ऐन पावसात स्कूटरवरील कुटुंबाची तारांबळ बघून या वर्गासाठी लाखात चार चाकीचे स्वप्न रतन टाटा यांनी पाहिले. आणि प्रत्यक्षात ते साकार केले एका मराठमोळ्या व्यक्तीने. नॅनोबरोबरच ही व्यक्तीही प्रकाशझोतात आली ती २००८ मध्ये. नॅनोबरोबर टाटा मोटर्सच्या अन्य अधिकाऱ्यांमध्येही ही व्यक्ती होती म्हणून तिच्यावर प्रकाशझोत पडला नाही; तर रतन टाटा यांनी खांद्यावर हात ठेवून केलेल्या कौतुकाने या व्यक्तीची छबी झळकली. गिरीश वाघ. नॅनोची संकल्पमूर्ती. टाटा मोटर्सच्या संशोधन व विकास विभागातील गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली नॅनो तयार झाली. आणि आता हेच गिरीश कंपनीच्या महत्त्वाच्या व्यापारी वाहन विभागाचे नेतृत्व करणार आहेत.

व्यापारी वाहन निर्मितीत एकेकाळी अव्वल असलेल्या टाटा मोटर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा स्तरावर फेरबदल सुरू आहेत. याचा पहिला टप्पा कंपनीच्या या विभागात गेल्याच आठवडय़ात सतीश बोरवणकर यांची नव्याने तयार केलेल्या मुख्य परिचालन अधिकारीपदी नियुक्ती करून सुरू केला.

पुणे विद्यापीठाच्या महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीतून यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी प्राप्त गिरीश वाघ यांनी मुंबईच्या एस. पी. जैन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चमधून निर्मिती व्यवस्थापनातील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. टाटा मोटर्समधील २४ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी निर्मिती, खरेदी, पुरवठा, व्यवसाय आदी विभागात जबाबदारी हाताळली आहे. उत्पादन नियोजन आणि कार्यक्रम अंमलबजावणीतील त्यांच्या हातखंडामुळे त्यांना याच विभागाचे उपाध्यक्षपदही बहाल केले गेले. ४६ वर्षीय गिरीश १९९२ मध्ये टाटा मोटर्समध्ये थेट (कार्यकारी निवड योजनेंतर्गत) नियुक्त झाले होते. टाटा मोटर्सची पहिली प्रवासी कार टाटा इंडिकाच्या निर्मितीतीत त्यांचे मार्गदर्शन कामी आले आहे. प्रवासी कार (टाटा इंडिका), लहान व्यापारी वाहन (एस), पुन्हा प्रवासी कार (नॅनो) आणि आता परत व्यापारी वाहन विभाग अशी गिरीश यांना टाटा मोटर्सने मुशाभिरी घडवून आणली आहे.

प्रवासी वाहन, मध्यम अवजड व्यापारी वाहन आणि आता व्यापारी वाहन व्यवसायाची धुरा गिरीश यांच्याकडे आली आहे. यापूर्वीच्या दोन्ही गटांत नॅनो आणि एसची निर्मिती (२००५) गिरीश यांच्या संकल्पनेतून झाली आहे. एसने तर वेगळ्या गटात अस्तित्व निर्माण करताना अल्पावधीतच उल्लेखनीय यशही मिळविले. लहान व्यापारी वाहन गटातील एस ‘छोटा हाथी’ म्हणून लोकप्रिय झाला. तर नॅनो दुचाकीधारकांचे स्वप्न म्हणून गिरीश यांच्यामुळेच पूर्णत्वास आले होते.

टाटा मोटर्समध्ये गिरीश यांच्याकडील कार्यक्रम अंमलबजावणी व प्रकल्प व्यवस्थापनाच्या जबाबदारीमुळे कंपनीची मुळे त्यांना चांगली अवगत आहे. आता वरच्या पदावर काम करताना त्यांना वेगळ्या नजरेतून काम करावे लागेल. अर्थातच बोरवणकर यांच्या रूपातील बॉस त्यांच्या साहाय्यासाठी आहेच. व्यापारी वाहन विभागाला पुन्हा एकदा त्याच्या पूर्वीच्या बाजारहिश्शाच्या वर नेण्याचे आव्हान गिरीश यांच्यावरही असेलच. बोरवणकर यांचा चार दशकांचा तर गिरीश यांचा अडीच दशकांचा अनुभव टाटा मोटर्सला तिच्या मूळच्या व्यापारी वाहन व्यवसायात अव्वल स्थान मिळवून देण्याकडे आता लक्ष लागले आहे.बोरवणकर, वाघ यांच्या महत्त्वाच्या पदावरील नियुक्तीच्या जोरावर टाटा मोटर्सने २०१९ पर्यंत व्यापारी वाहन बाजारपेठेत जागतिक स्तरावर अव्वल येण्याचा मानस जाहीर केला आहे.  व्यापारी वाहन व्यवसायात मोठे आव्हान निर्माण झाल्यानंतर कंपनीतील नेतृत्व बदलाची घडामोड पथ्यावर पडेल, असा विश्वास आता कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांनाही आहेच.