नृत्य हा अभिव्यक्तीचा सर्वात प्रभावी आविष्कार असतो. त्यातून मानवी जीवनातील प्रत्येक भावना जशा व्यक्त होतात तशा फार थोडय़ा कलाप्रकारांतून व्यक्त होतात. कुठलीही कला खरे तर तपश्चर्याच. केरळात कथकली नर्तक म्हणून प्रसिद्ध असलेले मदावूर वासुदेवन नायर यांनीही नृत्याची आराधना अशाच अजोड समर्पणाने केली. आपल्या आवडत्या कलेची आराधना करीत असतानाच त्यांना मृत्यू आला. आंचल येथील अगस्त्यकोड महादेव मंदिरात कथकली नृत्य सादर करीत असतानाच ते कोसळले.

तिरुअनंतपुरम येथे ७ एप्रिल १९२९ रोजी त्यांचा जन्म झाला. नायर यांचे कुटुंब हे कलेच्या मातीत रुजलेले होते. त्यांचे वडील रामा कुरूप हे लोकनर्तक होते तर आई शास्त्रीय गायिका. त्यामुळे कलेचे बाळकडू त्यांना मिळाले. सुरुवातीला त्यांचा ओढा कर्नाटकी शास्त्रीय संगीत व भक्तिगीतांकडे होता. पण नंतर ते नृत्याकडे वळले. त्यांना कंबडीकाली व कुथीयोत्तम या लोकनृत्यप्रकारात विशेष प्रावीण्य होते. वयाच्या तेराव्या वर्षी  नायर यांनी कथकलीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. मदावूर परमेश्वरन पिल्ले हे त्यांचे कथकलीतील पहिले गुरू. नंतर एक वर्ष ते कुरिची कुंजन पणिक्कर यांनी सुरू केलेल्या कथकली कलारी या संस्थेत दाखल झाले. वयाच्या सतराव्या वर्षी ते थेट पद्मश्री चेंगानूर रामन पिल्ले यांचे शिष्य बनले. त्यांच्याकडे ते बारा वर्षे होते. ते काठी, पाचा, वेलाथाडी, मिनुकू पात्रांच्या आविष्करणात तरबेज होते. वासुदेवन नायर यांनी रावण, दुर्योधन, कीचक, जरासंध, हिरण्यकश्यपू, नरकासुर या भूमिका केल्या. हनुमान, हंसम, कट्टालन मिनूकू ही पौराणिकपात्रे त्यांनी साकारली. भारताशिवाय सिंगापूर, हाँगकाँग, फिजी, इंडोनेशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, ब्रिटन, अमेरिका या देशात त्यांचे कार्यक्रम झाले होते. थुलासीवनम पुरस्कार, अल्लापुझा क्लब पुरस्कार, केरळीय कलाक्षेत्र पुरस्कार, तपस्या अभिनंदन पत्र, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मभूषण (२०११) असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. कथकलीच्या अनेक नृत्यशैलीवर त्यांचे प्रभुत्व होते. कलाभारती, केरळ कलामंडलम यांसारख्या संस्थात त्यांनी काम केले. एखाद्या कलेसाठी आयुष्य समर्पित करणे हे त्या कलेवर मनापासून प्रेम असल्याशिवाय साध्य होत नाही. कथकली नृत्य हे नायर यांच्यासाठी श्वास आणि ध्यास होता. केरळमध्ये मंदिरांमधील कार्यक्रम, मैफली यातून या नृत्यात बदल होत गेले. त्रावणकोरसारख्या संस्थानांनीही त्याला राजाश्रय दिला त्यामुळे ही नृत्यकला पुढे गेली. कथकली नर्तकांच्या पाच पिढय़ांबरोबर त्यांनी काम केले. त्यांच्या निधनाने कथकलीचा मंतरलेला काळ पडद्याआड गेला आहे.