याची खबर पोलिसांना मिळताच त्यांनी लगेच तेथे छापा टाकून कथराडा व त्यांच्या काही सहकाऱ्यांना अटक केली. नंतर मग त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन खटला भरला गेला. दक्षिण आफ्रिकेच्या काळ्याकुट्ट पर्वात तो रिव्होनिया खटला म्हणून गाजला. या गुन्ह्य़ात त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. तुरुंगात अत्यंत कठोर व मेहनतीचे काम त्यांना देण्यात आले. याच तुरुंगात नेल्सन मंडेला, वॉल्टर सिसुलू, डेनिस गोल्डबर्ग हेही त्यांच्यासमवेत होते. दिवसभर अंगमेहनतीचे काम केल्यानंतर तशाही परिस्थितीत रात्री ते अभ्यास करीत. तेथे राहूनच इतिहास आणि गुन्हेशास्त्रात त्यांनी बीए केले. पुढे आणखी दोन पदव्या त्यांनी मिळवल्या.

१९९० मध्ये एएनसीवरील बंदी उठली. वर्णविद्वेषी राजवट संपुष्टात आल्यानंतर झालेल्या निवडणुकीत कथराडा हे खासदार म्हणून निवडून आले. १९९४ ते ९९ या काळात राष्ट्राध्यक्ष मंडेला यांचे ते संसदीय सल्लागार होते. १९९९ मध्ये त्यांनी राजकारण सोडले. मानवी हक्क, सामाजिक न्याय आणि साहित्य या क्षेत्रांत त्यांना गती असल्याने आपल्या वर्णद्वेषी राजवटीविरोधी लढय़ातील अनुभव त्यांनी साहित्यातून जिवंत केले. रॉबिन बेट व पोल्समूर तुरुंगांतील आठवणी वा आपल्या भाचीला त्यांनी लिहिलेली पत्रे त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. दक्षिण आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाबद्दल मिशिगन, मॅसेच्युसेट्स आदी चार विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट देऊन कथराडा यांचा गौरव केला. २००५ मध्ये प्रवासी भारतीय हा सन्मानही त्यांना मिळाला होता. त्यांनी सुरू केलेल्या अहमद कथराडा फाऊंडेशनला गेल्याच वर्षी केंद्र सरकारने २० लाख रुपयांची मदत केली होती. ८७ व्या वर्षी, मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली तेव्हा दक्षिण आफ्रिकेतील विवेकशील नेतृत्व आणि सच्चा भारतप्रेमी गमावला, अशीच भावना सर्वानी व्यक्त केली.

First Published on March 30, 2017 2:59 am

Web Title: loksatta vyakti vedh ahmed kathrada