11 December 2017

News Flash

प्रा. मु. ब. शहा

आयुष्यात एखादे ध्येय समोर ठेवून जगणारे अनेक जण असतात

लोकसत्ता टीम | Updated: October 9, 2017 3:37 AM

गांधीवादी विचारांसह हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार, बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडो’ला स्वत:ला जोडून घेतानाच छात्रभारती, राष्ट्र सेवा दल यांसह इतर अनेक संघटनांची जबाबदारी सांभाळणे, हे करीत असतानाच ५०पेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन, हिंदीतील उत्तम साहित्याचे मराठीत आणि मराठीतील साहित्याचे हिंदूीत अनुवाद करणे अशा किती तरी आघाडय़ा सांभाळण्यासाठी व्यक्ती चतुरस्रच असावी लागते. ते गुण प्रा. मु. ब. ऊर्फ मुरलीधर बन्सीलाल शहा यांच्याकडे होते. समाजकार्य, भाषेवरील प्रभुत्व आणि वक्तृत्वावरील पकड यामुळे अनेकांना आपलेसे करून घेण्याची अनोखी शैली शहा यांच्याकडे होती.

आयुष्यात एखादे ध्येय समोर ठेवून जगणारे अनेक जण असतात, परंतु एकाच वेळी अनेक ध्येय समोर असतानाही ते पूर्ण करण्यासाठी धडपडणारे थोडेच असतात. प्रा. शहा हे त्यांच्यापैकीच एक होय. शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता, साहित्य अशा सर्वच क्षेत्रांत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. हिंदी भाषा आणि साहित्य तसेच गांधीजींच्या विचारांचा प्रचार व प्रसारासाठी त्यांनी वाहून घेतले. आयुष्यातील सुमारे ४५ वर्षे हिंदीच्या प्रचारासाठी कार्यरत राहिलेल्या शहा यांनी प्रारंभी धुळ्याच्या जयहिंद महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात हिंदी विभागप्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली. पुण्यातील महाराष्ट्र हिंदी राष्ट्रभाषा सभेचे उपाध्यक्ष आणि नाशिक विभागाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. संशोधनातील आवडीमुळे त्यांनी धुळे येथील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे इतिहास संशोधन मंडळाचे विश्वस्त म्हणूनही काम पाहिले. त्यातूनच मंडळाच्या १३ खंडांचे तसेच खानदेशच्या सांस्कृतिक इतिहासाच्या सहा खंडांचे संपादनही त्यांनी केले. छात्रभारती या विद्यार्थी संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष. विद्यार्थ्यांची संघटना म्हणून शैक्षणिक समस्यांची सोडवणूक ओघाने आलीच, परंतु त्याशिवाय विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक दायित्वाची जाणीव करून देण्याचे काम त्यांनी केले. यदुनाथ थत्ते यांच्या बरोबरीने त्यांच्या कार्याला जणू काही नवी उभारी मिळाली. साहित्य विश्वातील त्यांची मुशाफिरी मराठी आणि हिंदी दोन्ही साहित्यिकांसाठी मोलाची ठरली. मराठीतील साहित्य हिंदी भाषेत गेल्यास ते अधिक वाचकांपर्यंत पोहोचू शकेल, या हेतूने त्यांनी मराठीतील अनेक पुस्तकांचे हिंदीत आणि हिंदीतील पुस्तकांचे मराठीत अनुवाद केले. अमृता प्रीतम यांच्या ‘रसीदी टिकट’चा त्यांनी केलेला मराठी अनुवाद विशेष गाजला. ‘खानदेशचे गांधी- बाळूभाई मेहता’, ‘सत्यशोधक कुंभार गुरुजी’, ‘श्यामची आई’ (नाटय़ रूपांतर), ‘यदुनाथ थत्ते’ (चरित्र), ‘निबंध कौमुदी’, ‘संस्कृति’, ‘अक्षरयात्रा’, ‘नवजागरण और हिंदी साहित्य’, ‘भारतीय समाज क्रांती के जनक महात्मा जोतिबा फुले’ आदी पुस्तकांचे लेखन केले. मराठीतून हिंदीत अनुवादित साहित्यात पु. ल. देशपांडे यांचे ‘मातृधर्मी सानेगुरुजी’, रजिया पटेल यांचे ‘चाहूल’, नरहर कुरुंदकर यांचे ‘विचार तीर्थ’, साधनाताई आमटे यांच्या ‘समिधा’ या पुस्तकांचा समावेश आहे. राष्ट्रभाषा सभा, राष्ट्र सेवा दल, आंतरभारती या संस्थांमध्ये महत्त्वाची कामगिरी सांभाळताना त्यांनी या संस्थांना नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. भारतातील चौदा भाषांमध्ये राष्ट्रीय गीत गायन करणाऱ्या २२ गायकांना सोबत घेऊन त्यांनी ‘हम हिंदुस्थानी’ची स्थापना केली. तसेच भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची कहाणी त्यांनी गीतांद्वारे २० गायकांसह अनेक शहरांमध्ये सादर केली. शहा यांच्या निधनाने शैक्षणिक, साहित्य क्षेत्राची तर हानी झालीच, पण समाजात बदल होण्यासाठी नि:स्वार्थ वृत्तीने झटणारे व्यक्तिमत्त्वही लोपले..

First Published on October 9, 2017 3:37 am

Web Title: loksatta vyakti vedh m b shah