नागपूरच्या कामगार क्षेत्रात रुईकर या नावाला एक वलय आहे. कारण गेले शतकभर या कुटुंबाने कामगारवर्गासाठी खाल्लेल्या खस्ता आणि केलेल्या कामांचे नागपूरकर प्रत्यक्षदर्शी आहेत. रामभाऊ रुईकरांनी आयुष्यभर कामगारकेंद्रित राजकारण केले आणि तोच वारसा त्यांची कन्या मालती रुईकर यांनी पुढे चालवला. एवढेच नव्हे तर वडिलांच्या कार्याला संस्थात्मक रूप दिले. अविवाहित राहून कुटुंबाची जबाबदारी तर त्यांनी पेलली, शिवाय कामगारांच्या प्रश्नांनाही त्यांनी कधी विस्मृतीत जाऊ दिले नाही. मालतीताईंचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आणि कामगारांवर प्रेम करणारा एक लखलखीत तारा निखळला.

नागपुरातील महालमध्ये त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण लोकांच्या शाळेत आणि उच्च शिक्षण हिस्लॉप महाविद्यालयात झाले. पदवी उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी वडिलांना सार्वजनिक कार्यात मदत करायला सुरुवात केली. वडिलांमुळे बालपणापासूनच कामगार चळवळीशी संबंध आला. वडिलांच्या सार्वजनिक कार्यातील सक्रियतेमुळे घरात नेहमीच आर्थिक चणचण भासायची. आर्थिक अडचणीमुळे शाळेचे शुल्क देण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसायचे. राजकारणाच्या धकाधकीत आणि सार्वजनिक कार्याच्या व्यापामुळे वडिलांचा फार कमी सहवास मुलांना मिळायचा. मात्र वडिलांचा त्यांच्यावर विशेष लोभ होता. कारण कामगारांशी संबंधित विषयातच उच्च शिक्षण घेऊन मालतीताई मुंबईहून नागपुरात परतल्या होत्या. १९५४ मध्ये वडील गेल्यानंतर कुटुंबात कमावते कुणीच नव्हते.  दोन बहिणींची लग्ने झाली असली तरी आई, तीन भाऊ आणि त्या स्वत: अशा पाच जणांची जबाबदारी मालतीबाईंनी उचलली. त्यांना तत्कालीन मध्य प्रदेश शासनाच्या कामगार खात्यात श्रम अधिकाऱ्याची नोकरी मिळाली. याच खात्यातून कामगार उपायुक्त म्हणून निवृत्त झाल्यावर मुंबईहून त्या नागपुरात आल्या आणि  वडिलांनीच स्थापलेल्या हिंद मजदूर सभेच्या माध्यमातून २०-२२ वर्षे कामगार चळवळीत त्या सक्रिय झाल्या. त्यानंतर १९८४ मध्येच सभेच्या विदर्भ विभागाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. संघटनेचे नेते बा. न. राजहंस यांनी स्थापन केलेल्या अंगणवाडी कर्मचारी सभेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पहारेकरी संघटनेच्या बरीच वर्षे त्या सल्लागार होत्या. पहारेकऱ्यांच्या पगारवाढीचा पहिला करार त्यांच्याच उपस्थितीत झाला. प्रसिद्ध मॉडेल मिलच्या निवृत्त कामगारांना १५ ऐवजी १३ दिवसांच्या ग्रॅच्युईटीचे प्रकरण त्यांनी धसास लावून कामगारांना न्याय मिळवून दिला. मात्र छोटय़ा कारखान्यातील कामगारांचे शोषण थांबवता येत नाही, याची त्यांना कायम खंत राहिली. कामगारांना त्वरित न्याय मिळण्यासाठी कामगार कायद्यात काही तरी तरतूद असणे आवश्यक आहे, असे त्यांचे प्रामाणिक मत होते. एकूण रामभाऊंचा वैचारिक आणि लढाऊ वारसा मालतीबाईंनी हिरिरीने पुढे नेला.

वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एखादी संस्था स्थापन करण्याचा त्यांचा विचार होता. त्यानुसार वर्धन, डॉ. श्रीनिवास खांदेवाले आणि डॉ. भा. ल. भोळे यांच्या सहकार्याने ‘रुईकर इन्स्टिटय़ूट ऑफ लेबर अ‍ॅण्ड सोशिओ- कल्चरल स्टडीज’ची स्थापना केली. असंघटित क्षेत्रातील कामगार आणि त्यांच्या समस्या याबाबत संस्थेने वेळोवेळी चर्चासत्रे व आंदोलने करून कामगारांचे प्रश्न सतत तेवत ठेवले. त्यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संचालक म्हणूनही काही काळ काम केले. आयुष्यभर स्वातंत्र्याचे मूल्य अगदी प्राणपणाने जपणाऱ्या मालतीताईंच्या जाण्याने कामगार क्षेत्रातील एका लढाऊ नेतृत्वाची अखेर झाली.