माखनलाल फोतेदार हे काँग्रेसमध्ये दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध होते, एक म्हणजे त्यांची राजकीय संवेदनशीलता व दुसरे म्हणजे गांधी घराण्याशी जवळीक. बराच काळ काँग्रेसचे चाणक्य असलेल्या फोतेदार यांचे नुकतेच निधन झाले. जवाहरलाल नेहरू यांच्या काळात राजकारणात आलेल्या फोतेदार यांचा प्रभाव इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या राजवटीनंतर कमी होत गेला तो कायमचाच. काँग्रेसमधील सत्ता समीकरणात होत गेलेले बदल व दोन पिढय़ांतील अंतर यामुळे फोतेदार काँग्रेसमध्ये नंतर बाजूला पडले. असे असले तरी ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले.

फोतेदार यांचा जन्म काश्मीर खोऱ्यातील अनंतनाग जिल्ह्य़ातील मट्टन येथे  झाला. १९५० मध्ये नेहरूंच्या काळात ते राजकारणात आले. त्यांच्याबरोबर त्यांनी फुलपूर मतदारसंघात कार्यकर्ते म्हणून प्रचारही केला होता व नंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे १९८० ते १९८४ या काळात राजकीय सचिव होते. त्यांच्या काळात फोतेदार यांच्या संमतीशिवाय एकही महत्त्वाचा निर्णय होत नसे त्यावरून ते इंदिरा व राजीव यांच्या किती निकट होते हे दिसून येते. नेहरूंनी त्यांना राजकारणात आणले तरी त्यांच्या काळात ते काँग्रेस पक्षात फार स्थान निर्माण करू शकले नाहीत. इंदिरा गांधी यांच्या काळात त्यांचे महत्त्व वाढले. इंदिरा गांधी यांनी त्यांना आर. के. धवन यांच्याइतकेच महत्त्व दिले होते. इंदिरा गांधी यांची त्यांनी अखेपर्यंत साथ केली. ते त्यांचे इतके विश्वासू होते की त्यांच्या इच्छापत्रात ते एक साक्षीदार राहिले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यांनीही फोतेदार यांना राजकीय सचिव पद व नंतर मंत्रिपद दिले. त्यांच्या काळातच ते खासदार म्हणून निवडून आले होते. इंदिरा-राजीव यांच्या काळातील स्थित्यंतरात जे नेते टिकून राहिले त्यांच्यापैकी ते एक होते. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या काळात १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा फोतेदार मंत्रिपदाचा राजीनामा देऊन तिवारी काँग्रेसमध्ये सामील झाले. १९६७ ते १९७७ असा बराच काळ ते जम्मू-काश्मीर विधानसभेत पहलगाम मतदारसंघातून निवडून येत होते व नंतर दोन वेळा ते राज्यसभेवर होते. सक्रिय राजकारणातून बाजूला पडल्यानंतर अलीकडे २०१५ मध्ये त्यांनी ‘चिनार लिव्ह्ज’ नावाचे पुस्तक लिहिले, त्यात त्यांनी इंदिरा गांधी या प्रियांकालाच राजकीय वारसदार मानत होत्या असा दावा केला. त्यामुळे काँग्रेसची धुरा प्रियांकाला देण्याच्या काहींच्या आग्रहाला पाठबळ मिळाले, पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. सोनिया गांधी यांनी २००४ मध्ये सदसद्विवेकाने पंतप्रधानपद नाकारले हे खरे नाही, तर कुटुंबाच्या दबावामुळे त्यांनी ते स्वीकारले नाही, असेही त्यांनी या पुस्तकात म्हटले होते. राजीव गांधी यांची १९९१ मध्ये हत्या झाल्यानंतर फोतेदार यांनी इंदिरा गांधी यांना प्रियांकाबाबत काय वाटत होते याबाबत एक पत्रही लिहिले. नंतर सीताराम केसरी यांनी १९९८ मध्ये सोनिया गांधी यांना पक्षाची धुरा सांभाळण्यास राजी केले होते, त्यात फोतेदारांची भूमिका महत्त्वाची होती. नंतर फोतेदार यांना अर्जुन सिंह, नारायण दत्त तिवारी यांच्याबरोबर पक्षात पुन्हा घेण्यात आले तरी महत्त्वाच्या निर्णयात पद्धतशीरपणे दूर ठेवण्यात आले. फोतेदार हे पन्नास वर्षे काँग्रेसमध्ये कार्यरत राहिले. आक्रमक राजकारणी व जननेते नसतानाही त्यांना पक्षात मिळालेले स्थान तरीही मोठेच होते यात शंका नाही.