साधारण २००३ च्या पावसाळ्यातील ही घटना. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिमला येथे एका बैठकीसाठी आले होते. हिमाचल प्रदेशात वीरभद्र सिंह यांनी चौथ्यांदा निवडणूक जिंकली होती. त्यामुळे जंगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरक्षेच्या कारणामुळे या बैठक स्थळापासून जेमतेम एक किमी अंतरावर एका छोटय़ा सदनिकेत एक तरुण आमदार अडकून पडला होता. मंडी या गावाकडे वाहनाने जाण्यास निर्बंध होते. त्या वेळी हताशपणे या युवकाने ही कसली लोकशाही? ही बडेजाव संस्कृती थांबवायला हवी अशी भावना व्यक्त केली. त्यावर एक दिवस तुम्हीच मुख्यमंत्री झालात तर हे शक्य आहे असे उद्गार त्याच्या कुटुंबातील एकाने काढले. विशेष म्हणजे या व्यक्तीने परवा म्हणजे २७ डिसेंबरला हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  ५२ वर्षीय जयराम ठाकूर यांच्याकडे आता राज्याची धुरा आली आहे.

भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धूमल पराभूत झाल्याने ठाकूर यांना ही संधी मिळाली. १९६५ मध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जयराम ठाकूर यांच्या वडिलांनी मुलाच्या चांगल्या शिक्षणासाठी शेतमजुरी केली. ठाकूर यांनीही वडिलांचा हा विश्वास सार्थ ठरविला. पंजाब विद्यापीठातून ते द्विपदवीधर झाले. शिक्षणानंतर चांगली नोकरी करावी अशी कुटुंबीयांची इच्छा होती. मात्र जयराम यांना समाजकारण व राजकारणात रस होता. कुटुंबीयांचा विरोध असतानाही वयाच्या २८ व्या वर्षी १९९३ मध्ये सेराज मतदारसंघात ते भाजपकडून उभे राहिले. कोणतीही साधने नसताना त्यांनी चांगली लढत दिली. मात्र ते पराभूत झाले. तेव्हा त्यांची राजकीय कारकीर्द संपली असेच सर्वाना वाटले. मात्र जिद्दीने संघर्ष करून राजकीय क्षेत्रात काम सुरूच ठेवले. पुन्हा १९९८ मध्ये त्यांना याच मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. तेव्हा मात्र मोठय़ा मताधिक्याने ते विजयी झाले. २०१३ मध्ये मंडी लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा यांच्याविरोधात ते पराभूत झाले. त्यापूर्वी २००८ मध्ये प्रेमकुमार धूमल सरकारमध्ये ग्रामविकास व पंचायत राज खात्याची धुरा त्यांनी सांभाळली. २००७ ते २००९ या काळात ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. सरकार व संघटना असा दोन्ही कामांचा त्यांना अनुभव आहे. त्यातच हिमाचल प्रदेशात भाजप हा माजी मुख्यमंत्री धूमल व शांताकुमार या दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. मात्र जयराम ठाकूर हे कोणत्याही गटात नाहीत. त्यामुळे भाजप श्रेष्ठींनी पाच वेळा आमदार असलेल्या जयराम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. संघटनेच्या कामाचा अनुभव असलेल्या ठाकूर यांना गटबाजी कशी रोखायची याची कल्पना आहे. सर्वसमावेशक तसेच कोणत्याही वादात अडकले नसलेले हे व्यक्तिमत्त्व राज्यातील प्रभावी अशा राजपूत समाजातून आले असल्याने मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचा मार्ग सुकर झाला.

महाविद्यालयीन जीवनात संघ परिवारातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे त्यांनी काम केले. अभाविपत १९८६ ते ९३ या काळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्याच वेळी साधना यांच्या संपर्कात ते आले. नंतर ते विवाहबद्ध झाले. साधना ठाकूर या डॉक्टर आहेत. जयराम यांच्या रूपाने हिमाचल प्रदेशात मंडी जिल्ह्य़ाला प्रथमच मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे.  संघ विचारांशी असलेले घनिष्ठ संबंध आणि शांतपणे काम करीत राहण्याची वृत्ती यामुळेच ठाकूर यांना मुख्यमंत्रिपदासाठी पक्षाच्या आमदारांची पसंती मिळाली. तसेच भाजपच्या नेतृत्वाने राज्यात नवे नेतृत्व निर्माण करण्याच्या दृष्टीने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याचे आव्हान आता  त्यांच्यापुढे आहे.