25 October 2020

News Flash

एरिका गार्नर

हे खरे की तिला अल्पावधीत आणि काहीशी अकल्पितच प्रसिद्धी मिळाली होती..

हे खरे की तिला अल्पावधीत आणि काहीशी अकल्पितच प्रसिद्धी मिळाली होती.. पण या प्रसिद्धीचा वापर तिने केवळ सामाजिक-राजकीय मुद्दे लोकांसमोर आणण्यासाठीच केला; हे तिचे मोठेपण. सर्व रंगांच्या, वंशांच्या माणसांना समान पातळीवर वागवणारे जग हे तिचेही स्वप्न होते. केवळ स्वप्न न पाहता ती मुद्दे मांडत राहिली, या मुद्दय़ांकडे लक्ष वेधण्यासाठी चळवळीचे सामर्थ्य तिने वाढविले, म्हणूनच वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी झालेला तिचा- एरिका गार्नर हिचा- मृत्यू अनेक विचारीजनांना चटका लावणारा ठरला आहे.

एरिका ही २०१४ च्या जुलैपर्यंत ‘आपण बरे आपले काम बरे’ अशा प्रकारचीच एक तरुणी. ब्रूकलिन शहरातल्या कृष्णवर्णीय कुटुंबातली, चार भावंडांत मोठी. तिच्या वडिलांना  – एरिक गार्नर यांना- सुटय़ा सिगारेट विकल्याबद्दल, करचुकवेगिरी आणि काळाबाजाराच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले आणि ‘माझा श्वास कोंडतो आहे’ असा आकांत एरिक गार्नर करीत असतानाही, पँटेलिओ या पोलीस अधिकाऱ्याने कोपरापासून मनगटापर्यंतची पकड त्यांच्या मानेवर अधिकच घट्ट केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या दिवसानंतर एरिका यांचे आयुष्य बदलले. त्यांनी गार्नर वे फाऊंडेशन नावाची संस्था स्थापन केली आणि आदल्याच वर्षीपासून सुरू झालेल्या ब्लॅक लाइव्हज मॅटर या चळवळीचे काम एरिका करू लागल्या. हे काम प्रथम केवळ शहरी भागांत चौकसभा घेण्यापासून सुरू झाले. एरिका म्हणत : मी फक्त माझ्या दिवंगत वडिलांसाठी न्याय मागत नसून पोलिसांना माझ्या वडिलांचा गळा दाबू देणारी व्यवस्था आपण सारे मिळून बदलू शकतो की नाही, पोलिसी प्रशासनाचे कायदे आपण बदलणार आहोत की नाही, हा माझा सवाल आहे.

एरिका यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन न्यूयॉर्कमध्ये तब्बल ५० हजार कार्यकर्ते २०१४ च्या डिसेंबरात एका अभिनव प्रकारच्या निदर्शनांसाठी एकत्र आले होते. हे कार्यकर्ते शहराच्या मध्यवर्ती भागात ‘मेल्यासारखे’ निश्चेष्ट पडले. एरिका या काही ब्लॅक लाइव्हज मॅटर या चळवळीच्या संस्थापक नव्हेत; परंतु या चळवळीच्या आधारस्तंभ म्हणून त्यांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळत राहिली. वडिलांच्या स्मृत्यर्थ दर आठवडय़ाला कुठे ना कुठे सभा घ्यायचीच, हा नेम एरिका यांनी पाळला. एरिका यांचे सडेतोड मुद्दे अशा सभांतून पुढे येत राहिले. डेमोक्रॅटिक पक्ष तसा समतावादी, पण त्याचे नेते मात्र वंशद्वेषींपुढे हतबल, ही सार्वत्रिक तक्रार एरिका यांनी सशक्तपणे मुखर केली.   हिलरी क्लिंटन वंशभेदविरोधासाठी करत काहीच नाहीत, ओबामाही अनेक खुनशी कायदे बदलत नाहीत, असे एरिका यांचे म्हणणे होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 3:21 am

Web Title: loksatta vyakti vedh erica garner
Next Stories
1 डॉ. यमुना कृष्णन
2 जयराम ठाकूर
3 गंगाप्रसाद अग्रवाल
Just Now!
X