१९८८चा तो काळ. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात पुन्हा अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला होता. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चे भयंकर ओरखडे होतेच. अशा वेळी पुनरावृत्ती न होता अतिरेक्यांना कंठस्नान घालण्याची योजना आखण्यात आली होती. पोलिसांच्या फौजांनी सुवर्ण मंदिराला चहुबाजूंनी वेढले होते. परंतु समोरासमोर दोन हात करण्याऐवजी एक सुपीक योजना त्यांच्या डोक्यात होती.  मंदिरातील वीजपुरवठा खंडित करण्याबरोबरच पाण्याचा एक थेंबही अतिरेक्यांना मिळणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे या मंदिरासमोर असलेल्या सरोवराचा पाण्यासाठी वापर करणाऱ्या अतिरेक्यांना पाळतीवर असलेल्या पोलिसांनी नेम धरून टिपले. ही कोंडी अतिरेक्यांना कमालीची त्रासदायक ठरली आणि त्यांना शरण येण्यावाचून गत्यंतर उरले नाही..  ही मोहीम आखणारे होते पंजाबचे तेव्हाचे महासंचालक कनवर पाल सिंग ऊर्फ केपीएस गिल.

खलिस्तानी अतिरेक्यांना जे. एफ. रिबेरो यांनी सळो की पळो करून सोडले होतेच. त्यामुळे रिबेरो यांचा उत्तराधिकारीही तितकाच खंबीर आणि कणखर हवा होता. त्यामुळे अर्थातच रिबेरो यांच्यानंतर गिल यांच्याकडेच आपसूक सूत्रे आली. अतिरेक्यांचे कर्दनकाळ म्हणूनच तेही अल्पावधीतच प्रसिद्ध झाले. लुधियानात जन्मलेले गिल तेवीसाव्या वर्षी भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले खरे, परंतु त्यांना नियुक्ती मिळाली ती त्यांना ईशान्य भारतात. आपल्या कार्यपद्धतीने आसाम-मेघालयातही दरारा निर्माण केला. आसामचे महासंचालक असताना एका निदर्शकाच्या हत्येमुळे ते चर्चेत आले. मात्र या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेच निर्दोष सोडल्यानंतर ते स्वगृही परतले. खलिस्तानी अतिरेक्यांच्या कारवायांनी जर्जर झालेल्या पंजाबला अशाच कठोर अधिकाऱ्याची आवश्यकता होती आणि त्या कसोटीस ते तंतोतंत उतरले. लोकांनीच त्यांना ‘लायन ऑफ पंजाब’, ‘सुपर कॉप’चा किताब दिला. पंजाबमधील खलिस्तानी चळवळीचा कणाच त्यांनी पार मोडून टाकला. पंजाब पोलिसांचे खचलेले मनोधैर्य पुन्हा उंचावताना त्यांनी अतिरेक्यांच्या दिवसाढवळ्या चकमकी सुरू केल्या. पोलिसांच्या कुटुंबीयांनाच लक्ष्य करणाऱ्या अतिरेक्यांना टिपून मारताना अशा चकमकीच्या ठिकाणी जातीने हजर राहून त्यांनी पोलिसांचे मनोधैर्य वाढविले. रिबेरोंच्या काळात तब्बल ८००हून अधिक खलिस्तानी अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. गिल यांनी तोच कित्ता गिरवला. पंजाबमध्ये दरदिवशी होणाऱ्या चकमकीने खलिस्तानी अतिरेकीही हादरून गेले.  कट्टर अतिरेक्याला ठार करणाऱ्या असंख्य पोलिसांना त्यांनी भरभरून बक्षिसे दिली. त्यामुळे अनेक पोलीसही गिल यांच्यासाठी उदार होऊन काम करीत होते. १९९१ मध्ये खलिस्तानी अतिरेक्यांनी उच्छाद मांडला तेव्हा केंद्र सरकारला पुन्हा गिल यांची आठवण आली. पंजाबचे महासंचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतरही ते सक्रिय होते. एका विनयभंगाच्या प्रकरणात त्यांना शिक्षाही झाली.  छत्तीसगडमधील नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचे एक सहकारी म्हणतात, गिल यांची अतिरेक्यांबाबतची माहिती इतकी अचूक असायची की, ती चकमक यशस्वी ठरायचीच.  शेरोशायरीची आवड असलेल्या गिल उतारवयात त्यांच्या सहकाऱ्यांना एक शेर हमखास सुनवायचे.. ‘गुदाज-ए-इश्क नहीं कम जो मैं जवाँ ना रहा, वो ही आग है पर आग में धुवाँ ना रहा..’ जणू त्यांची दास्तानच या शायरीत दडलेली होती. त्यांच्या निधनाने पंजाबमधील एक पर्व संपले..