21 March 2019

News Flash

ई. एन. राममोहन

लष्करात शत्रूला मारण्यासाठी थेट गोळ्या झाडण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि लष्करात शत्रूला मारण्यासाठी थेट गोळ्या झाडण्याचे प्रशिक्षण दिले जाते. केंद्रीय राज्य राखीव दलाची (सीआरपीएफ) जबाबदारी मात्र पूर्णत: वेगळी आहे. देशांतर्गत कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता या दलाची उभारणी झालेली आहे. त्यांना बळाचा कमीत कमी वापर करण्याचे शिक्षण देण्यात येते. अन्य दलांच्या तुलनेत त्यांची शस्त्रे वेगळी असतात. असे प्रशिक्षण घेणारे जवान तुम्ही थेट नक्षलग्रस्त भागात पाठविले तर काय होईल, असा प्रश्न विचारणारे बीएसएफचे माजी महासंचालक ई. एन. राममोहन यांचे नुकतेच निधन झाले.

कर्करोगाने ग्रस्त असणारे राममोहन हे वृद्धापकाळातदेखील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरक्षा दलांनी अतिरेकी, फुटीरतावादी, नक्षली यांच्या विरोधात चालविलेल्या कारवाईंकडे चिकित्सकपणे लक्ष ठेवून होते. त्यात जाणवणाऱ्या उणिवा निदर्शनास आणून देताना आपल्या अनुभवाच्या बळावर ते दलाच्या कार्यपद्धतीतील बदलांबाबत सातत्याने आग्रही असायचे. राममोहन हे भारतीय पोलीस सेवेतील आसाम-मेघालय केडरचे १९६५ च्या तुकडीतील अधिकारी. १९९७ ते नोव्हेंबर २००० या काळात त्यांनी बीएसएफचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय राखीव पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षा पथक, इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस या दलात विविध पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले. विलक्षण नेतृत्वशैली हे त्यांचे बलस्थान. ईशान्येकडील राज्यात बंडखोर, फुटीरतावादी यांच्या विरोधातील कारवायांचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव होता. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर या अनुभवाचा देशाला उपयोग झाला. आठ वर्षांपूर्वी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या छुप्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे ७६ जवान शहीद झाले. नक्षलग्रस्त भागात वावरताना जवानांकडून काय त्रुटी राहिल्या, मानक कार्यप्रणालीचे पालन झाले की नाही, याची छाननी करण्यासाठी गृह मंत्रालयाने तज्ज्ञांची समिती नेमून तिचे अध्यक्षपद राममोहन यांच्याकडे सोपविले. या घटनेचा सखोल अभ्यास करून त्यांनी अहवाल सोपविला. देशात कुठेही अशी घटना घडली की, समर्पकपणे ते विश्लेषण करीत असत. जवानांकडून घडलेल्या चुका दाखवून त्या सुधारण्याचे मार्ग, तैनात होताना सुरक्षा दलाच्या तुकडीने नक्षलींचा प्रभाव जोखणे, स्थानिकांशी संबंध दृढ करीत गुप्त माहिती मिळवण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण, रात्रीच्या गस्तीवेळी घ्यावयाची सावधगिरी अशा अनेक मुद्दय़ांवर ते मार्गदर्शकाची भूमिका निभावत होते. असा मार्गदर्शक हरपणे ही देशासाठी मोठी हानी आहे.

First Published on April 13, 2018 3:30 am

Web Title: loksatta vyakti vedh e n rammohan