15 December 2017

News Flash

बद्रीनारायण बारवाले

 जालना जिल्ह्यतील पुसासावनी येथे त्यांनी भेंडीचे नवीन वाण लावले.

लोकसत्ता टीम | Updated: July 28, 2017 3:48 AM

‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ हे तत्त्वज्ञान जपताना त्याला आधुनिकतेची जोड देणाऱ्या शास्त्रज्ञांबरोबर ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्यांमध्ये ज्या नावाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल त्यांत बद्रीनारायण बारवाले यांचे योगदान न विसरता येणारे. १९७५ नंतर बियाणातील जनुकीय बदलामध्ये होणारे संशोधन व्यावसायिकदृष्टय़ा स्वीकारून ते सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणारे बारवाले यांनी सतत नावीन्याचा शोध घेतला. त्यामुळेच त्यांनी कृषी क्षेत्रात स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले.

जालना जिल्ह्यतील पुसासावनी येथे त्यांनी भेंडीचे नवीन वाण लावले. त्याचे भरघोस उत्पादन आले. पण भेंडी काही बाजारात विकली जाईना. तसे ते संकटच. मग बारवाले यांनी त्या भेंडीचे बियाणे करून त्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या विक्रीपर्यंत सर्व जबाबदारी त्यांनी उचलली आणि जालना जिल्ह्य़ात बियाणांचा व्यवसाय सुरू झाला. जनुकीय अभियांत्रिकीच्या क्षेत्रात झालेल्या या प्रगतीमुळे बोंडअळीपासून सुटका झाली. १९९२ साली केंद्र सरकारने ‘महिको’ या बारवाले यांच्या कंपनीला बीटी कापूस उत्पादनास परवानगी दिली. त्यानंतर बोंडअळीवरचा रामबाण इलाज म्हणून शेतकऱ्यांनी बीटी कापसाचा वापर सुरू केला. त्याचे लाभ अगदी आजही मोठय़ा प्रमाणात होतो आहे. अलीकडे या अळीची रोगप्रतिकारशक्ती वाढली आहे. ती पुन्हा डोके वर काढेल, अशी भीती कृषी क्षेत्रातील मंडळी व्यक्त करीत असताना बारवाले यांचे काळाच्या पडद्याआड जाणे या क्षेत्रातील मंडळींची चिंता वाढणारे आहे.  १९७०च्या दशकात आयआयएमसारख्या संस्थेमधून उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला आपल्या कंपनीत नोकरीला ठेवले पाहिजे, असा दृष्टिकोन बाळगणारे ते एकमेव उद्योजक होते. त्याचा परिणाम एवढा झाला की, आता जालना हे बियाणांच्या क्षेत्रातील मोठे केंद्र आहे. संशोधनातून व्यवसायवृद्धीचा दृष्टिकोन असावा लागतो. महिकोने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यासाठी करार केले आणि दावलवाडी येथे संशोधन केंद्र सुरू करण्यात आले. केवळ बियाणांच्या क्षेत्रापर्यंत संशोधनाची व्याप्ती ठेवावी, असे बारवाले यांना वाटले नाही. त्यापुढे जाऊन समाजाला भेडसविणारा डेंग्यू आणि चिकुनगुनिया पसरविणाऱ्या डासांचे प्रजनन थांबवता येऊ शकते काय, याचेही संशोधन त्यांनी सुरू केले.  बारवाले यांचा हैदराबाद मुक्तिसंग्रामातही सहभाग होता. यासाठी त्यांना कारावासही भोगावा लागला. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी केलेले सामाजिक कामही मोठे आहे. बीटी कापूस जेव्हा बाजारपेठेत येत होता तेव्हा म्हणजे १९९२ साली त्यांनी जालना शहरात गणपती नेत्रालयाची स्थापना केली. जालना शहरात महाविद्यालय सुरू केले. ते रोटरी क्लबचेही काही काळ अध्यक्ष होते. मूळ हिंगोलीचे बारवाले जालना येथे दत्तक म्हणून आलेले. त्यांनी या कर्मभूमीमध्ये केलेले काम देशभरात उल्लेखनीय ठरले. त्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना झाला. २००१ मध्ये त्यांना केंद्र सरकारने ‘पद्मभूषण’ने सन्मानित केले. अमेरिकेतील वर्ल्ड फूड प्राइझ फाऊंडेशन या संस्थेचा पुरस्कार त्यांना मिळाला, इंटरनॅशनल सीड्स अ‍ॅण्ड सायन्स टेक्नॉलॉजी या संस्थेनेही त्यांना गौरविले होते. पुरस्कारांबरोबरच त्यांनी ज्या व्यक्तींसह काम केले, त्यावरून त्यांच्या योगदानाची उंची ठरवता येईल. डॉ. स्वामिनाथन यांच्या संस्थेलाही ते मदत करीत असत. डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि स्वामिनाथन यांच्याशीही त्यांच्या चर्चा होत. शेतीला समस्येतून बाहेर काढण्यासाठी सुरू असणाऱ्या उपाययोजनांमध्ये बियाणांच्या पातळीवर त्यांनी केलेले काम महत्त्वपूर्ण आहे.

 

First Published on July 28, 2017 3:48 am

Web Title: loksatta vyakti vedh badrinarayan barwale