प्रशासनात ज्यांच्यावर विश्वासाने जबाबदारी टाकावी असे फार थोडे अधिकारी असतात, ते अंमलबजावणीत तक्रारींचा पाढा वाचत बसत नाहीत; थेट कामाला भिडतात. अशाच अधिकाऱ्यांपैकी एक असलेले निती आयोगाचे आरोग्य संचालक डॉ. दिनेश अरोरा यांची नुकतीच ‘आयुष्मान भारत’ या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या योजनेचे संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. आयुष्मान भारत अमेरिकेतील ओबामा केअरएवढीच मोठी आरोग्य योजना असल्याने, त्यासाठी पैसा कुठून आणणार, गरिबांना फायदा मिळणार की विमा कंपन्या वा खासगी रुग्णालयेच श्रीमंत होणार, असे अनेक प्रश्न आहेत; परंतु या योजनेची प्राथमिक आखणी अरोरा यांनी केली होती. योजना जाहीर होण्याआधी महिनाभर, डॉ. अरोराच धोरण-आराखडा तयार करीत होते. अरोरा हे एमबीबीएस डॉक्टर होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत आले. त्यांनी सार्वजनिक आरोग्य योजनेत केरळमध्ये २००६-२००९ दरम्यान काम केले आहे. त्यांच्या काळात केरळने आरोग्य क्षेत्रातील अनेक निर्देशांकांत बाजी मारली होती. त्यांच्या मते, ‘विम्यातून सार्वजनिक आरोग्य क्षेत्राला पैसा मिळेल व तो पैसा पुन्हा याच व्यवस्थेसाठी वापरल्याने ही योजना बळकट होईल’.

मूळचे चंदिगढचे असलेले, तेथेच शिकलेले डॉ. अरोरा केरळ केडरचे, २००२ च्या तुकडीचे. केरळच्या पल्लकड जिल्ह्य़ातील ओट्टापल्लम येथे त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय कारकीर्द सुरू केली, तेथे त्यांनी वाळू माफियांवर कारवाई केली, तेव्हापासून बेधडक अधिकारी म्हणून त्याचा नावलौकिक आहे. त्यांनी केरळात बेकायदा खाणींवर बंदी, बंदिस्त हत्तींच्या समस्या, वाहतूक अशा अनेक प्रश्नांत लक्ष घालून शिस्त आणली. प्रशासकीय सेवेत असताना शिष्यवृत्ती मिळवून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा अर्थशास्त्र व राज्यशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. पंजाबी, मल्याळम, हिंदी व इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे.

आरोग्य योजनांसाठी त्यांनी एफएम रेडिओ व दूरवैद्यक हे मार्ग केरळमध्ये अवलंबले. ग्रामीण विद्युतीकरण महामंडळात काम करताना त्यांनी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य) यात चमकदार कामगिरी केली. कमी काळात त्यांनी सहा हजार खेडय़ांचे विद्युतीकरण केले, असे त्यांचे सहकारी सांगतात. स्पष्ट दृष्टिकोन, कुठल्या गोष्टींवर भर द्यायचा याचे ज्ञान, वचनबद्धता या वैयक्तिक गुणांचा प्रत्यक्ष अंमलबजावणीत सांघिक वापर व्हावा म्हणून त्यांनी माहिती तंत्रज्ञान व उपयोजने म्हणजे अ‍ॅप्सचा वापर केला. यानंतरची त्यांची नियुक्ती थेट, निती आयोगातील संचालक (आरोग्य) या जागी झाली होती. तेथून आता देशातील एका बहुचर्चित आरोग्य योजनेला आकार देण्यासाठी ते सिद्ध होत आहेत.