वस्तू व सेवा करामुळे तिजोरीत भरभक्कम वाढ झाल्याबद्दल केंद्र सरकार स्वतचीच पाठ थोपटून घेत असले तरी, या करप्रणालीला प्रांतवादातून वैचारिक विरोध झाला. भारतासारख्या प्रांतवादावर आधारित संसदीय लोकशाही देशात प्रत्येक राज्यांची विकासाची प्रक्रिया आणि प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. त्यामुळे राज्य सरकारांना आर्थिक स्वातंत्र्य असायलाच हवे. जीएसटीमुळे प्रांतवादावरच गदा आणली गेली, असा मतप्रवाह अजूनही प्रबळ आहे, त्याचे कडवे कम्युनिस्ट अर्थशास्त्री अशोक मित्रा समर्थक होते. इंदिरा गांधींच्या केंद्रीभूत सत्ताराजकारणालाही त्यांनी प्रांतिक स्वातंत्र्यांच्या मुद्दय़ावरूनच विरोध केला होता. बिगर काँग्रेस प्रांतिक सरकारांना एकत्र आणण्याच्या प्रक्रियेत मित्रांचा हात मोठा होता. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सत्तेची गणितेच बदलून गेली हा भाग वेगळा!

वास्तविक, मित्रा इंदिरा गांधी यांच्या सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. त्याआधी त्यांनी कृषिमूल्य आयोगात शेती मालाचे हमीभाव ठरवण्यात मोठी भूमिका बजावली होती.  इंदिरा सरकार ‘गरिबी हटाव’च्या नाऱ्यावर स्वार झाले असताना मित्रांनी मात्र सरकारच्या धोरणांवर सणसणीत टीका केली. मित्रा यांनी डावे अर्थशास्त्र पश्चिम बंगालमध्ये प्रत्यक्ष अमलात आणले. ज्योती बसू यांच्या पहिल्या बिगर काँग्रेसी सरकारमध्ये मित्रा सलग ९ वर्षे अर्थमंत्री होते. मित्रांनी दोन महत्त्वाच्या अर्थ-राजकीय सुधारणा घडवून आणल्या. शेतजमिनीचे फेरवाटप, शेती उत्पादनातील वाढीसाठी भरघोस निधीपुरवठा आणि सिंचनप्रकल्पांना दिलेले प्राधान्य हे अर्थमंत्री मित्रांचे योगदान आहे. मित्रांची तीन स्तरीय पंचायत राज व्यवस्था लागू केली आणि सत्ता-राजकारणाचे विकेंक्रीकरण केले. पुढे राजीव गांधींच्या काळात हा प्रयोग देशभर लागू झाला. नरसिंह राव यांच्या काळात भारतात नवभांडवलवादी अर्थव्यवस्था लागू झाली तेव्हा या कम्युनिस्ट अर्थशास्त्रीला पक्षाने (माकप) खासदार म्हणून दिल्लीत पाठवले.  नवभांडवलवादी अर्थव्यवस्थेत विकसित देश व्यापार शर्तीच्या आधारे विकसनशील देशांना कसे लुबाडत आहेत, या मुद्दय़ाचा त्यांनी संसदेत सातत्याने पाठपुरावा केला. जागतिक व्यापार परिषदेतील बुद्धिसंपदा हक्कांच्या चर्चेत विकसीनशील देशांची पीछेहाट होत होती, हाच मुद्दा मित्रा अधोरेखित करत राहिले.  मित्रा यांनी बंगाली आणि इंग्रजीत विपुल लिखाण केले, त्याबद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.  कम्युनिस्ट विचारांशिवाय तरणोपाय नाही असे मानणारा विख्यात अर्थशास्त्री, सक्रिय राजकारणी, बुद्धिवादी कामगारदिनी कायमचा निघून गेला.