अमेरिकेत व्हाइट हाऊस, पेंटेगॉन, परराष्ट्र वा संरक्षण खात्यात महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली की जगभरात त्याची दखल घेतली जाते. त्याच प्रमाणे अमेरिकेकडून कोणत्या देशात राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली जाते याकडेही जगातील प्रमुख देशांचे लक्ष लागलेले असते. अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून ज्यांचे नाव पुढे आले आहे ते केनेथ जस्टर हे भारत-अमेरिका नागरी अणुकराराचे शिल्पकार असल्याने माध्यमांमध्ये या नियुक्तीला ठळक स्थान मिळणे क्रमप्राप्त होते. अमेरिका व भारत  यांच्यात सध्या आण्विक, अवकाश व लष्करी क्षेत्रात सहकार्य वाढत असताना जस्टर यांची या पदासाठी निवड होणे महत्त्वाचे आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार म्हणून ते सध्या काम करीत आहेत. अमेरिकी अध्यक्षांचे आंतरराष्ट्रीय आर्थिक कामकाज विभागाचे ते उपसाहाय्यक असून राष्ट्रीय अर्थ मंडळाचे उपसंचालक आहेत. २००१ ते २००५ दरम्यान जस्टर हे व्यापार उपमंत्री होते. १९९२-१९९३ या काळात त्यांनी परराष्ट्र सल्लागार म्हणून काम केले, तर १९८९ ते १९९२ दरम्यान ते उपपरराष्ट्रमंत्र्यांचे सल्लागार होते. खासगी क्षेत्रातही त्यांनी वॉरबर्ग पिंक्स एलएलसी या कंपनीत काम केले. सेल्सफोर्स डॉट कॉम कंपनीचे ते कार्यकारी उपाध्यक्ष, तर अर्नोल्ड अ‍ॅण्ड पोर्टर या कायदा आस्थापनात वरिष्ठ भागीदार होते. हार्वर्ड विद्यापीठाच्या वेदरहेड सेंटर फॉर इंटरनॅशनल अफेअर्स या संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. द आशिया फाऊंडेशनचे ते उपाध्यक्ष होते. ते हार्वर्ड लॉ स्कूलचे पदवीधर असून, त्यांनी लोकधोरण विषयात जॉन एफ केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट या हार्वर्डच्या संस्थेतून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. हार्वर्ड कॉलेजचे ते पदवीधर आहेत.

अमेरिकेतील भारतविषयक तज्ज्ञांमध्ये ज्यांचे स्थान बरेच वरचे आहे आणि ज्यांचे नाव राजदूतपदासाठी चर्चिले जात होते त्या अ‍ॅश्ले टेलिस यांनीही अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून जस्टर यांची निवड योग्य असल्याचे म्हटले आहे. उभय देशांतील संबंध व व्यापार सुधारण्यात जस्टर यांनी मोठी भूमिका वठवली आहे. भारतात ते चांगले परिचयाचे आहेत. भारतीय त्यांच्या निवडीचे स्वागतच करतील, असे टेलिस यांनी म्हटले आहे. मात्र काही प्रसारमाध्यमांनी जस्टर यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत शंका उपस्थित केली आहे. जस्टर पूर्वी जेथे काम करत होते त्या वॉरबर्ग पिंक्स या कंपनीने भारतातील कंपन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली आहे. गेल्या सहा महिन्यांत या कंपनीने भारतात १.१४ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. गेल्या २० वर्षांत या कंपनीने भारतात ३.७ अब्ज डॉलर गुंतवले होते. त्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढलेल्या ताज्या व्यवहारांबद्दल शंका घेतली जात आहे.

गेल्या वर्षी अध्यक्षीय निवडणुकीत बराक ओबामा यांचा पराभव झाल्याने त्यांच्या काळात नेमलेले भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी जानेवारी महिन्यात पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्तच आहे. अमेरिकेतील अनेक मुत्सद्दी या पदासाठी उत्सुक होते, पण ट्रम्प यांनी जस्टर यांच्या नावावर मोहोर उमटवली. सिनेटने या नियुक्तीस मंजुरी दिल्यानंतरच जस्टर नव्या पदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी भारतात येतील. विविध आंतरराष्ट्रीय कायद्यांचे व्यापक व सखोल ज्ञान आणि भारत-अमेरिका नागरी अणुकरार घडवून आणण्यात त्यांचे मोलाचे योगदान ही जस्टर यांची जमेची बाजू. त्या शिवाय ट्रम्प प्रशासन आणि व्हाइट हाऊसमधील उच्च अधिकाऱ्यांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध असल्याने भारत अमेरिका यांच्यातील मैत्रीचे बंध अधिक दृढ होण्यात जस्टर हे उपयुक्त ठरतील असे मानले जाते.