19 October 2018

News Flash

डॉ. अमित मायदेव

एन्डोस्कोपी’ हा शब्द एव्हाना सर्वतोमुखी झालेला आहे

‘एन्डोस्कोपी’ हा शब्द एव्हाना सर्वतोमुखी झालेला आहे; पण भारतातील पहिले एन्डोस्कोपी सेंटर स्थापन करण्याचे श्रेय जाते ते डॉ. अमित मायदेव यांना! मुंबईच्या भाटिया रुग्णालयात १९९१ साली त्यांनी पहिल्यांदा दुर्बिणीच्या साह्य़ाने शस्त्रक्रियेचे सेंटर सुरू केले. रुग्णाच्या शरीरावर कमीत कमी छेद करून दुर्बिणीच्या साह्य़ाने शस्त्रक्रिया केली जाऊ  शकते हे डॉ. अमित मायदेव यांनी  दाखवून दिले. गेली २७ वर्षे डॉ. मायदेव व्हिडीओ एन्डोस्कोपीच्या तंत्राने शस्त्रक्रिया करताहेत. हे डॉ. मायदेव  आज, १ फेब्रुवारी रोजी साठ वर्षांचे झाले. निवृत्तीचा विचारही न करता रुग्णसेवेत राहण्याचा-नवनवीन गोष्टी शिकण्याचा त्यांचा उत्साह कायम आहे.

डॉ. मायदेव यांनी मुंबई विद्यापीठातून ‘एमबीबीएस’ तसेच नंतर  एमएस केले. १९९० साली ते जर्मनीला जाऊन दुर्बिणीच्या साह्य़ाने शस्त्रक्रिया शिकून भारतात परतले. भाटिया रुग्णालयातील पहिल्या एन्डोस्कोपी केंद्रानंतर, मूळचे पोटविकारतज्ज्ञ असलेल्या डॉ. मायदेव यांनी ‘बलदोटा इन्स्टिटय़ूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस’ची मुंबईत स्थापना केली. या संस्थेचे ते आजही संचालक असून, देशभरातील हे सर्वात अद्ययावत केंद्र मानले जाते. पोलीस, संरक्षण दलातील अधिकारी-कर्मचारी, कलाकार यांच्यावर ते मोफत उपचार करतात.

वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबाबत भारत सरकारने २०१३ साली त्यांचा ‘पद्मश्री’ किताबाने गौरव केला होता.  २००९ मध्ये पहिल्यांदा जपानमध्ये ‘पर ओरल एन्डोस्कोपिस्ट मायोटॉमी’ ज्याला वैद्यकीय भाषेत ‘पोएम’ म्हणतात या शस्त्रक्रियेचा प्रयोग झाला. या शस्त्रक्रियेने ‘अक्लेझिया कार्डिया’ म्हणजेच एखाद्या व्यक्तीला गिळण्याचा त्रास होत असेल तर त्यावर उपचार केला जातो. भारतातील रुग्णांना या शस्त्रक्रियेचा फायदा मिळावा यासाठी डॉ. मायदेव यांनी ही शस्त्रक्रिया शिकून २०१२ साली भारतात ‘पोएम’ शस्त्रक्रिया सुरू केली. लठ्ठपणा कमी करण्यासाठी बेरियाट्रिक सर्जरी हा एकमेव पर्याय होता. पोटाला चिरा देऊन ही शस्त्रक्रिया केली जाई; पण साठीच्या उंबरठय़ावर असतानाही नवीन शिकण्याच्या ध्यासाने डॉ. मायदेव यांनी दुर्बिणीच्या साह्य़ाने लठ्ठपणावर केली जाणारी ‘स्लिव्ह गॅस्ट्रोप्लास्टी’ ही शस्त्रक्रिया ब्राझिलचे डॉ. मॅनोएल नेटो यांच्याकडून शिकून घेतली. अर्ध्या तासात अ‍ॅसिडिटीच्या त्रासावर मात करणारी ‘अ‍ॅन्टी रिफ्रेक्स म्युकोसेक्टॉमी’ ही शस्त्रक्रियाही त्यांनी आत्मसात केली. ते भारतातील २०० पोटविकारतज्ज्ञ, सर्जन आणि फिजिशिअन्सचे ‘एन्डोस्कोपी’चे गुरू आहेत. फक्त भारतीयच नाही तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, सिंगापूर, दुबई यांसारख्या देशांतील डॉक्टरांनी त्यांच्याकडून ‘एन्डोस्कोपी’चे धडे गिरवले आहेत.

First Published on February 1, 2018 1:37 am

Web Title: loksatta vyakti vedh dr amit maydeo