24 November 2017

News Flash

चंद्रकांत देवताले

मराठी व हिंदी या भाषाभगिनींचा मुक्तिबोधांप्रमाणेच त्यांच्या काव्यात सारखाच संचार होता.

लोकसत्ता टीम | Updated: August 19, 2017 2:28 AM

मराठी व हिंदी या भाषाभगिनींचा मुक्तिबोधांप्रमाणेच त्यांच्या काव्यात सारखाच संचार होता. वर्तमानकाळात राहूनही त्यापलीकडे जाणारी त्यांची कविता ही भावस्पर्शी तितकीच संवेदनशील होती. असे चतुरस्र कवी असलेले चंद्रकांत देवताले यांच्या निधनाने मराठी व हिंदी यांना जोडणारा चालताबोलता दुवा निखळला आहे. देवताले यांच्या कवितेत मनाला साद घालण्याची ताकद होती. मनुष्याची सुखदु:खं, महिला व मुलांची दुनिया ही त्यांच्या काव्याची प्रेरणास्थाने होती.

मध्य प्रदेशातील बैतूल जिल्हय़ात जौलखेडा येथे ७ नोव्हेंबर १९३६ रोजी त्यांचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला. बैतूल जिल्हा हा महाराष्ट्राला लागूनच आहे, त्यामुळे तेथे हिंदी व मराठी या दोन्ही भाषा बोलल्या जातात. साहजिकच त्यांच्या कवितांत मराठीचा प्रभाव दिसतो. देवताले हे बराच काळ इंदोरला राहत होते. मध्य भारतातील मुंबई म्हणून इंदोर प्रसिद्ध आहे, कारण तेथे सर्व प्रकारचे लोकसमूह एकत्र नांदताना दिसतात. तोच सर्वसमावेशकतेचा भाव देवताले यांच्या कवितांतून डोकावतो. त्यांनी कवी गजानन माधव मुक्तिबोध यांच्यावर पीएच.डी. केली व नंतर ते इंदोरच्या एका महाविद्यालयात अध्यापन करीत होते.  भक्तिकालीन कवींची कविता ही कालजयी ठरली, कारण ती प्रेम व मृत्यू या मूल्यांवर आधारित होती. देवताले यांची कविताही अशीच कालजयी होती. हिंदी कवितेतील नवप्रवाहांची चर्चा करताना यापुढेही देवताले यांच्या काव्याची दखल घेतल्याशिवाय समीक्षकांना पुढे जाता येणार नाही. देवताले यांनी एकूण बारा काव्यसंग्रह लिहिले. गजानन माधव मुक्तिबोधांवरची दोन पुस्तके, तुकारामांचे अभंग व दिलीप चित्रे यांच्या कवितांचा हिंदी अनुवाद त्यांनी केला. दिलीप चित्रे यांच्या कवितांचा त्यांनी केलेला अनुवाद ‘पिसाटी का बुर्ज’ या नावाने प्रकाशित झाला आहे. हड्डिया मे छिपा ज्वर, दीवारो पर खून से, लकडबग्धा हँस रहा हैं, रोशनी के मैदान की तरफ, भूखंड तप रहा हैं, आग हर चीज मे बताई गई थी, बदला बेहद महंगा सौदा, पत्थर की बेंच, उसके सपने, इतनी पत्थर रोशनी, उजाड मे संग्रहालय, जहा थोडा सा सूर्योदय होगा हे त्यांचे काव्यसंग्रह. त्यांच्या ‘पत्थर फेंक रहा हूँ’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. मध्य प्रदेश शिखर सम्मान व मैथिलीशरण गुप्त सम्मान हे दोन महत्त्वाचे पुरस्कारही त्यांना मिळाले. हिंदीत रघुवीर राय यांच्यानंतर १०-१२ नव्या दमाच्या कवींची फळी पुढे आली. त्यात देवताले, कमलेश, विनोदकुमार शुक्ल, विष्णू खरे यांचा समावेश होता. एकाच काळातील कवी असूनही त्यांच्या रचना व विषय वेगळे आहेत. या सगळ्याच कवींचे मूल्यमापन करताना त्यांच्यावर अन्याय झाला. यातील काही कवींनी ‘अकविता’ आंदोलनात भूमिका पार पाडली. त्या काळात साहित्य क्षेत्रात ही चळवळ जोरात होती. त्यात देवताले व लीलाधर जगुडी यांचा समावेश होता.  मराठीतील दलित कवी दिवंगत नामदेव ढसाळ व त्यांच्या दलित पँथर आंदोलनाशी तसेच अस्तित्ववादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप चित्रे, चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांची मैत्री होती. देवताले यांची कविता ही मराठी मातीशी नाते सांगतानाच रसिकांना संवेदनेच्या पातळीवर हलवून सोडणारी होती. जीवनसंघर्षांचे चित्रण करताना त्याला तोंड देण्याचे धैर्य देणारी होती.  त्यांची कविता प्रस्थापित बंध तोडून जाते, त्यामुळेच ती वाचल्यानंतर आपण आंतरबाहय़ बदलून जातो ही त्यांच्या कवितेची खासियत. त्यामुळेच हिंदी काव्याच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर राहील.

First Published on August 19, 2017 2:27 am

Web Title: loksatta vyakti vedh chandrakant devtale