21 April 2019

News Flash

देवेंद्र झाझरिया

चुरू जिल्हय़ातील रहिवासी देवेंद्र झाझरिया हा अशाच मुलखावेगळय़ा खेळाडूंमध्ये मोडतो.

सामान्य लोकांसारखे आपण नसलो तरी किंवा त्यांच्यासारखे सर्व अवयव नसले तरीही त्याचे दु:ख करीत बसण्यापेक्षा आहे त्यामध्ये समाधान मानून मुलखावेगळी कामगिरी करणारे फारच थोडे असतात. राजस्थानमधील चुरू जिल्हय़ातील रहिवासी देवेंद्र झाझरिया हा अशाच मुलखावेगळय़ा खेळाडूंमध्ये मोडतो.

ज्या वयात आपल्या मित्रांसमवेत खूप मजामस्ती करावीशी वाटत असते, त्याच वयात त्याच्यावर हा प्रसंग गुदरला. तो झाडावर चढला असताना विजेच्या तारेचा धक्का त्याला बसला. त्यामुळे त्याचा डावा पाय निकामी झाला. वैद्यकीय तज्ज्ञांनी कृत्रिम पायाखेरीज अन्य कोणताही पर्याय नसल्याचे सांगितल्यानंतर त्याच्या घरच्यांना मानसिक धक्का बसला नाही तर नवलच! वयाच्या ८ व्या वर्षी त्याला डावा कृत्रिम पाय बसवावा लागला. अर्थात तो अन्य सामान्य मुलांबरोबरच शाळेत जात असे. तेथे त्याने फुटबॉलसह अनेक खेळांचा आनंद घेतला. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रिपुदमनसिंग यांनी देवेंद्रमधील नैपुण्य हेरले. या मुलामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविण्याची क्षमता आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी १९९७ मध्ये देवेंद्रला मैदानी स्पर्धामधील क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर गुरू-शिष्यांची ही जोडी झकास जमली.  दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षण देणे ही काही सोपी गोष्ट नसते. त्यामध्ये शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसह अनेक समस्यांचा अडथळा असतो. त्याचप्रमाणे अशा खेळाडूंच्या घरच्यांचा विश्वास संपादन करणे हीदेखील अवघड कामगिरी असते. सुदैवाने रिपुदमन व देवेंद्र यांना या अडचणी आल्या नाहीत. अवघ्या पाच वर्षांच्या सरावानंतर देवेंद्र याने २००२ मध्ये दक्षिण कोरियात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली. तेथून त्याने मागे पाहिलेलेच नाही. २००४ मध्ये अथेन्स येथे झालेल्या पारा ऑलिम्पिकमध्ये त्याने भालाफेकीत सुवर्णपदक पटकाविले. पुन्हा त्याने २०१६ मध्ये रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्याच कामगिरीची पुनरावृत्ती केली. या दोन सुवर्णपदकांखेरीज त्याने आजपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय पदकांची लयलूट केली आहे, तसेच त्याने विश्वविक्रमांचीही नोंद केली आहे. त्याला २००४ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१२ मध्ये पद्म सन्मान मिळविणारा पहिला पारा ऑलिम्पिकपटू होण्याची कामगिरी त्याने केली. देशाच्या क्रीडा क्षेत्रातील राजीव गांधी खेलरत्न हा सर्वोच्च पुरस्कार यंदा त्याला मिळाला आहे. हा मान मिळविणारा तो पहिलाच दिव्यांग खेळाडू आहे. भारतीय हॉकीपटू सरदारसिंग याच्यासमवेत त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने देवेंद्रला हा मान देत खऱ्या अर्थाने दिव्यांग खेळाडूंच्या अथक प्रयत्नांचा सन्मान केला आहे. दिव्यांग खेळाडूंना नेहमीच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असते. अनेक वेळा दुय्यम दर्जाची निवास व्यवस्था, लिफ्ट नसलेल्या इमारतींमध्ये राहण्याची सुविधा, अस्वच्छ शौचालये, पाण्याची कमतरता, निकृष्ट दर्जाची भोजन व्यवस्था, निवडीबाबत होणारे राजकारण आदी अनेक समस्यांमुळे आगीतून फुफाटय़ात आलो की काय असेच त्यांना वाटत असते. त्यांच्या दुर्दैवाने अनेक वेळा त्यांच्या संयोजकांमध्येही शह-काटशहाचे राजकारण दिसून येत असते. त्यामुळेच देवेंद्र याला सर्वोच्च सन्मान देत शासनाने दिव्यांग खेळाडूंचा दर्जा उंचावला आहे. आता शासनाने देवेंद्रसारख्या अनेक गुणवान दिव्यांग खेळाडूंना अन्य खेळाडूंसारखी समान वागणूक कशी मिळेल याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण कसे होईल यावर भर दिला पाहिजे.

First Published on August 24, 2017 2:38 am

Web Title: loksatta vyakti vedh devendra jazrajya