22 January 2019

News Flash

अवैस शेख

अवैस यांचे चिरंजीव शाहरुख यांनी फेसबुकवरून ही माहिती दिली.

पाकिस्तानच्या तुरुंगात मरण पावलेले भारतीय कैदी सबरजीत सिंग यांचे पाकिस्तानी वकील अवैस शेख यांच्या स्वीडनमध्ये नुकत्याच झालेल्या निधनाने भारताने एक सच्चा मित्र गमावला आहे. अवैस यांचे चिरंजीव शाहरुख यांनी फेसबुकवरून ही माहिती दिली. नेमक्या अशाच भावना त्यांच्या निधनानंतर सरबजीतच्या भगिनी दलबीर कौर यांनी भारतात व्यक्त केल्या. अवैस यांच्या निधनाने मी दुसरा भाऊ गमावला आहे, असे दलबीर कौर म्हणाल्या. मृत्यूपूर्वी अवैस यांचे दलबीर यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषणही झाल्याच्या आठवणी दलबीर यांनी सांगितल्या. अवैस हे स्वीडनमध्ये खूश होते. त्यांनी भारतात तसेच पाकिस्तानमध्ये लाहोरला जाण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच सरबजीतची थोरली मुलगी स्वपनदीप हिच्याशीही ते बोलले, असेही दलबीर यांनी सांगितले.

पंजाबमधील तरणतारण जिल्ह्य़ातील भिखिविंड गावचे मूळ रहिवासी सरबजीत यांच्यावर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात १९९० साली बॉम्बस्फोट घडवून १४ पाकिस्तानी नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा तसेच पाकिस्तानात हेरगिरी केल्याचा आरोप होता. अवैस शेख हे सरबजीत यांचे २०१० ते २०१३ सालापर्यंत वकील होते. मे २०१३ मध्ये पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगात अमीर सरफाराज ऊर्फ तांबा आणि मुदस्सर या दोघा कैद्यांनी हल्ला केल्याने सरबजीत यांचा मृत्यू झाला. तोपर्यंत अवैस यांनी सरबजीतच्या सुटकेसाठी अविरत प्रयत्न केले.  इतकेच नव्हे तर पाकिस्तान-इंडिया पीस इनिशिएटिव्हचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पाकिस्तानचा खोटेपणा उघड पाडण्यातही हातभार लावला. भारताचे कोणतेही कैदी पाकिस्तानमधील तुरुंगात नाहीत असे पाकिस्तान कायम म्हणत आला आहे. पण १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धात भारताच्या १४ पंजाब रेजिमेंटचे जवान मंगल सिंग हे पाकिस्तानचे कैदी बनले. त्यांना लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये भेटल्याचे अवैस यांनी जाहीरपणे सांगितले होते.  मात्र न्भारतप्रेम दाखवल्याबद्दल अवैस यांना पाकिस्तानात पुरेपूर किंमत मोजावी लागली.  लाहोरजवळ जमीन खरेदी करण्यासाठी गेले असताना अवैस आणि त्यांच्या मुलाचे अपहरण करून मुलाला ठार केदले. अखेर अवैस आणि त्यांच्या मुलाने स्वीडनमध्ये आश्रय घेतला.  भारतीय उपखंडातील संघर्षमय वातावरणापासून दूर युरोपमधील या शांत वातावरणातच त्यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला.

First Published on March 26, 2018 2:14 am

Web Title: loksatta vyakti vedh awais sheikh