19 December 2018

News Flash

कॅरिन डोर

कॅरिन डोरची ही भूमिका, त्यानंतर सादर झालेल्या मठ्ठोत्तम बॉण्डगर्लसारखी नाही.

सत्तर-ऐंशीच्या दशकांतले बॉलीवूडमधील सारेच देमार चित्रपट (विशेषत: अमिताभ बच्चन यांचे) बॉण्डपटावरून प्रेरित झाले नसले, तरी या काळात इथल्या चित्रपटांतील नायिकांना बॉण्डगर्ल्सच्या अदाकारीने झपाटले होते. कॅबरे नृत्य हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकांच्या डोळ्यांना सुसह्य़ बनविणारी हेलन, स्त्री-पोशाखाची पाश्चात्त्य विचारसरणी भारतात रुजविणारी झीनत अमान आणि लवलवत्या मादकतेने तरुणाईच्या मनावर स्वार झालेली परवीन बाबी या चिरतरुणी अप्रत्यक्षरीत्या बॉण्डगर्लच्याच भूमिका सातत्याने साकारत होत्या. कारण आपल्याकडच्या सुपरस्टार्सची मंदिरे इतकी झाली होती की, साक्षात जेम्स बॉण्डही त्यापुढे नतमस्तक व्हावा. तर या भारतीय मदनिकांच्या प्रेरणाबिंदू ठरलेल्या, अगदी आरंभीच्या किंवा ‘आद्य’ बॉण्डगर्ल्सपैकी एक असलेल्या कॅरिन डोर यांचा नुकताच प्रदीर्घ आजाराने मृत्यू झाला.

कॅरिन डोर यांचा जन्म जर्मनीचा आणि कर्तृत्वही १९६० पर्यंत जर्मन आणि ऑस्ट्रियन सिनेमांपर्यंत मर्यादित होते. शाळेमध्ये बॅले नृत्यातील नैपुण्यामुळे डोर यांना अवघ्या सतराव्या वर्षी सिनेमाची वाट सापडली. एक्स्ट्रा अभिनेत्री म्हणून त्यांनी नायक-नायिकांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या कलाकार समूहामध्ये आरंभी काम केले. तेथे सगळ्यांच्या नाकावर टिच्चून त्यांनी दिग्दर्शकाची मर्जी संपादन केली. काही कालावधीनंतर या दिग्दर्शकाने तिच्याशी विवाहच केला. संसाराच्या वास्तव भूमिकेत पती दिग्दर्शक असल्याने प्रमुख आणि सौंदर्याला साजेशा भूमिका कॅरिन डोर यांना पुढे सहज मिळाल्या. त्यात या लाल केसांच्या ललनेने एडगर वॉलेस आणि कार्ल मे यांच्या युरोपीय वेस्टर्नपटांसोबत ‘टारझन’ चित्रपट-मालिकेतही प्रमुख अभिनेत्रीपद पटकावले. युद्धोत्तर काळात पिचलेले पश्चिम जर्मनी फार सोज्वळ सिनेमा बनवीत होते. त्यात सौंदर्य फुलविण्यासाठी वाव असणाऱ्या पीडित युद्धग्रस्तांच्या काही भूमिका त्यांनी वठविल्या. या भूमिकांमुळेच त्यांच्याकडे बॉण्डगर्लपद आले. बॉण्डगर्ल ही निव्वळ दर्शकांसाठी स्त्रीशरीर अभ्यासाची गोष्ट असल्याचे ग्लॅमरपद त्या काळी बॉण्डच्या सहनायिकांना आजच्याइतके लाभले नव्हते. शाँ कॉनरी अभिनीत ‘यू ओन्ली लिव्ह ट्वाइस’ या बॉण्डपटामध्ये नायकाला ठार करण्याच्या हेतूने चित्रपटात वावरणारी न-नायिका हेल्गाची भूमिका त्यांनी वठविली.

कॅरिन डोरची ही भूमिका, त्यानंतर सादर झालेल्या मठ्ठोत्तम बॉण्डगर्लसारखी नाही. आपल्या जपानी बॉसशी हाराकिरी केल्याप्रकरणी तिला नरभक्षक माशांच्या तोंडी दिले जाणारे या चित्रपटातील दृश्य यूटय़ूबवर आजही लोकप्रिय आहे. जर्मन चित्रसृष्टीमध्ये कैक वर्षे नाम कमावूनही आज डोर यांचे नाव घेतले जाते ते फक्त बॉण्डगर्ल म्हणून. आल्फ्रेड हिचकॉकच्या ‘टोपाझ’ या चित्रपटामध्येही त्यांनी प्रमुख भूमिकेमध्ये काम केले आणि त्यानंतरही गेली अनेक दशके त्या सिनेमा आणि रंगभूमीवरही कार्यरत होत्या. १९७० नंतर बॉण्डगर्ल्सना बऱ्यापैकी ग्लॅमर आले. या काळात चकाकत्या मासिकांच्या आणि वृत्तपत्रांच्या चकचकीत पुरवण्यांनी बॉण्डगर्लच्या सचित्र गाथांना अधिकाधिक जागा देण्यास सुरुवात केली आणि नव्वदोत्तरी काळात फोफावलेल्या पेज थ्री संस्कृतीत बॉण्डगर्ल्सचा शरीराभ्यास ही प्रेक्षकांसाठी नेत्रमेजवानीची बाब बनली. चलाख असल्या तरी बॉण्डशरण आणि म्हणून निष्प्रभ अशाच बॉण्डगर्लच्या व्यक्तिरेखा लिहिल्या गेल्या. त्यामुळे स्त्रीवादी विचारसरणी काही प्रमाणात बॉण्डपटांवर तुटून पडली. या साऱ्या वर्षांत, बॉण्डगर्ल म्हणून गाजलेल्या कॅरिन डोर आपली छबी जर्मन, अमेरिकी आणि ब्रिटिश चित्रपटांतून झळकवत राहिल्या. दर दशकात नवनवीन बॉण्डगर्ल, आधीच्या बॉण्डगर्लभोवतीच्या वलयाला आणि वादाला पुसून आपलीच छबी मिरविण्याचा प्रयत्न करीत; पण एकीलाही दशकापलीकडे ओळख मिळाली नाही. त्या काळातही कॅरिन डोर यांनी बॉण्डगर्लमुळे तयार होणाऱ्या प्रसिद्धी अडकित्त्यापासून स्वत:ला वाचविले आणि अभिनयालाच प्राधान्य दिले, म्हणून त्यांचे स्मरण महत्त्वाचे.

First Published on November 15, 2017 2:48 am

Web Title: loksatta vyakti vedh karin dor