पॉप किंवा रॉक बॅण्डबाबत एक शिरस्ता कायम पाहायला मिळतो. तो म्हणजे गाणारा हाच त्या बॅण्डचे सारथ्य करतो. सर्वात प्रसिद्धी आणि ख्याती त्याच्या वाटेला असते. म्हणजे ‘यूटू’ बॅण्ड म्हटले की बोनो सर्वाना माहिती असतो, त्याच्या लिड गिटारिस्टबाबत नावापासून काही माहिती नसते. ‘पोलीस’ बॅण्डमधला गाणारा स्टिंग पाश्चात्त्य पॉप ऐकणाऱ्यांच्या परिचयाचा असतो. पण त्यांच्या गाण्यात ऱ्हिदमने जीव ओतणारा ड्रमर कोण आहे, याची दखल कुणालाही घ्यायची नसते. या सर्वाना अपवाद ठरविले होते, ते ‘एसीडीसी’ या ऑस्ट्रेलियन बॅण्डने. हार्डरॉक म्हणजेच वेगवान गिटारने घणघणून टाकणारी त्यांची गाणी ऐकणारा वर्ग म्हणजे गन्स एन् रोज, डायर स्ट्रेट्स यांच्याहून अधिक दंगा संगीतातून अपेक्षित असणारा होता आणि विशेष म्हणजे या बॅण्डच्या गायकाऐवजी लक्षवेधी होते ते त्याचे निर्माते आणि गिटारिस्ट माल्कम आणि अँगस यंग. एमटीव्ही युगानंतर अमेरिकी आणि ब्रिटिश बॅण्ड्सनी म्युझिक व्हिडीओ बनवून घराघरांत आपले चाहते तयार केले. त्या काळाआधी ऑस्ट्रेलियामध्ये तयार झालेल्या एसीडीसी बॅण्डची कल्पना होती ती गिटारिस्ट माल्कम यंग याची. स्कॉटलंडमध्ये जन्मलेल्या या कलाकाराच्या कुटुंबाने युरोपात आलेल्या भीषण थंडीच्या लाटेमुळे ऑस्ट्रेलियात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण नातेवाईकांसह लहानपणी ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झालेल्या माल्कमने गिटारवर हुकूमत मिळविली आणि त्यानंतर आपला भाऊ अँगस याच्यासोबत एसीडीसी बॅण्डची स्थापना केली. हे एसीडीसी नाव त्यांनी उचलले ते बहिणीच्या शिलाई मशीनवर लिहिलेल्या अक्षरांना पाहून. विशीतला माल्कम आणि त्यांचा गायक बॉन स्कॉट यांनी गिटार आणि शब्दांची जुगलबंदी करीत हैदोस घातला. १९७५ मध्ये ‘हाय व्होल्टेज’ हा नावाला जागणाऱ्या उग्र गाण्यांचा अल्बम आला. त्यानंतर या बॅण्डचे लक्ष युरोप आणि अमेरिकी संगीत बाजाराकडे गेले. त्यादरम्यान माल्कम याने अनेक बॅण्ड मेंबर्सना, मॅनेजर्सना काढून आपले बॅण्डमधील वर्चस्व सिद्ध केले. बॅण्डच्या बॉन स्कॉट या गायकाचा अतिमद्यपानाने मृत्यू झाल्यावर हा बॅण्ड पुन्हा उभा राहणार नाही अशी अटकळ मांडली जात असतानाच हा बॅण्ड नव्या गायकासह परतला. रॉक बॅण्ड ऐकणाऱ्यांचे पंथ असतात. म्हणजे ईगल्सचे हॉटेल कॅलिफोर्निया, गन्स एन रोजचे नथिंग एल्स मॅटर ऐकणारे संगीतवेडे वेगळे. पण एसीडीसीची सगळी गाणी माल्कम यंगच्या गिटार रिफमुळे प्रसिद्ध होती आणि अँगस यंग स्टेजवर वादन करताना शाळकरी मुलाच्या थाटात ती सादर करून लोकांची वाहवा मिळवी. एसीडीसीच्या टॉपटेन गाण्यांपैकी दाहीच्या दाही गाणी ही स्टेज दणाणून सोडणारी पाहायला मिळतील. या बॅण्डचे सर्वात मोठे योगदान म्हणजे माल्कम यंगने गिटारवादनाच्या शैलीमध्ये आणलेली गती आणि त्या वादनाचा पुढल्या रॉक पिढीने घेतलेला आदर्श. आज माल्कम गिटार स्टाइल शिकविणारे किंवा त्याचे वादन दर्शन करून देणारे कैक व्हिडीओज गुगल व्हिडीओवर सापडतील. इलेक्ट्रिक गिटार वादनाची ही चित्रविचित्र पद्धत पारंपरिक वाद्य समीकरणांत बसत नाही.

१९७३ पासून २०१४ पर्यंत संगीत जगतातील सगळेच मान-सन्मान मिळविणाऱ्या या कलाकाराला स्मृतिभ्रंशाने ग्रासले होते. परवा त्याचे निधन झाले तेव्हा सगळ्या रॉक जगताने त्याला मानाचा मुजरा दिला. रॉक म्युझिकचा प्रवाह एसीडीसीने समृद्ध केल्यामुळे माल्कम यंग या क्षेत्रात कायम ‘जिवंत’ राहणार आहे.