25 April 2019

News Flash

लेफ्ट. कर्नल (निवृत्त) रवींद्रनाथ

एकोणीस वर्षे लष्करात सेवा करणारे रवींद्रनाथ यांच्या रक्तात देशभक्ती भिनलेली होती. 

कारगिल युद्धातील निर्णायक लढाई ठरली ती द्रासमधील टोलोलिंग शिखर शत्रूच्या हातून हिसकावण्यासाठी. २० मे १९९९ रोजी टोलोलिंगचे युद्ध सुरू झाले. युद्धातील निम्मी प्राणहानी याच ठिकाणी झाली होती. टोलोलिंग शिखर पाकिस्तानकडून जिंकून घेता आले नसते तर भारताचा एकमेव रसदपुरवठा मार्ग बंद होणार होता त्यामुळे ते जिंकणे आवश्यक होते. हे युद्ध सुरू झाल्यानंतर अनेक चांगले सैन्याधिकारी एकामागून एक शत्रूचे बळी ठरले, त्यामुळे चिंतेचे वातावरण होते. अशातच कर्नाटकमधील एका घरात १४ जूनला फोन खणखणला. पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले, बाबा आपण टोलोलिंग शिखर जिंकले काळजी करू नका. पलीकडची व्यक्ती होती लेफ्टनंट कर्नल रवींद्रनाथ. त्यांचे नुकतेच निधन झाले.

एकोणीस वर्षे लष्करात सेवा करणारे रवींद्रनाथ यांच्या रक्तात देशभक्ती भिनलेली होती.  ‘आई, मी आता केवळ तुझा मुलगा नाही देशाचा मुलगा आहे,’ असे रवींद्र नेहमी सरोज्जमांना सांगत असे. रवींद्रनाथ यांच्या पत्नी अनिता यांनाही पतीच्या कार्याचा अभिमान होता. बालपणापासूनच रवींद्रनाथ यांना लष्करी सेवेत जायचे होते. रवींद्रनाथ  विजापूरच्या सैनिकी शाळेत प्रवेश घेतला. नंतर राष्ट्रीय संरक्षण अकादमीची परीक्षा उत्तीर्ण होऊन खडकवासला येथे दाखल झाले. नंतर डेहराडून येथील संरक्षण अकादमीतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना लष्करातील पहिली नेमणूक मिळाली ती अरुणाचल प्रदेशात.  १९८६-८७ मध्ये त्यांनी दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी काश्मीर गाठले. १९८९-९० व १९९४-९६ या काळात त्यांनी पुन्हा काश्मीरमध्ये काम केले होते. त्यानंतर चौथ्यांदा म्हणजे १९९९ च्या कारगिल युद्धाच्या वेळी त्यांनी मर्दुमकी गाजवली. निवृत्त कर्नल असलेले मगोड बसप्पा रवींद्रनाथ यांनी कारगिलमधील ऑपरेशन विजयमध्ये अविस्मरणीय कामगिरी केली. त्यांचा मृत्यूही आजारी पडून झाला नाही तर जॉगिंग पार्कमध्ये व्यायाम करत असताना झाला. त्यामुळे शेवटपर्यंत ते तंदुरुस्त होते. पाकिस्तानी सैन्याने द्रास क्षेत्रातील टोलोलिंग शिखराचा कब्जा केला होता. त्या वेळी ते शिखर ताब्यात घेण्याच्या मोहिमेचे नेतृत्व रवींद्रनाथ यांनी २ राजपुताना रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर म्हणून केले. त्यांनी पॉइंट ४५९० व ब्लॅक रॉक हे दोन भाग पुन्हा जिंकले. कारगिल युद्धातील तो निर्णायक भाग होता. त्यासाठी त्यांना १९९९ मध्ये वीरचक्र मिळाले. कारगिल वीर रवींद्रनाथ यांच्या मृत्यूनंतर काँग्रेस व भाजप यांच्यात दोन्ही पक्षांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास प्रतिनिधी न पाठवल्यावरून जे गलिच्छ ट्विटर युद्ध झाले ते मात्र शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे.

First Published on April 12, 2018 3:30 am

Web Title: loksatta vyakti vedh col mb ravindranath