ईशान्येकडील राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची चर्चा यंदा प्रथमच माध्यमात मोठय़ा प्रमाणात होती. त्यातही त्रिपुरात सत्तारूढ मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व भाजप यांच्यातील लढाई लक्ष्यवेधक ठरली. त्यात २५ वर्षांचे माकप सरकार जाऊन भाजपची सरशी झाली. या यशात चर्चेत ठरले ते भाजप प्रदेशाध्यक्ष व त्रिपुराचे नियोजित मुख्यमंत्री विप्लब देव.

गोमती जिल्ह्य़ातील राजेंद्रनगर येथे २५ नोव्हेंबर १९७१ रोजी जन्मलेल्या विप्लब यांनी उदयपूर महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचे वडील हरधन देव हे जनसंघाचे नेते होते. त्यामुळे कौटुंबिक पाश्र्वभूमी संघविचारांची होती. पदवी घेतल्यानंतर ते लगेचच दिल्लीला गेले. तिथे त्यांनी संघकामाला सुरुवात केली. गोविंदाचार्य व कृष्णगोपाल शर्मा या दोन ज्येष्ठ संघनेत्यांच्या मार्गदर्शनाखाली १६ वर्षे त्यांनी संघाचे काम केले. २०१५ मध्ये ते पुन्हा त्रिपुरात परतले. भाजपचे त्रिपुरा प्रभारी व संघ प्रचारक राहिलेल्या सुनील देवधर यांनी विप्लब यांच्यातील नेतृत्वगुण पाहून पक्षात सक्रिय केले. भाजपचे केंद्रीय जनसंपर्कप्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर वर्षभरात म्हणजे ६ जानेवारी २०१६ मध्ये त्यांच्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. यापूर्वी सुधींद्र दासगुप्ता यांनी प्रदीर्घ काळ त्रिपुराचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्याकडून विप्लब यांनी सूत्रे स्वीकारली. या काळात उत्तम संघटनकौशल्य व वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अगदी स्थानिक पातळीवर पक्षाची उभारणी केली. त्यामुळेच गेल्या विधानसभा निवडणुकीत एक ते दीड टक्क्य़ावरून या वेळी एकदम ४३ टक्के मते भाजपने घेतली. त्यात प्रामुख्याने राज्यात डाव्या पक्षांच्या विरोधात व्यापक रणनीतीचा भाग म्हणून काँग्रेस व इतर पक्षांतील अनेक प्रमुख नेत्यांना त्यांनी भाजपमध्ये आणले.

विप्लब या निवडणुकीत बनामालापूर मतदारसंघातून मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले आहेत. पहिल्यांदाच त्यांनी निवडणूक लढविली. प्रचारात भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जरी घोषित केला नव्हता तरी प्रचारात बहुतेक सर्व फलकांवर पक्षाच्या केंद्रीय नेत्यांबरोबर देव यांचेच छायाचित्र प्रामुख्याने होते. त्यामुळे सत्ता आल्यास मुख्यमंत्री तेच होणार हे स्पष्ट होते. आता युवकांना रोजगार, सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे दिलेले आश्वासन पाळणे हे आता मुख्यमंत्री या नात्याने त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. स्वच्छ प्रतिमा व एकाही गुन्ह्य़ाची नोंद त्यांच्याविरोधात नाही ही त्यांची जमेची बाजू.