16 February 2019

News Flash

गंगाप्रसाद अग्रवाल

आणीबाणीतील बंदिवानांनाही आता स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मिळावा

आणीबाणीतील बंदिवानांनाही आता स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली असून संघ वा भाजपमधील अनेक नेत्यांनी या काळात तुरुंगवास भोगला असल्याने फडणवीस सरकारनेही असा निर्णय घेण्याचे सूतोवाच केलेच आहे. आणीबाणी ही घटनात्मक तरतुदीनुसार लागू केली असली तरी तिच्याविरोधातील संघर्षांला स्वातंत्र्यलढा म्हणावे का याबद्दल मतमतांतरे आहेतच; पण हैदराबाद मुक्तिसंग्राम मात्र भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील लोकविलक्षण असे पर्व होते. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील या गौरवास्पद लढय़ात मराठवाडय़ातील गोविंदभाई श्रॉफ, शंकररराव चहाण, अनंतराव भालेराव, बाबासाहेब परांजपे, माणिकराव पहाडे अशा अनेकांचे योगदान मोलाचे होते. या लढय़ात खऱ्या अर्थाने सहभागी झालेले मोजकेच तपस्वी स्वातंत्र्यसेनानी आज हयात असून त्यात गंगाप्रसाद अग्रवाल यांचा समावेश आहे.

हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत या गावी १९२३ मध्ये जन्मलेल्या गंगाप्रसाद अग्रवाल यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी विद्यालयातून मॅट्रिक आणि वर्धा येथील बियाणी महाविद्यालयातून कॉमर्सची पदवी घेतली. तेव्हाच त्यांचे नाते गांधी-विनोबा आणि स्वातंत्र्यसंग्राम व भूदान आंदोलन यांच्याशी जोडले जाणार हे निश्चित झाले. महाविद्यालयात शिकत असताना ‘चले जाव’ चळवळीत आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर हैदराबाद मुक्तिसंग्रामात त्यांनी मोलाचा सहभाग दिला. त्यानंतर मराठवाडय़ातील गोविंदभाई श्रॉफ, अनंतराव भालेराव इत्यादी दिग्गजांच्या बरोबर अनेक सामाजिक आघाडय़ांवर त्यांनी बिनीचे शिलेदार म्हणून भूमिका निभावल्या.

स्वातंत्र्योत्तर भारतात गांधींच्या कल्पनेतील स्वराज्य आणण्यासाठी झेंडा सत्याग्रह, जंगलतोड सत्याग्रह, १९६२ व ६५च्या युद्धाच्या वेळी शांतिसेनेचे कार्य, जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर  आंदोलन, आणीबाणीच्या काळात तुरुंगवास, विनोबांच्या भूदान आंदोलनातील आघाडी सांभाळणे, त्यानंतर दुष्काळाविरुद्ध झुंज अभियान, मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नासाठी संघर्ष, भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन, बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यावर हिंदू-मुस्लीम ऐक्य व शांतता प्रस्थापना कार्य, जंगल-जल-जमीन यांचे ग्रामसभेला अधिकार मिळावेत यासाठीची लढाई अशी खूप मोठी यादी त्यांच्या ७० वर्षांतील सामाजिक कार्याबाबत सांगता येईल.  १९५३ मध्ये वसमत नगर परिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले, तसेच २००० मध्ये वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. सेंद्रिय शेतीचा पुरस्कार, कर्जमुक्त शेतकरी, श्रमदानातून रचनात्मक काम, स्वावलंबी गाव-समाज, गांधींना अपेक्षित असलेले ग्रामस्वराज्य, जातीय दंगलीच्या काळात सामाजिक सलोखा निर्माण करणाऱ्या समित्यांची स्थापना व कार्यवाही ही सर्व कामे दिसायला अगदी छोटी वाटू शकतात; पण तळागाळातल्या समाजासाठी त्या-त्या वेळी दुभंगणारी मने जोडण्याचे हे काम महत्त्वाचे होते. आत्यंतिक चिकाटीने केल्याशिवाय ते होतही नाही. त्यासाठी उच्च दर्जाचे नतिक बल व दीघरेद्योगी प्रवृत्ती आवश्यक असते. हे सर्व गुण अग्रवाल यांच्यात आहेत.  सरकारी पुरस्कार वा ‘पद्म’सारखे सन्मान देतानाही मराठवाडय़ावर नेहमीच अन्याय झाला. गोविंदभाई व अन्य काहींचा याला अपवाद. गंगाप्रसादजींनीही आयुष्यात कधी पुरस्कारांची अपेक्षा न ठेवता नि:स्वार्थपणे सामाजिक क्षेत्रात स्वत:ला झोकून दिले. म्हणूनच यंदा महाराष्ट्र फौंडेशनने त्यांना दिलेला जीवनगौरव म्हणजे समाजसन्मुख आदर्शाची पाठराखण म्हणता येईल..

First Published on December 28, 2017 1:46 am

Web Title: loksatta vyakti vedh gangaprasad agrawal