28 September 2020

News Flash

अहमद खान

अहमद यांना फुटबॉलचे बाळकडू त्यांचे वडील बाबा खान यांच्याकडून लाभले.

भारताने ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील फुटबॉलमध्ये सहभागी होण्याचा मान मिळविला होता, एवढेच नव्हे तर उपान्त्य फेरीपर्यंतही मजल मारली होती असे कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही. आता पहिल्या शंभर क्रमांकांमध्येहीभारताला स्थान नाही; पण सुमारे ७० वर्षांपूर्वीचा भारतीय फुटबॉल संघ जागतिक क्रमवारीतील पहिल्या वीस क्रमांकांमधील संघ होता! ज्या काळी फुटबॉलपटूंसाठी किंबहुना सर्वच खेळाडूंसाठी फारशा सुविधा व सवलती नव्हत्या अशा आव्हानात्मक दिवसांत अहमद खान यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताकडून प्रतिनिधित्व केले होते. या अहमद खान यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. भारतीय फुटबॉल क्षेत्रात पन्नासहून अधिक वर्षे ते कार्यरत होते.

अहमद यांना फुटबॉलचे बाळकडू त्यांचे वडील बाबा खान यांच्याकडून लाभले. बाबा खान हे तेव्हाच्या ‘बँगलोर क्रीसेंट’ फुटबॉल संघाचे कर्णधार होते. वडिलांप्रमाणेच आपणही याच खेळात नाव कमवायचे असे अहमद यांनी लहानपणापासूनच ठरविले. अहमद यांचे अमजद, शरमत व लतिफ हे तीनही बंधू फुटबॉलच खेळत असत. कोण जास्त गोल करतो अशी अहमहमिकाच या बंधूंमध्ये असायची. अहमद यांच्याकडे उपजत डाव्या पायाने अव्वल दर्जाचा खेळ करण्याची शैली होती. त्यातही अनवाणी खेळणेच त्यांना पसंत असायचे. अहमद हे आपल्या वडिलांसमवेत बेंगळूरु संघाकडून खेळत असत. त्यामुळे खेळातील अनेक बारकावे त्यांना प्रत्यक्ष मैदानावरच वडिलांकडून मिळाले. चेंडूवर त्यांचे अफाट नियंत्रण असायचे. आपल्या मैदानातून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारताना ज्या वेगाने व कल्पक चाली करीत ती शैली सर्वानाच थक्क करणारी असायची. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याची हातोटी त्यांच्याकडे होती.

अहमद यांनी १९४८ व १९५२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत आपला ठसा उमटविला होता. लंडन येथील ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्याच सामन्यात फ्रान्सकडून पराभवाचा धक्का बसला. हा सामना फ्रान्सनेजिंकला, मात्र प्रेक्षकांची मने भारतीय खेळाडूंनी विशेषत: अनवाणी खेळणाऱ्या अहमद यांनीच जिंकली, असे वर्णन त्या वेळी अनेक प्रसारमाध्यमांनी केले होते. १९५१ मध्ये भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळविले. त्या वेळी अहमद यांच्या कौशल्याचा सिंहाचा वाटा होता. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी युगोस्लाव्हियाविरुद्ध केलेला गोल अतिशय संस्मरणीय गोल म्हणून ओळखला जातो. त्यांनी घातलेल्या भक्कम पायामुळेच भारताला १९५६ च्या ऑलिम्पिकमध्ये उपान्त्य फेरीत धडक मारता आली होती. दुर्दैवाने अहमद यांना या स्पर्धेत भाग घेता आला नाही. मात्र या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंनी अहमद यांच्याकडून मौलिक सूचना मिळविल्या होत्या. ईस्ट बंगाल या नावाजलेल्या क्लबचे त्यांनी दहा वर्षे प्रतिनिधित्व केले. रोव्हर्स चषक स्पर्धेसह अनेक स्पर्धामध्ये अहमद यांच्या प्रभावी खेळाच्या जोरावर ईस्ट बंगाल संघाने अव्वल दर्जाची कामगिरी केली. स्वत:बरोबरच आपल्या सहकाऱ्यांनाही गोल करण्यासाठी मदत करण्यात त्यांचा पुढाकार होता. वैयक्तिक कामगिरीपेक्षाही संघनिष्ठा महत्त्वाची असे ते नेहमी मानत असत.

स्पर्धात्मक फुटबॉलमधून निवृत्त झाल्यानंतरही त्यांचे फुटबॉलवरील प्रेम कमी झाले नाही. नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी ते अनेक संघांना स्वत:हून मदत करीत असत. हल्लीच्या फुटबॉलपटूंना भरपूर सुविधा व सवलती मिळत आहेत. बाराही महिने व्यावसायिक सामने सुरू असल्यामुळे या खेळाडूंच्या आर्थिक समस्याही दूर झाल्या आहेत. या खेळाडूंनी अहमद यांच्यासारख्या महान खेळाडूंचा आदर्श ठेवला तर पुन्हा भारतीय फुटबॉल क्षेत्रास वैभवशाली दिवस प्राप्त होतील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 2:48 am

Web Title: loksatta vyakti vedh ahmed khan
Next Stories
1 एस. पी. त्यागराजन
2 उषाताई चाटी
3 देवेंद्र झाझरिया
Just Now!
X