काही विजेत्यांमुळे त्या पुरस्काराची उंची वाढते. केरळ सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या एळ्ळुथाचन पुरस्कारासाठी विख्यात मल्याळी कवी के सच्चिदानंदन यांच्या नावाची घोषणा करताना गुरुवारी, केरळचे सांस्कृतिकमंत्री ए के बालन यांनीही हीच भावना बोलून दाखवली. पाच लाख रुपये रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मल्याळी साहित्यविश्वात अत्यंत मानाचे स्थान असलेल्या सच्चिदानंदन यांचा जन्म १९४६चा. त्रिचूर जिल्ह्य़ातील पल्लूत हे त्यांचे जन्मगाव. जन्मगावीच शालेय शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते इरिन्जलाकुडा येथे गेले. जीवशास्त्र या विषयात पदवी घेतल्यानंतर हा प्रांत आपला नाही हे त्यांना उमगले. मग इंग्रजी साहित्यात त्यांनी एमए व पुढे कालिकत विद्यापीठातून पीएचडीही मिळवली. पुढे सुमारे २५ वर्षे त्यांनी महाविद्यालयीन स्तरावर इंग्रजीचे अध्यापन केले. साहित्य अकादमीच्या इंग्रजी नियतकालिकाचे संपादन करण्यासाठी दिल्लीत जाऊन त्यांनी प्राध्यापकपदाची नोकरी सोडली. नंतर ते या अकादमीचे सचिव, मुख्याधिकारी बनले.

मराठी साहित्यात ज्याप्रमाणे साठोत्तरी काळ हा महत्त्वाचा आहे, तसाच मल्याळी साहित्यातही या काळात क्रांतिकारी बदल होत होते. त्यातील सच्चिदानंदन हे महत्त्वाचे आणि संवेदनशील कवी मानले जातात. त्या काळातील नवकवी स्वच्छंदतावादातून मुक्त होऊन  आयुष्यातील भीषण वास्तव वा जगण्यासाठीचा संघर्ष आपल्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न करीत होता. केरळ पत्रिकेतून या नवकवीच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. सच्चिदानंदन यांचा ‘अंचुसूर्यन’ हा पहिला काव्यसंग्रह १९७१ मध्ये आला. त्या आधी ‘कुरुक्षेत्रम’ हा आधुनिक काव्याचा परामर्श घेणारा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला होता. पुढे  दर दोन वर्षांनी त्यांचे काव्यसंग्रह येत गेले. २००६ मध्ये त्यांच्या सर्व कविता तीन खंडांमध्ये प्रसिद्ध झाल्या. आत्मगीता, पीडनाकालम (काव्य), शक्तन तंपुरान, गांधी (नाटक), पाब्लो नेरुदा, अन्वेषनंगल (गद्य) यांसारखी ५०हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. सुमारे २० भाषांमधून त्यांच्या कविता अनुवादित झाल्या असून चंद्रकांत पाटील यांनी त्या मराठीतही आणल्या आहेत. त्यांच्या मते सच्चिदानंदन यांची कविता कुठल्याही एका विचारधारेशी, संप्रदायाशी, समाज, संस्कृती, धर्म, राजकारण यांच्या सिद्धांताशी बांधलेली नाही. त्यांची कविता खऱ्या अर्थाने समकालीन भारतीय कवितेचे प्रतिनिधित्व करणारी आहे.

सामाजिक भान असलेले सच्चिदानंदन देशात विचारवंतांचा आवाज दाबला जात असल्याने व्यथितही झाले होते. प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर साहित्य अकादमीने मिळमिळीत भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईत अकादमीने साहित्यिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे होते, पण तसे घडले नाही,’ अशी टीका त्यांनी केली होती. कवी म्हणून नुसती सभा-संमेलने गाजवण्यात त्यांना रस नाही. जातीयवाद, पर्यावरणाचा ऱ्हास, मानवाधिकार उल्लंघन यांसारखे मुद्दे समोर आले की ठाम भूमिका घेऊन ते आपला विरोध जाहीरपणे मांडतात. अत्यंत प्रभावी वक्ते, अनुवादक, संपादक, नाटककार असे बहुआयामी त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे.  केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना आतापर्यंत सात वेळा मिळाला आहे. इण्डो- पोलिश फ्रेंड्स मेडल, साहित्य अकादमी (दिल्ली), तसेच  कुसुमाग्रज पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले आहे. २०११च्या साहित्याच्या नोबेल पुरस्काराच्या यादीत सच्चिदानंदन यांना दहावे मानांकन मिळाले होते, यातच त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होते..