वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना वडिलांनी एक जैवभौतिकशास्त्राचे क्रमिक पुस्तक अमेरिकेतून आणून दिले होते. तेव्हापासून त्यांना विज्ञानाची गोडी लागली. त्यांचे वडीलही वैज्ञानिकच होते, पण या मुलाने पुढे ही आवड कायम ठेवून याच क्षेत्रात काम करून जगात नाव मिळवले त्यांचे नाव ग्रॅहॅम फारक्वार. त्यांना यंदाचा क्योटो पुरस्कार मिळाला आहे. जपानच्या इनामोरी फाउंडेशनचा हा नोबेलच्या तोडीचा पुरस्कार मिळवणारे ते पहिले ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक आहेत. त्यांचे संशोधन हे दुष्काळी भागात टिकू शकतील, अशा पिकांच्या प्रजाती व वनस्पतींमधील पाण्याच्या बाष्पीभवनाचा हवामान बदलावर परिणाम याच्याशी संबंधित आहे.

साधारणपणे विज्ञानातील ज्या क्षेत्रात नोबेल दिले जात नाही त्या क्षेत्रात हा पुरस्कार दिला जातो. तो सहा लाख डॉलरचा आहे.  त्यांचे वडील वैज्ञानिक असल्याने त्यांना विज्ञानाचे बाळकडूच मिळाले होते. टास्मानियाची शेती सुधारण्यात त्यांच्या वडिलांचा मोठा वाटा होता. सध्या ते ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीत मानद प्राध्यापक आहेत. टास्मानियातील कुटुंबात जन्मलेले डॉ. फारक्वार यांनी शेती संशोधन हे जीवनाचे ध्येय मानले. गणित व भौतिकशास्त्र यांचा अभ्यास त्यांनी पक्का केला होता. अर्थात हा सल्ला त्यांना ऑस्ट्रेलियातील प्राध्यापक राल्फ स्लॅचर यांनी दिला होता. त्यामुळेच त्यांनी भौतिकशास्त्र व गणितातील पदवी घेतली. नंतर ते जीवशास्त्राकडे वळले. भौतिकशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्यांनी वनस्पतिशास्त्र समजून घेतले. त्यांनी ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीतून बी.एस्सी. पदवी घेतली. नंतर क्वीन्सलॅण्ड विद्यापीठातून जैवभौतिकशास्त्रात बी.एस्सी. पदवी घेतली.  पुन्हा ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीतून पीएच.डी. झाले. त्याच विद्यापीठात नंतर त्यांनी प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. त्यांच्या जैवभौतिक प्रारूपांमुळे वनस्पतींपासून सगळ्या जंगलापर्यंत जैविक व्यवहार कसे चालतात याचा उलगडा झाला. त्यांनी या अभ्यासाच्या आधारे वनस्पतींचे कार्य कसे चालते याची गणितीय प्रारूपे तयार केली होती. वनस्पतींना पाणी किती लागते, वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड वाढत असताना त्यांची वाढ किती होऊ शकते, कोणत्या वनस्पती किंवा झाडे जास्त कार्बन डाय ऑक्साइड असलेल्या वातावरणात जोमदार वाढतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी शोधली होती. त्यांना स्टोमाटामध्ये विशेष रस होता. स्टोमाटा म्हणजे पानांमधील सूक्ष्म रंध्रे  जी उघडतात व बंद होतात त्यातून कार्बन डाय ऑक्साइड घेतला जातो व पाणी बाहेर टाकले जाते. त्यांची प्रारूपे आज जगातील कृषी व पर्यावरण वैज्ञानिक वापरतात. पृथ्वीवरील जीवनाचा मूलाधार असलेल्या प्रकाशसंश्लेषणाचे आपले जे ज्ञान आहे त्यात त्यांनी मोलाची भर टाकली. त्यांना याआधी पंतप्रधानांचा पुरस्कार, प्रतिष्ठेचा रँक पुरस्कार  मिळाला होता. त्यांच्या संशोधनातून गव्हाच्या नव्या प्रजाती निर्माण करता आल्या. प्रतिकूल हवामानात टिकाव धरणाऱ्या इतर पिकांच्या प्रजातीही अस्तित्वात आल्या, त्यामुळे अन्न सुरक्षेच्या क्षेत्रात एक दमदार पाऊल टाकले गेले. हवामान बदलांमुळे वनस्पतीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होत आहे, वाऱ्यांचा वेगही मंदावत आहे, अशी निरीक्षणे त्यांनी मांडली. एकूणच त्यांची वनस्पतिशास्त्रातील निरीक्षणे आजही कसोटीला खरी उतरणारी आहेत. त्यांच्या संशोधनातून त्यांनी वाढत्या लोकसंख्येला अन्न कसे पुरवता येईल, या जटिल समस्येचा उलगडा करण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच अनुकरणीय असा आहे.