१९५० च्या सुमारास इलेक्ट्रॉनिक वाद्य उपकरणे दुरुस्त करणारा एक तरुण पुढे याच क्षेत्रात मोठी कामगिरी करील असे कुणाला वाटले नसेल, पण आज आपण अनेक चित्रपट संगीत मैफलीमध्ये रोलँड असे लिहिलेले एक इलेक्ट्रॉनिक वाद्य पाहतो, ते त्यांच्या रोलँड कार्पोरेशनने तयार केले होते; त्यांचे नाव इकुतारो काकेहाशी. इलेक्ट्रॉनिक संगीत उपकरणांचा मोठा ठेवा आपल्यासाठी ठेवून ते काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

काकेहाशी यांची ओळख म्हटली तर ते अभियंता, उद्योजक व संगीतप्रेमी अशी सांगता येईल. संगीताला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड त्यांनी दिली. सुरुवातीला एस टोन ही कंपनी त्यांनी स्थापन केली. एस टोन व रोलँड ड्रम मशीन तसेच एमआयडीआय तंत्र यासाठी ते ओळखले जातात. तरुणपणी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे दुकान चालवताना त्यांनी इलेक्ट्रॉनिक संगीत वाद्ये दुरुस्त करता करता वयाच्या २८ व्या वर्षी संगीताशी मैत्री केली ती कायमचीच. आदर्श इलेक्ट्रॉनिक संगीत उपकरण तयार करण्याची मनीषा त्यांनी बाळगली व ती प्रत्यक्षातही आणली ती रोलँड ड्रम मशीनच्या माध्यमातून. त्याआधी ते हॅमंड या दुसऱ्या एका कंपनीत काम करीत होते. नंतर त्यांनी एस टोन ही संगीत वाद्य उपकरण कंपनी स्थापन केली व सरतेशेवटी रोलँड कार्पोरेशनला मूर्तस्वरूप दिले. त्यांनी जो इलेक्ट्रॉनिक ड्रम तयार केला होता, त्याचे नाव आर १ रिदम एस असे होते. तो १९६४ मध्ये प्रदर्शित करण्यात आला, पण तोपर्यंत त्याचे व्यावसायिकीकरण झाले नव्हते. १९६७ मध्ये त्यांनी आताचा ऱ्हिदम पॅटर्न जनरेटर तयार केला. त्यात डायोड मॅट्रिक्स सर्किट वापरले होते. सिंथेसायझरशी नाते सांगणारे हे वाद्ययंत्र होते त्यातून अपेक्षित सुरावटी निघू लागल्या. त्यापुढील काळात इलेक्ट्रॉनिक संगीत व पॉप संगीतावर काकेहाशी यांनी राज्य केले. १९८० मध्ये त्यांनी रोलँड टीआर ८०८ हे इलेक्ट्रॉनिक संगीत उपकरण तयार केले ते जास्त प्रगत होते. जपानमधील ओसाका येथे जन्मलेल्या काकेहाशी यांनी जपानची तंत्रज्ञानातील मक्तेदारी त्या काळात सिद्ध केली. टीआर ८०८ या उपकरणात ट्रान्झिस्टर या इलेक्ट्रॉनिक घटकांचा वापर करून आवाजाची निर्मिती केली होती. काकेहाशी यांनी कधीच एका यशात समाधान मानले नाही. त्यांनी अनेक ड्रम मशीन नंतर तयार केली. त्याशिवाय सिंथेसायझर, ऑडिओ इंटरफेस, विशिष्ट आवाज काढणारे इलेक्ट्रॉनिक गिटार बॉस या संलग्न कंपनीच्या माध्यमातून तयार केले. संगीताचे हार्डवेअर व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वापरले जाणारे म्युझिकल इन्स्ट्रमेंट डिजिटल इंटरफेस त्यांनी विकसित केले. पीसीवर गेम खेळणाऱ्यांना पूर्वी बीप हा एकच सूर ऐकू येत असे, त्यावर रोलँडच्या माध्यमातून त्यांनी एमटी ३२ हे ध्वनी प्रारूप तयार केले. त्यांना ध्वनी तंत्रज्ञानातील ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. हॉलीवूडच्या रॉक वॉक ऑफ फेममध्ये त्यांना स्थान मिळाले. २०१५ मध्ये त्यांच्या टीआर ८०८ या इलेक्ट्रॉनिक संगीत उपकरणावर लघुपट निघाला होता. त्यांची कारकीर्द ही दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील होती. त्या वेळी संगीत शिक्षण बंद असल्याने त्यांना औपचारिक शिक्षण मिळाले नव्हते, पण डय़ुक एलिंग्टन, ऑस्कर पीटर्सन यांच्यासारख्यांशी त्यांची चांगली मैत्री होती. इलेक्ट्रॉनिक संगीत उपकरणांचा प्रसार व्हायचा असेल, तर ती स्वस्त, लहान व साधी असली पाहिजेत हे त्यांनी पुरते हेरले होते. त्यातून त्यांनी आपली उपकरणे तशीच तयार केली. सर्व कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणात वापरता येतील असे डिजिटल इंटरफेस त्यांनी तयार केले. इलेक्ट्रॉनिक संगीत उपकरणे त्या काळात नव्हती असे नाही, पण काकेहाशी यांनी नवीन तंत्रज्ञानाशी मेळ असलेली उपकरणे तयार केली, हे त्यांचे वेगळे वैशिष्टय़ होते.