17 November 2017

News Flash

गर्बिन मुगुरुझा

विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या इतिहासात आपले नाव अजरामर केले.

लोकसत्ता टीम | Updated: July 17, 2017 2:44 AM

गर्बिन मुगुरुझा

स्पॅनिश खेळाडू गर्बिन मुगुरुझाने शनिवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या इतिहासात आपले नाव अजरामर केले. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत तिने अनुभवी व्हीनस विल्यम्सवर वर्चस्व गाजवताना पहिल्यांदा विम्बल्डन स्पध्रेचे विजेतेपद पटकावले. २०१५ मध्ये ती याच स्पध्रेच्या अंतिम फेरीत सेरेना विल्यम्सकडून पराभूत झाली होती. मात्र सेरेनाच्या प्रेरणादायी वाक्यामुळे तिने दोन वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आणि विम्बल्डन जिंकण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. ‘‘एक दिवस तू विम्बल्डन स्पर्धा जिंकशील,’’ हे होते सेरेनाचे ते प्रेरणादायी बोल.

शनिवारी येथील सेंटर कोर्टवर जेतेपदाच्या लढतीसाठी येताना मुगुरुझाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास प्रकर्षांने दिसत होता.  समोर अनुभवी ३७ वर्षीय व्हीनसही विक्रमी जेतेपदासाठी उत्सुक असेल याची कल्पना तिला होती. म्हणूनच तिने कोंचिटा मार्टिनेझ या स्पेनच्या दिग्गज महिला टेनिसपटूकडून मार्गदर्शन घेतले. कोंचिटा यांनी १९९४ मध्ये विम्बल्डन महिला एकेरीचे जेतेपद जिंकले होते आणि अशी कामगिरी करणाऱ्या त्या स्पेनच्या पहिल्या महिला खेळाडू होत्या. त्यानंतर जवळपास २३ वर्षांनी मुगुरुझाच्या रूपाने स्पेनच्या महिला खेळाडूंचा विम्बल्डन स्पध्रेतील जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आला. कोंचिटा यांना ग्रॅण्ड स्लॅम स्पध्रेतील अपेक्षांच्या ओझ्यांचा आणि येणाऱ्या दबावाचा अनुभव होता. त्यावर मात कशी करता येईल, याचेही तंत्र त्यांनी अवगत केले होते. त्यामुळेच प्रशिक्षक सॅम स्युमिक यांनी काही कारणास्तव माघार घेतल्यामुळे मुगुरुझाने कोंचिटा यांना विनंती केली आणि त्यांनीही ती लगेच मान्य केली. या जोडगोळीने शनिवारी जे काही साध्य करून दाखवले, ते स्पेनच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांत लिहिले जाईल.

मुगुरुझा स्पेनचे प्रतिनिधित्व करत असली तरी तिचा जन्म व्हेनेझुएला येथील कॅराकस इथला. तिची आई व्हेनेझुएला येथील होती, तर वडील स्पॅनिश होते. तिसऱ्या वर्षी तिने टेनिस शिकायला सुरुवात केली आणि सहाव्या वर्षी ती कुटुंबासह स्पेनमध्ये स्थायिक झाली. मुगुरुझा ही थोडीशी अंधविश्वासू आहे आणि त्यामुळे तिने आपल्या पालकांना सामन्याला उपस्थित राहण्यापासून मज्जाव केला. २०१५च्या विम्बल्डन स्पध्रेत तिने अप्रतिम खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता आणि तेव्हाही तिने पालकांना सामना पाहण्यास येऊ नका, असे सांगितले होते.  अ‍ॅशिएर आणि इगोर या दोन भावांचा मुगुरुझाच्या यशामागे मोठा वाटा आहे. तिच्या दोन्ही भावांना टेनिस फार आवडायचे आणि व्हेनेझुएलाकडून खेळताना त्यांनी एटीपी गुणांकनही मिळवले होते, परंतु मुगुरुझाच्या टेनिस कारकीर्दीसाठी ते स्पेनमध्ये स्थायिक होण्यास तयार झाले.

वय वष्रे २३, उंची सहा फूट, रुंद खांदे आणि मैदानी फटक्यांमध्ये असलेली आक्रमकता.. ही मुगुरुझाची थोडक्यात ओळख. तिच्यामध्ये असलेली सर्व क्षमता तिने अंतिम फेरीत पणाला लावली. आक्रमक सव्‍‌र्हिस, बॅकहँड-फोरहँड फटक्यांचा प्रभावी वापर यांचा नजराणा सादर करताना अवघ्या एक तास १७ मिनिटांत तिने व्हीनसचे आव्हान संपुष्टात आणले.  ग्रॅण्ड स्लॅम स्पध्रेच्या अंतिम लढतीत व्हीनस भगिनींना नमवणारी ती एकमेव खेळाडू आहे. पण या जेतेपदातून मुगुरुझावरील जबाबदारी अधिक वाढली आहे. स्वेतलाना कुझनेत्सोव्हा आणि अँजेलिक कर्बर या अव्वल खेळाडूंना नमवून ती इथपर्यंत पोहोचली होती. महिला टेनिसपटूंचा इतिहास पाहता त्यांना सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे पुरुष टेनिसपटूंप्रमाणे ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धावर मक्तेदारी सांगणाऱ्या फार कमी महिला खेळाडू आहेत, हेच आव्हान मुगुरुझाला यापुढे पेलावे लागणार आहे.

First Published on July 17, 2017 2:44 am

Web Title: loksatta vyakti vedh garbine muguruza