दुसऱ्या महायुद्धाच्या निमित्ताने अणुबॉम्बचे संशोधन जोरात होते. त्यात वेगवेगळे वैज्ञानिक सामील होते. त्या काळात एका मुलीला नोकरी चालून आली होती. त्यात इतर वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनाचे गुप्त अहवाल टंकलिखित करण्याचे काम करायचे होते, पण तिने हा प्रस्ताव विनम्रपणे फेटाळला. आपण मुलगी आहोत म्हणून ही हलक्या स्वरूपाची नोकरी आपल्याला देत आहेत असे तिला वाटले, ते खरेही होते, पण तिच्या नकारात एवढे सामथ्र्य होते की, तिला पहिल्या अणुबॉम्ब प्रकल्पात संशोधन करण्याची संधी दिली गेली. तिचे नाव होते डॉ. लिली हॉर्निग. नुकतेच त्यांचे ९६ व्या वर्षी निधन झाले.

विज्ञानात महिलांना स्थान मिळाले पाहिजे यासाठी सक्रियपणे काम करणाऱ्या त्या वैज्ञानिक होत्या. वयाच्या विशीत त्यांनी १९४४ मध्ये रसायनशास्त्रात पदवी घेतली. त्या वेळी अणुबॉम्ब बनवण्याचा मॅनहटन प्रकल्प जोरात होता. लॉस अलमॉस येथे एक गुप्त अणुसंशोधन प्रयोगशाळा उभारण्यात आली. तेथे कारकुनी करण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले, पण त्यांनी त्यांच्या ज्ञानास साजेसे काम मिळवले, त्यांचे पती त्याच प्रयोगशाळेत काम करीत होते. नंतर लिली यांनी हार्वर्डमधून पीएच.डी. केली व ‘विज्ञानातील महिला’ या विषयाला त्यांनी वाहून घेतले. महिला वैज्ञानिक, प्राध्यापक, विद्यार्थिनी यांना त्यांनी सतत उत्तेजन दिले. उच्च शिक्षण व विज्ञानातील महिलांवर तीन पुस्तकांचे त्यांनी संपादन केले होते. प्लुटोनियमवर संशोधन करण्याची त्यांची इच्छा होती, पण त्यातील समस्थानिकामुळे महिलांच्या प्रजोत्पादन शक्तीवर परिणाम होत असे, परिणामी त्यांना पारंपरिक  स्फोटकांच्या संशोधनाचे काम देण्यात आले. त्यांनी प्लुटोनियम बॉम्बचा स्फोट करण्यासाठी नवीन यंत्रणा शोधली. त्यात विनाशक ऊर्जा मोठय़ा प्रमाणावर बाहेर पडणार होती. नंतर १९४५ मध्ये हिरोशिमा व नागासाकी या जपानवरील शहरांवर अणुबॉम्ब पडला आणि युद्ध संपले. प्रयोगशाळेत काम करीत असताना त्यांची गाठ जर्मन-ब्रिटिश वैज्ञानिक क्लॉस फुश व अमेरिकेचे डेव्हिड ग्रीनग्लास यांच्याशी पडली होती, पण ते दोघेही रशियाचे हेर असल्याचे नंतर निष्पन्न झाले.

लिली यांचा जन्म चेकोस्लोव्हाकियाचा भाग असलेल्या ऑसिगमध्ये ज्यू कुटुंबात झाला. त्यांचे वडील हे औषध कंपनीत काम करीत होते तर आई बालरोगतज्ज्ञ होती. त्यांचे वडील  लिलीस कधीतरी प्रयोगशाळेत नेत असत. तेथील काचेची उपकरणे व सगळे वातावरण तिला आवडत असे. तेव्हाच रसायनशास्त्रज्ञ किंवा डॉक्टर व्हायचे तिने ठरवले होते. रसायनशास्त्रात पदवी घेतल्यानंतर त्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख होत्या. त्या काळात अनेक संस्थांत त्यांना महिलांविषयी सापत्नभाव जाणवत होता. महिला वैज्ञानिकांना पुरुषांपेक्षा कमी वेतन होते, त्याविरोधात त्यांनी द न्यूयॉर्क टाइम्समध्ये पत्र लिहून आवाज उठवला होता. अणुबॉम्ब तयार करण्यात आल्यानंतर त्यांच्या पतीला त्याची देखरेख करण्याचे काम दिले होते. रात्रभर ते बॉम्बजवळ लहान मुलासारखे बसून होते. स्फोटाच्या आधी त्यांच्या पतीनेच तो बॉम्ब अखेरचा पाहिला होता. नंतर १६ जुलै १९४५ रोजी त्याची चाचणी अल्मोगोडरे येथील वाळवंटात घेण्यात आली. त्या वेळी लिलीही तेथे उपस्थित होत्या. उकळता रंगीबेरंगी ढग, सप्तरंगी ज्वाळा असे या चाचणी स्फोटाचे वर्णन त्यांनी केले होते. जेव्हा हिरोशिमा व नागासाकीवर अणुबॉम्ब पडला तेव्हा त्यांच्या मनात एकीकडे काहीशी विजयाची त्याचबरोबर हानीची छायाचित्रे पाहिल्यानंतर विषण्णतेची भावना होती. मॅनहटन प्रकल्पात एकूण १५०० वैज्ञानिक होते, त्यातील केवळ डझनभर जिवंत आहेत, अशातच लिली यांच्या निधनाने आणखी एक दुवा निखळला आहे.