दैनंदिन जीवनातील औषधे असतील किंवा शेतीसाठी वापरली जाणारी खते असतील या सर्वामध्ये रसायनांना विशेष महत्त्व आहे. यामुळेच रसायनशास्त्राशी संबंधित संशोधनाचा आपल्या जीवनाशी थेट संबंध आहे. मात्र आपल्या डोळय़ांसमोर रसायन म्हणजे हानीकारकच अशी एक प्रतिमा बनली आहे. जनमानसातील रसायनशास्त्राशी संबंधित प्रतिमा बदलण्यासाठी अनेक तरुण वैज्ञानिक प्रयत्न करीत आहेत. यातीलच एक तरुण वैज्ञानिक म्हणजे तेजपूर विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. संजय प्रतिहार होय. त्यांनी गुंतागुंतीच्या बहुधातू रसायन प्रक्रियेवर संशोधन पूर्ण केले असून त्याचा वापर कृषी क्षेत्रात कसा करता येईल हे सिद्धांताने मांडले आहे. त्यांच्या या सिद्धांतामुळे पिकांना आवश्यक असे धातूयुक्त जीवनसत्त्व देणे शक्य होणार आहे. त्यांच्या या संशोधनाबद्दल त्यांना ‘इंडियन नॅशनल सायन्स अकादमी’च्या युवा वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या संशोधनाचा फायदा केवळ कृषी क्षेत्रालाच नव्हे तर उद्योगांनाही होणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

पश्चिम बंगालमधील बंकुरा जिल्हय़ातील बंकादाहा या छोटय़ा गावात डॉ. प्रतिहार यांचा जन्म झाला. शेती हा या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय होता. संशोधनाला पूरक असे कोणतेही वातावरण घरात नव्हते. मात्र त्यांना लहानपणापासून संशोधनात रस होता. जिल्हय़ातील सरकारी शाळेत त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर बुरदवान विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या रामानंद महाविद्यालयात त्यांनी रसायनशास्त्रात पदवी शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांना कृषी क्षेत्रात संशोधन करायची इच्छा निर्माण झाली म्हणून त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात इनऑर्गेनिक रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी आयआयटी खरगपूरच्या रसायनशास्त्र विभागातून ऑर्गोनोमेटॅलिक रसायनशास्त्रात पीएच.डी.  मिळविली. याआधी त्यांना विज्ञान-तंत्रज्ञान विभागातर्फे ‘इन्स्पायर प्रोफेसर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याअंतर्गत त्यांनी तेजपूर विद्यापीठात अध्यापनाचे काम करण्यास सुरुवात केली. याचबरोबर त्यांना ‘सीएसआयआर’तर्फे वरिष्ठ संशोधन अभ्यासवृत्तीही मिळाली होती. २०१७मध्ये त्यांना संशोधन क्षेत्रासाठी ‘व्हिजिटर्स’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. याबरोबर याच वर्षांत त्यांना ‘गांधीयन यंग टेक्नॉलॉजी इनोव्हेशन’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.

educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान
Suicide attempt of college girl due to harassment incident in Bharti University campus
छेडछाडीमुळे महाविद्यालयीन युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न, भारती विद्यापीठ परिसरातील घटना
mumbai university budget marathi news, mumbai university budget 857 crores marathi news
मुंबई विद्यापीठाचा ८५७ कोटींचा अर्थसंकल्प सादर

भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीची स्थापना १९३५ मध्ये करण्यात आली. भारतीय वैज्ञानिकांची ही सर्वोच्च संस्था असून विज्ञानातील सर्व शाखांचे ती प्रतिनिधित्व करते. देशातील तरुणांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण करणे तसेच त्याचा वापर  विधायक व देशहिताच्या कामासाठी करणे या दृष्टीने ही अकादमी काम करीत आहे.

‘रसायनांचा वापर चांगल्या व वाईट अशा दोन्ही कामांसाठी होऊ शकतो. म्हणजे ज्या रसायनांमुळे विकास होऊ शकतो तेच रसायन मनुष्यजातीचा खात्माही करू शकते. यामुळे आजही समाजमनात रसायनांबद्दल भीतीचे वातावरण आहे. मात्र आपल्या संशोधनामुळे कृषी आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांचा विकास कसा होईल  व रसायनांबाबतची सामान्यांच्या मनातील भीती कशी जाईल यासाठी मी प्रयत्नशील असेन’ असे डॉ. प्रतिहार आवर्जून सांगतात.