आधुनिक हिंदी साहित्यातील कथालेखिकांमध्ये कृष्णा सोबती, मन्नू भंडारी, राजी सेठ, उषा प्रियंवदा, नासिरा शर्मा ही काही उल्लेखनीय नावे. याच नामावलीत समावेश करावा लागेल तो ममता कालिया यांचा. बदलत्या परिस्थितीत बदललेली महिलांची मानसिकता व त्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून वेगळ्या धाटणीच्या कथा त्यांनी लिहिल्या. कृष्णा सोबती यांना साहित्य क्षेत्रातील देशातला सर्वश्रेष्ठ समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार यंदाच मिळाला, तर ममता कालिया यांना अलीकडेच प्रतिष्ठेचा व्यास सम्मान जाहीर झाला, ही बाब हिंदी साहित्यप्रेमींसाठी आनंददायी अशीच आहे.

श्रीकृष्णाची नगरी अशी ओळख असलेल्या मथुरा शहरात २ नोव्हेंबर १९४० रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विद्याभूषण अग्रवाल हे हिंदी साहित्यातील एक विद्वान मानले जातात. प्रारंभीची काही वर्षे त्यांनी अध्यापन केल्यानंतर ते आकाशवाणीच्या सेवेत रुजू झाले. फटकळ आणि स्पष्टवक्ते अशी त्यांची ओळख बनल्याने आकाशवाणीच्या सेवेत त्यांच्या सतत बदल्या होत गेल्या. साहजिकच ममता यांचे शिक्षण दिल्ली, भोपाळ, मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या विविध शहरांत झाले. दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात ममताजींनी एम. ए. केले. नंतर मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे कार्य सुरू केले. सुरुवातीला काही नियतकालिकांतून त्यांनी इंग्रजीतून लिखाण केले. नंतर मात्र हिंदी लेखनावरच भर दिला. ‘प्यार शब्द घिसते घिसते चपटा हो गया है, अब हमारी समझ में सहवास आता है’ अशा स्फोटक कविता त्यांनी सुरुवातीच्या काळात लिहिल्या. कथा, कविता, कादंबरी, नाटय़, अनुवाद, पत्रकारिता अशा विविध साहित्य प्रकारांत त्यांनी मुशाफिरी केली. धार्मिक क्षेत्रातील पाखंडीपणावर प्रहारकरणारी त्यांची ‘मेला’ ही कथा गाजली. ‘मुखौटा’सारख्या कथांतून आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्दय़ावर त्यांनी भाष्य केले तर दलितांमधील चेतना जागृत होत आहे, हे ‘रोशनी की मार’सारख्या कथेतून त्यांनी मांडले. ममता कालिया यांच्या कथाविश्वातील महिलांची रूपे दोन परिप्रेक्ष्यातून पाहावी लागतील. एक म्हणजे अशा स्त्रिया ज्या सामाजिक, आर्थिक हतबलतेतून येणारी अवस्था झेलत राहतात आणि नंतर उन्मळून पडतात. दुसऱ्या प्रकारच्या स्त्रिया आयुष्यभर आपल्या हक्कांसाठी संघर्ष करतात, अन्यायाने पेटून उठतात. शेवटी विजयी होतात आणि इतरांसाठी प्रेरणेचा स्रोत बनतात. आपल्या कादंबऱ्यांतून समाजातील विषमतामूलक रचना आणि पितृसत्ताक मानसिकतेमुळे महिलांची होणारी घुसमटही प्रखरपणे त्यांनी मांडली. एक पत्नी के नोट्स, प्रेम कहानी, दौडसारख्या त्यांच्या कादंबऱ्या वाचकप्रिय ठरल्या. आर्थिक उदारीकरणानंतर तरुण पिढीत वाढलेला चंगळवाद आणि त्याचे कुटुंबव्यवस्थेवर होणारे परिणाम ‘दौड’ या कादंबरीत त्यांनी चपखलपणे मांडले. नरक-गर नरक, दुक्खम-सुक्खम यासारख्या त्यांच्या साहित्यकृतीही अफाट लोकप्रिय ठरल्या. विपुल ग्रंथसंपदा ममताजींच्या नावावर असली तरी समीक्षकांनी मात्र त्यांची म्हणावी तशी दखल घेतली नाही.  मुंबईहून त्या नोकरीनिमित्त थेट वाराणसीत एका महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून गेल्या. तिथेच निवृत्त झाल्या आणि मग दिल्लीत स्थायिक झाल्या. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी साहित्यसेवा बजावल्याबद्दल यशपाल कथा सम्मान, साहित्य भूषण सम्मान, राम मनोहर लोहिया पुरस्कार त्यांना मिळाला आहे. आता साडेतीन लाख रुपयांचा व्यास सम्मान जाहीर झाल्याने धर्मवीर भारती, केदारनाथ सिंह, श्रीलाल शुक्ल, चित्रा मुद्गल यांसारख्या व्यास सम्मानाने गौरव झालेल्या मान्यवरांच्या पंक्तीत त्या विराजमान झाल्या आहेत..