पाकिस्तानचे निर्माते महंमद अली जीना यांच्या एकुलत्या एक कन्या दीना वाडिया या भारत व पाकिस्तान यांच्यातील ७० वर्षांच्या इतिहासाच्या साक्षीदार होत्या. विशेष म्हणजे त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९१९ रोजी झाला व त्यानंतर बरोबर त्याच दिवशी २८ वर्षांनी फाळणी होऊन भारत व पाकिस्तान हे दोन देश वेगळे झाले. जीना हे अखेपर्यंत त्यांच्याशी तुसडेपणानेच वागले. कारण त्यांच्या या मुलीने भारतात राहणे पसंत करून नेव्हिल वाडिया या पारशी व्यक्तीशी विवाह केला होता.

खरे पाहिले तर जीना यांनीही तेच केले होते, कारण त्यांचा विवाह हा रतनबाई ऊर्फ रुटी या पारशी महिलेशी झाला होता. दीना वाडिया ही जीना दाम्पत्याची मुलगी व बॉम्बे डाइंगचे अध्यक्ष नसली वाडिया यांची आई. जीना हे जेव्हा भारतातील मुस्लिमांचे नेते म्हणून पुढे येत होते. त्याच वेळी निर्भीड दीनाने नेव्हिल यांच्याशी विवाह केला. १९३० मध्ये दीनाने नेव्हिल वाडिया या मुंबईतील पारशी व्यक्तीशी विवाहाचा विचार बोलून दाखवला तेव्हा जीना भडकले होते. भारतात लाखो मुस्लीम मुले आहेत. तुला असली अवदसा काय आठवली असे त्यांनी विचारले, त्यावर तितक्याच शांतपणे ‘फिअरलेस’ वाडियाने मी माझ्या पसंतीच्या मुलाशीच विवाह करणार, असे तर त्यांना ऐकवलेच, पण भारतात लाखो मुस्लीम मुली असताना तुम्ही पारशी मुलीशी विवाह का केलात हे सांगितलेत तर बरे होईल असेही तिने विचारले होते. शेवटी जीना १९३८ मध्ये झालेल्या एकुलत्या एक मुलीच्या विवाहास उपस्थित राहिले नाहीतच. खरे तर त्या वेळी वाडिया कुटुंब हे पारशी समाजात नाव कमावलेले कुटुंब होते. त्यांनी कुलाब्यातील कुर्सो बाग, भायखळ्यातील जेर बाग व रुस्तम बाग अशा मालमत्ता वसवल्या होत्या. पाकिस्तानचे संस्थापक जीना यांच्या मलबार हिल येथील जीना हाऊसवर दीना वाडिया यांनी दावा सांगितला होता, पण जीना यांनी त्यांना वारसदार नेमलेले नसल्याने अखेपर्यंत त्यांचे हे स्वप्न साकार झाले नाही. दीना यांचा जन्म लंडनचा, पण त्यांचे बहुतांश आयुष्य हे मुंबईतच गेले. नंतर गेली काही दशके त्या अमेरिकेत वास्तव्यास होत्या. उद्योगपती पुत्र नसली वाडिया यांचे आईवर निस्सीम प्रेम होते. त्यातूनच ते नेहमी मुंबई-न्यूयॉर्क चकरा मारत असत. आईबरोबर वेळ व्यतीत करीत. आई-मुलाचे हे नाते अतूट होते. दीना यांना डायना नावाची एक मुलगीही आहे. जीना यांनी पारशी समाजातील मुलीशी विवाह केला म्हणून त्यांच्या पत्नीस (दीनाच्या आईला) समाजाच्या रोषास बळी पडावे लागले. या संघर्षमय स्थितीत जन्माला आलेल्या दीनालाही त्याच्या झळा बसल्या होत्या. दीनाने पारशी व्यक्तीशी विवाह केल्याने एक वर्तुळ योगायोगाने पूर्ण झाले. जीना कधीच दीनाशी चांगले वागले नाहीत, पण मुलगी म्हणून जीनांवर तिचे तरीही प्रेम होते. २८ एप्रिल १९४७ रोजी तिने जीनांना लिहिले होते की, तुम्ही पाकिस्तानचा लढा तत्त्वत: जिंकला आहे. मला त्याचा आनंदच आहे, त्यासाठी तुम्ही किती कठोर परिश्रम घेतलेत हे मी पाहिले आहे. पण दीना यांनी १९४८ मध्ये जीनांच्या मृत्यूपर्यंत पाकिस्तानला भेट दिली नव्हती. २००४ मध्ये त्यांनी कराचीत जीना स्मारकास भेट दिली होती. ‘मे हिज ड्रीम फॉर पाकिस्तान कम ट्र’ असे अभ्यागत पुस्तिकेत त्यांनी लिहिले होते. जेव्हा दोन देश स्वतंत्र झाले तेव्हा ज्या देशातील व्यक्तीशी विवाह केला त्या भारतात राहायचे की पाकिस्तानात जायचे, असा यक्षप्रश्न असताना त्यांनी भारतावर निष्ठा दाखवली. त्यांच्या निधनाने इतिहासाच्या एका कालखंडाची साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेली आहे. बाप-मुलीच्या नात्यातील एक दर्दभरी कहाणी कायमची संपली आहे.