23 October 2018

News Flash

जॉन यंग

त्यांचा जन्म सानफ्रान्सिकोत १९३० मध्ये झाला.

चांद्रवीर नील आर्मस्ट्राँग यांना जे वलय लाभलं, तसं नासाच्या या सर्वात जास्त काळ कार्यरत राहिलेल्या अवकाशवीराला लाभलं नाही; पण त्याची खंत त्याला कधीच नव्हती. त्याच्या निधनानं नासाचा आणखी एक ‘मूनवॉकर’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्याचं नाव आहे जॉन यंग. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा चंद्राकडे मोर्चा वळवण्याचे धोरण जाहीर केल्यानंतर असा जाणता अवकाशवीर सोडून जाण्याने अनुभवी सल्ल्याची उणीव आता भासणार आहे.

जॉन यंग यांचे वैशिष्टय़ म्हणजे जेमिनी व अपोलो या चांद्रमोहिमातील अवकाश प्रवास व त्याच्या जोडीला स्पेस शटलमधून अवकाशवारी व सहा वेळा अवकाशात जाण्याचा विक्रम. चंद्रावर चालणारे ते नववे चांद्रवीर. त्यांचा जन्म सानफ्रान्सिकोत १९३० मध्ये झाला. त्यांनी हवाई अभियांत्रिकी या विषयात जॉर्जिया इन्स्टिटय़ूटमधून विज्ञानाची पदवी घेतली होती. नंतर ते अमेरिकी नौदलात काम करू लागले. १९६२ मध्ये त्यांची अवकाशवीर म्हणून आर्मस्ट्राँग यांच्याबरोबर निवड झाली होती. १९६५ मध्ये जेमिनी तीन या चांद्रयानाचे सहसारथ्य करण्याचा मान त्यांना मिळाला. त्या वेळी त्यांनी ते यान पृथ्वीभोवतीच्या कक्षेत खाली, पुढे-मागे, बाजूला ज्या पद्धतीने लीलया फिरवले होते तसे केवळ निष्णात अवकाशवीरच करू शकतो. त्या वेळी त्यांच्यासमवेत गस ग्रिसॉम हे अवकाशयान चालकही होते. त्या मोहिमेत अवकाशवीरांच्या खाण्याच्या पदार्थावर प्रयोग करण्याचा हेतू होता. नासाने त्यांच्या शास्त्रीय पद्धतीने ठरवून दिलेले काही अन्नपदार्थ त्यांना जाताना दिले होते, पण यंगने मात्र अचानक यान चालू असताना खिशातून  सँडविच काढले तेव्हा ग्रिसॉमला धक्काच बसला. नंतर मात्र कुणी अवकाशवीर अशा खोडय़ा करीत नाही ना याची दक्षता घेतली जाऊ लागली.  अपोलो १६ मोहिमेत तो ७१ तास चंद्रावर होता, त्यात चंद्रावरचे दोनशे पौंडाचे दगड गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याचे काम त्याने केले. नंतर १९८३ मध्ये त्याने कोलंबिया शटलमधून प्रवास केला होता. स्पेस शटलमधून प्रवास मात्र मला भीतीदायक वाटतो, असे त्याने ‘माऊंटन ऑफ मेमोज’ पुस्तकात लिहिले आहे. ते खरेही ठरले, कारण त्यानंतर १९८६ मध्ये चँलेजर व २००३ मध्ये कोलंबिया स्पेस शटलच्या स्फोटात अनेक अवकाशवीरांचा बळी गेला होता.

First Published on January 11, 2018 3:15 am

Web Title: loksatta vyakti vedh john young